इलियास नायकवडी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:25 PM2019-07-07T23:25:26+5:302019-07-07T23:25:32+5:30

मिरज : राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवडी (वय ८३) यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. नायकवडी यांच्यावर गेले दोन ...

 Ilias Nayakawadi passed away | इलियास नायकवडी यांचे निधन

इलियास नायकवडी यांचे निधन

Next

मिरज : राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवडी (वय ८३) यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. नायकवडी यांच्यावर गेले दोन महिने रुग्णालयात उपचार सुरू होते.
आष्टा (ता. वाळवा) येथे १५ जुलै १९३६ रोजी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या इलियास नायकवडी यांना पाच भाऊ, दोन बहिणी आहेत. वडिलांचा शेती हाच व्यवसाय होता. प्रतिकूल परिस्थितीत आष्टा येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर कामेरी (ता. वाळवा) येथे जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून व पुढे सांगली जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात आटपाडी, कवठेमहांकाळ पंचायत समितीत उर्दू भाग शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. जिल्हा परिषदेत नोकरी करीत असताना राजकारणाकडे अधिक कल असल्याने राज्य वीज मंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन वाळव्याचे आमदार विश्वास पाटील यांच्या माध्यमातून राजारामबापू पाटील यांचे ते जवळचे व निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाऊ लागले.
प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत असताना पुरोगामी शिक्षक समिती ही शिक्षक संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची स्थापना केली. धडाडीचा कार्यकर्ता, बुद्धिचातुर्य व वक्तृत्व कलेमुळे, राजारामबापूंचे विश्वासू म्हणून त्यांनी राजकारणात स्थान मिळविले. त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन जनता पार्टीचे उमेदवार म्हणून मिरज विधानसभेची निवडणूक काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव शिंदे यांच्याविरोधात लढविली. त्या काळात वसंतदादा हे काँग्रेसचे सर्वेसर्वा असताना, दिग्गज प्रस्थापितांविरोधात नवखे उमेदवार असतानाही त्यांनी जोरदार संघर्ष केला. निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, मात्र त्या काळात त्यांच्या जबरदस्त भाषणशैलीचा जनमानसावर प्रभाव पडला. माजी आमदार विठ्ठलअण्णा पाटील त्यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध होते. मिरजेत त्यांनी जनता सहकारी कुक्कुटपालन संस्थेची स्थापना केली.
राजारामबापू पाटील यांचे कार्यकर्ते असल्याने मिरज परिसरात माजी आमदार संभाजी पवार, माजी आमदार व्यंकाप्पा पत्की, माजी आमदार शरद पाटील, नानासाहेब सगरे, अण्णासाहेब डांगे, अजितराव घोरपडे, बापूसाहेब पुजारी असे अनेक सहकारी त्यांना मिळाले. मिरजेतील आझाद शिक्षण संस्थेचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, अरबी उर्दू मराठी शाळा या शैक्षणिक संस्था जनाब यांनी चालविल्या. आपल्या बुद्धिचातुर्याने अनेक दिग्गजांना नामोहरम करत राजकारणात त्यांनी वेगळा ठसा उमटवला. तत्कालीन नगरपालिका व महापालिकेत त्यांनी सातत्याने प्रस्थापितांना हादरे दिले. मिरज नगरपालिकेत सून वहिदा नायकवडी व पुत्र इद्रिस नायकवडी यांना नगराध्यक्ष व महापालिकेत त्यांच्या कुटुंबातील एकाचवेळी तीन-तीन नगरसेवक निवडून आणण्याची किमया त्यांनी केली. पुढे पुत्र इद्रिस नायकवडी यांना महापौर पदावर विराजमान करण्याचा यशस्वी प्रयोगही त्यांनी केला.
जीवनातील अनेक संघर्षांना तोंड देत राजकारणात आपले स्थान कायम करणाऱ्या इलियास नायकवडी यांचा प्रवाहाविरुद्ध जाण्याचा स्थायीभाव होता. राजारामबापूंनी त्यांची औरंगाबाद विभागीय निवड मंडळावर सदस्य म्हणून निवड केली होती. मिरज नगरपरिषद प्राथमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. जयंत पाटील, विलासराव शिंदे, आर. आर. पाटील, हसन मुश्रीफ यांच्याबरोबर राजकीय प्रवास केला. एखाद्या विषयाच्या समर्थनार्थ व विरोधात दोन्ही बाजू मांडण्याची त्यांची क्षमता प्रचंड होती. उदाहरण व कथा सांगून एखादी गोष्ट पटवून देण्याची त्यांची शैली होती. इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक असलेले इलियास नायकवडी पंचतंत्र, इसापनीती, बोधकथा यांचा भाषणात समर्पक उपयोग करून उद्बोधन करीत असत. मेंदूच्या आजारामुळे गेले दोन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी त्यांचे निधन झाले.

Web Title:  Ilias Nayakawadi passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.