‘खाकी’कडून ६७ मुले दत्तक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:32 AM2019-02-11T00:32:26+5:302019-02-11T00:32:31+5:30

सचिन लाड । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कळत-नकळत ‘वाट’ चुकलेल्या समाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षित ६७ मुलांना जिल्हा पोलीस ...

Khakee 67 children adopted! | ‘खाकी’कडून ६७ मुले दत्तक!

‘खाकी’कडून ६७ मुले दत्तक!

Next

सचिन लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कळत-नकळत ‘वाट’ चुकलेल्या समाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षित ६७ मुलांना जिल्हा पोलीस दलाने गेल्या सहा महिन्यांत ‘दत्तक’ घेतले आहे. या मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहून नवी ‘दिशा’ दाखविण्यासाठी सामाजिक संघटनांची मदत घेतली आहे. या मुलांचे दादुकाका भिडे निरीक्षणगृहात समुपदेशन करून, त्यांना एका इन्स्टिट्यूटमध्ये विविध कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. १७ मुलांची पहिली ‘बॅच’ प्रशिक्षण घेऊन बाहेर पडली आहे. यातील दोन मुलांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केल्याने त्यांना नोकरीही मिळाली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी सहा महिन्यांपूर्वी उपेक्षित आणि दुर्लक्षित मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास ‘दिशा’ हे नाव देण्यात आले आहे. यामध्ये ‘स्नेहालय फौंडेशन’ व ‘खाकी प्रेस इंडिया’ या दोन सामाजिक संघटनांना सहभागी करून घेण्यात आले आहे. पोलीस दलातील ‘टीम’ व संघटनांचे पदाधिकारी धनंजय आरवाडे, प्रशांत पाटील, अ‍ॅड. मुक्ता दुबे यांनी संयुक्तपणे सांगली, मिरजेतील अहिल्यानगर, वाल्मिकी आवास, इंदिरानगर झोपडपट्टी, संजयनगर, ख्वाजा वसाहत याठिकाणी उपेक्षित व दुर्लक्षित मुलांचा शोध घेतला. या मुलांची तसेच त्यांच्या पालकांची घरी जाऊन भेट घेतली. ‘दिशा’ उपक्रमाची माहिती त्यांना दिली. ५० मुले या उपक्रमात सहभागी होण्यास तयार झाली. १४ ते १७ वयोगटातील ही मुले होती. या मुलांना कर्मवीर चौकातील दादुकाका भिडे निरीक्षण गृहात आणण्यात आले. तिथे निरीक्षण गृहातील मिलिंद कुलकर्णी यांच्यासह धनंजय आरवाडे व अ‍ॅड. मुक्ता दुबे यांनी मुलांचे समुपदेशन केले. मुलांचा शोध घेऊन समुपदेशन करण्यात तीन महिन्यांचा कालावधी गेला. ५० पैकी २५ मुले समुपदेशनानंतर विविध कोर्सचे प्रशिक्षण घेण्यास तयार झाली. त्यांना एका इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. एमएससीआयटी, हार्डवेअर, ड्रायव्हिंग, सॉप्टवेअर, मोबाईल दुरुस्ती आदी कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले. यातील १७ मुले प्रशिक्षण घेऊन तयार झाली. यातील दोन मुलांना १८ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांंना तातडीने नोकरीही मिळवून दिली आहे. १७ मुलांची ही बॅच यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी आणखी काही मुलांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आले.
अनाथ मुलेही दत्तक घेणार...
सांगली, मिरजेत अनाथालयात प्रचंड मुले आहेत. या मुलांनाही ‘दिशा’ उपक्रमात सहभागी करून घेण्याबाबत पोलीसप्रमुख सुहेल शर्मा व अतिरिक्त पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी निर्णय घेतला आहे. यासाठी अनाथालय व्यवस्थापनाशी चर्चाही करण्यात आली आहे. व्यवस्थापनानेही यास तयारी दर्शविली आहे. येत्या महिन्याभरात अनाथालयातील १५ मुलांची पहिली बॅच प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, तसेच सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत पोलिसांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. राज्यात प्रथमच सांगलीत पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
व्यवसायाची दिली संधी : मुलांना नोकरी किंवा त्यांना व्यवसायाची संधी, या दोन्ही गोष्टींच्या अनुषंगाने हा उपक्रम सुरू आहे. जिल्हा परिषद व जिल्हा उद्योग भवन यांच्याकडील शासकीय योजना तसेच व्यवसायासाठी लागणाऱ्या कर्जाची माहिती घेण्यात आली आहे. या दोन्ही विभागांकडून मुलांना मदत मिळवून दिली जाणार आहे.

Web Title: Khakee 67 children adopted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.