सचिन लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ‘खून का बदला खून’ आणि वर्चस्वाच्या वादातून शहरात सातत्याने टोळीयुद्धाचा भडका उडत आहे. याच टोळीयुद्धातून गेल्या दहा वर्षांत २० गुंडांची ‘गेम’ झाली आहे. बहुतांशी खून हे ‘खून का बदला खून’ यातूनच झाले आहेत. या खुनांतून ७५ नवीन गुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डवर आले. अनेक खुनातील संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. काही प्रकरणात शिक्षा लागली, तर काही प्रकरणे अजूनही न्यायप्रविष्ट आहेत. पण अजूनही टोळीयुद्ध आणि खून का बदला खून हा सिलसिला सुरुच आहे.
विजय माने, संतोष माने, रफीक शेख, संजय पोतदार, सोमनाथ सकपाळ, विठ्ठल शिंदे, कोंडीबा शिंदे, फिरोजखान पठाण, विजय जाधव, इम्रान मुल्ला, मिर्झा शेख, अकबर अत्तार, रवींद्र माने, दीपक पाटील, रवी कांबळे, संदीप हराळे आदी गुंडांचा टोळीयुद्धातून खून झाला आहे. यातील कोंडीबा शिंदे सोडला, तर अन्य सर्व मृत पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होते. यातील अपवाद वगळता एक-दोन प्रकरणात संशयितांना जन्मठेपेची शिक्षा लागली आहे. अनेक खटल्यांची सुनावणी सुरु आहे. आपल्या भागात वर्चस्व कोणाचे? यावरुन प्रथम गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वाद सुरु होतो. पुढे हा वाद चांगलाच विकोपाला जाऊन टोळीयुद्धाचा भडका उडतो. आपली ‘गेम’ होईल, या भीतीने अनेक गुंड जवळ हत्यार बाळगून असतात. अंमली पदार्थाची नशा केल्याने, त्यांना आपण काय करतो, हे समजत नाही. परिणामी एकमेकांना संपविण्याचा ‘कट’ रचून तो पूर्णत्वास लावला जात आहे.
गेल्या दहा वर्षातील गुन्हेगारीवर ‘नजर’ टाकली, तर पूर्वीच्या टोळ्या पडद्याआड गेल्या आहेत. ज्या टोळ्या रेकॉर्डवर आल्या, त्याही ‘मोक्का’ कायद्यान्वये जेरबंद केल्या आहेत. पण गेल्या दहा वर्षात जे खून, खुनीहल्ले झाले, त्यामधील काही गुन्हेगार टोळ्या निर्माण करुन दादागिरी करीत आहेत.
आपला साथीदार किंवा नातेवाईक याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ते सुडाने पेटून उठत आहेत. गुंड रवी कांबळे, रवी माने, फिरोजखान पठाण यांचा भरदिवसा खून झाला. या तीनही खुनातील संशयित वेगळे असले तरी, त्यांची गुन्हा करण्याची पद्धत एकच आहे. कठोर कारवाई होऊनही ते कायद्याला जुमानत नसल्याचे चित्र आहे. गुन्हा केल्यानंतर जामिनावर बाहेर येऊ, असा समज करुन त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरुच आहेत. गल्ली-बोळातील ‘दादा’ होण्याची स्वप्ने त्यांना पडत आहेत.
मिसरुडही न फुटलेले आरोपी...
मिसरुडही न फुटलेली पोरं पोलिसांच्या अनेक कारवायांमध्ये सापडत आहेत. त्यांच्याकडे कधी तलवार, तर कधी पिस्तूल सापडत आहे. काही पोरं चोºया करताना सापडतात, पुढे ती गंभीर गुन्हे करण्याच्या वाटेला लागलेली दिसत आहेत. गेल्या सहा महिन्यांत अनेक लहान मुले रेकॉर्डवर आली आहेत. गेल्या महिन्यात चैतन्यनगरमध्ये झालेल्या खुनातील संशयित १६ वर्षाचा निघाला. यावरुनच सांगलीच्या तरुणाईचा गुन्हेगारी प्रवास कळतो.

दहशत आणि दादागिरी
एकमेकांचा खून करण्यासाठी सुडाने पेटलेल्या टोळ्यांतील गुन्हेगारांची न्यायालयाच्या आवारातही दादागिरी सुरु असते. साक्षीदार व फिर्यादींना दादागिरी केली जाते. साक्षीदारांवर दबाव आणून, आपल्याविरुद्ध साक्ष दिलीस तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली जाते. दोन महिन्यापूर्वी इम्रान मुलाच्या खून-खटल्याच्या सुनावणीवेळीही असाच प्रकार घडला. या दोन्ही गटात सुरु असलेला संघर्ष पोलिस ठाण्यापर्यंत अनेकदा गेला. पोलिस कारवाई झाली तरी, त्यांच्यातील संघर्षाला पूर्णविराम मिळालेला नाही. अखेर इम्रानच्या खुनाचा आरोप असलेल्या फिरोजखानचा दोन दिवसापूर्वी खात्मा केला. पण यातून संघर्ष वाढतच राहण्याची चिन्हे आहेत.