महापालिका निवडणूक ताकदीने लढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:52 PM2018-06-03T23:52:25+5:302018-06-03T23:52:25+5:30

The municipal election fought hardly | महापालिका निवडणूक ताकदीने लढू

महापालिका निवडणूक ताकदीने लढू

Next


सांगली : गेल्या पाच वर्षांत सरकारच्या मदतीविना काँग्रेसच्या नगरसेवकांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. उलट भाजप सरकारने सांगलीबाबत दुजाभाव केला आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत पुन्हा काँग्रेस ताकदीने उतरणार असून, जनता पक्षाला साथ देईल, असा विश्वास आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केला.
सांगलीत काँग्रेस कमिटीच्यावतीने आमदार कदम यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, महापौर हारुण शिकलगार, प्रदेश उपाध्यक्ष शैलजा पाटील, स्थायी समितीचे सभापती बसवेश्वर सातपुते, नगरसेवक राजेश नाईक, अनारकली कुरणे, विशाल कलकुटगी उपस्थित होते.
कदम म्हणाले की, मदनभाऊ, पतंगराव कदम यांच्या निधनाने जिल्ह्यात काँग्रेसची मोठी हानी झाली आहे. पण आम्ही सर्व नेते एकत्र येऊन कार्यकर्त्यांत पोरकेपणाची भावना निर्माण होऊ देणार नाही. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेव्हा जिल्ह्यातील अनेक नेते राष्ट्रवादीत गेले. तेव्हाही काँग्रेसचे काय होणार, असा प्रश्न जनतेला पडला होता. पण काँग्रेस जिल्ह्यात ताकदीने उभी राहिली. महापालिकेनंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस ताकदीने लढणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या विधिमंडळ इतिहासात पहिल्यांदा बिनविरोध आमदार होण्याचे भाग्य लाभले. त्यामागे पतंगराव कदम यांची पुण्याईच होती. पतंगरावांनी शून्यातून जग निर्माण केले. ४० वर्षे जनतेची सेवा केली, असेही ते म्हणाले.
प्रतीक पाटील म्हणाले की, विश्वजित कदम यांची बिनविरोध निवड झाली असली तरी, भविष्यात विरोधकांशी दोन हात करावे लागणार आहेत. त्यांच्यासमोर मोठे आव्हान असेल. महापालिकेची निवडणूक काँग्रेससाठी अवघड नाही. आम्ही एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. काँग्रेसमधील गटबाजी संपविणार आहोत. काँग्रेस हाच आमचा गट, अशी भूमिका सर्वांची राहिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत केले. ते म्हणाले की, पतंगराव, मदनभाऊंच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून पुन्हा जिल्हा काँगे्रसमय करूया. महापालिकेसाठी काँग्रेसकडे सर्वात जास्त इच्छुक आहेत. सर्वांनी ताकदीने लढून महापालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले.
यावेळी नगरसेवक संतोष पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश चव्हाण, अजित दोरकर, अजित सूर्यवंशी, अमर निंबाळकर, अतुल माने, अल्ताफ पेंढारी, मालन मोहिते, सिद्धार्थ जाधव, प्रमोद सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कानपिचक्या
काँग्रेसच्या इच्छुकांकडून सोशल मीडियातून प्रचार सुरू आहे. कार्यक्रमासाठी प्रभागात डिजिटलही लावले जात आहेत. पण या डिजिटलवरून काही नेत्यांची छबीच गायब असते. तसेच महापालिकेच्यावतीने काही कार्यक्रमातून नेत्यांबद्दलचा प्रोटोकॉल पाळला जात नाही. त्याचा संदर्भ देत प्रतीक पाटील यांनी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कान टोचले. या इच्छुक उमेदवारांना ठराविक नेत्यांचीच गरज आहे का? इतर काँग्रेस नेत्यांची गरज भासणार नाही का? असा सवाल करीत प्रोटोकॉलनुसार सर्वांची छबी डिजिटलवर झळकली पाहिजे, असा सल्लाही दिला.

Web Title: The municipal election fought hardly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.