जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 11:09 PM2017-07-18T23:09:59+5:302017-07-18T23:30:36+5:30

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप

Rain rains everywhere in the district | जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची रिपरिप सुरू झाली असून सांगली, मिरजेसह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने मंगळवारी दिवसभर मुक्काम ठोकला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने अपेक्षाभंग केल्यामुळे शेतकरी व नागरिकांच्या डोक्यावर चिंतेचे ढग दाटले होते. ही चिंता दूर करीत पावसाने मंगळवारी मुहूर्त साधत दिवसभर मुक्काम ठोकला. सांगली, मिरज परिसरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. पावसाचा जोर नसला तरी, तो कायम असल्याने संपूर्ण शहराला या हलक्या सरींनी चिंब भिजविले. शहराच्या सखल भागात पाणी साचले असून गुंठेवारी भागात पुन्हा दलदल निर्माण झाली आहे. जिल्ह्यातही रिमझिम चालू असून शेतीच्या कामांना गती आली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार २२ जुलैपर्यंत जिल्ह्यात पावसाची स्थिती अशीच राहणार आहे.
तासगाव तालुक्यात पावसाचे आगमन
तासगाव : शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सोमवारी दिवसभर मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या पावसाने शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला नसला तरी, शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या अपेक्षेत आहे. सोमवारी सकाळपासूनच तासगाव शहरासह तालुक्यातील लोढे, बस्तवडे, आरवडे, वायफळे, डोंगरसोनी, सावळज, यमगरवाडी, बिरणवाड़ी, अंजनी, वडगाव, लोकरेवाडी, सावर्डे, मणेराजुरी, खुजगाव, चिंचणी, विसापूर, हातनूर, पेड, येळावी, कवठेएकंद, बोरगाव, योगेवाड़ी, उपळावी यासह तालुक्याच्या सर्व भागात पावसाने हजेरी लावली. द्राक्षबागांना हा पाऊस पोषक ठरून बागांच्या काड्या लवकर तयार होण्यासाठी मदत करणारा आहे. खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्या सुरु होण्यासाठी मात्र शेतकरी अजून दमदार पावसाच्या अपेक्षेत आहेत.
पलूस परिसरात पावसाची हजेरी
पलूस : पलूस तालुक्यात सोमवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप चालू झाली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात असून मंगळवारपासून टोकणीची कामे सुरू झाली आहेत. गेल्या दीड महिन्यापासून चातकासारखी पावसाची वाट पाहणारा बळीराजा या पावसामुळे सुखावला असून आता पेरणी व टोकणीच्या कामाला गती आली आहे. सध्या तालुक्यात फक्त पस्तीस टक्के पेरणी झाली आहे. मंगळवारपासून पावसाने जोर धरला असून शेतकरी पेरणीच्या व टोकणीच्या तयारीत आहेत. काही ठिकाणी ऊस लावण चालू झाली आहे. मंगळवारी दिवसभर संततधार सुरूच होती.
ंमेणी ओढ्यावरील पूल पाण्याखाली
कोकरूड : गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला असून या पाण्यामुळे मेणी ओढ्यातील पूल पाण्याखाली गेल्याने चार वाड्यांचा संपर्क तुटला आहे. शेतीचे बांध फुटल्याने नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सोमवारी व मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडल्याने संपूर्ण परिसरातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. येळापूर, गवळेवाडी मार्गावरील मेणी ओढ्यावर असणारा समतानगर येथील पूल पाण्याखाली गेल्याने हाप्पेवाडी, कांबळेवाडी, दीपकवाडी, समतानगर येथील वाडीचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे शेतातील बांध फुटून माती पिकासह वाहून गेली आहे.
कडेगाव तालुक्यात पावसाची रिमझिम
कडेगाव : तालुक्यात सोमवारी रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरु झाली आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असले तरी, शेतकरी अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कडेगाव तालुक्यात कडेगाव, कडेपूर, शाळगाव, वांगी, चिंचणी या सर्व परिसरात पावसाची रिमझिम सुरु झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाळ्यातील सुरूवातीच्या दीड महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने चिंतेत असलेले शेतकरी आता काहीसे सुखावले आहेत. यावर्षी एप्रिल, मे महिन्यात वळीवही म्हणावा तसा झाला नव्हता. त्यानंतर मान्सूनचीही सुरूवात धीमीच झाली. तरीही धाडसाने शेतकाऱ्यांनी उशिरा पेरण्यांची कामे उरकून घेतली. पण पावसाने निराशा केली होती. आता रिमझिम झुरू झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.
चांदोलीत २०.०६ टीएमसी पाणीसाठा
वारणावती : चांदोली पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे चांदोली धरणातील पाणीसाठा गेल्या २४ तासात एक टीएमसीने वाढला आहे. धरणातील पाणीसाठा २०.०६ टीएमसी झाला आहे. शिराळा पश्चिम विभागात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने हवेत गारठा निर्माण झाला आहे. पाणलोट क्षेत्रातून चांदोली धरणात येणाऱ्या प्रतिसेकंद ११ हजार ४५६ क्युसेक पाण्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासात ५३ मिलिमीटर पावसासह ९४५ मिलिमीटर पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापकावर झाली आहे. धरणाची पातळी ६१०.४० मीटर झाली आहे. सध्या धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.

Web Title: Rain rains everywhere in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.