सांगलीत ऊसदर आंदोलनाचा भडका, 60 बैलगाड्यांच्या टायरमधील सोडली हवा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 01:22 PM2017-11-03T13:22:30+5:302017-11-03T13:22:53+5:30

ऊसाला ३४०० रुपयांची पहिली उचल मिळालीच पाहिजे, या मागणीवरुन आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी ( 2 नोव्हेंबर ) गळीत हंगामाच्या प्रारंभादिवशीच राजारामबापू कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणा-या ४० बैलगाड्यांच्या चाकातील हवा सोडून खळबळ माजवली. 

Farmers Strike in Sangli | सांगलीत ऊसदर आंदोलनाचा भडका, 60 बैलगाड्यांच्या टायरमधील सोडली हवा 

सांगलीत ऊसदर आंदोलनाचा भडका, 60 बैलगाड्यांच्या टायरमधील सोडली हवा 

Next

इस्लामपूर (सांगली) - ऊसाला ३४०० रुपयांची पहिली उचल मिळालीच पाहिजे, या मागणीवरुन आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी ( 2 नोव्हेंबर ) गळीत हंगामाच्या प्रारंभादिवशीच राजारामबापू कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणा-या ४० बैलगाड्यांच्या चाकातील हवा सोडून खळबळ माजवली.  त्याचबरोबर हुतात्माकडे जाणा-या २० ऊस बैलगाड्यांच्या चाकातील हवा सोडून त्यांचीही ऊस वाहतूक रोखून धरल्याची माहिती सूत्रांनी सांगितले. ऊसाच्या दरावरून साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आंदोलनाची ठिणगी पडली आहे. या ठिणगीचा कोणत्याहीक्षणी भडका उडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

शनिवारी ऊस दराबाबत सहकार मंत्र्यांसोबत होणा-या बैठकीपूर्वीच अनेक कारखान्यांनी आपली धुराडी पेटविल्याने, जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत स्वाभिमानीने दिलेला पहिल्या उचलीचा अल्टीमेटम कारखानदारांनी धुडकावून लावला आहे. त्यामुळे स्वाभिमानीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचा स्वाभिमान दुखावल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आष्टा परिसरासह पलूस तालुक्यातील ऊस तोडी बंद पाडल्या होत्या. त्यानंतर उसाच्या पहिल्या उचलीचा निर्णय होईपर्यंत शेतक-यांनी ऊस तोडी घेऊ नयेत, असे आवाहन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केले होते. मात्र तरीही ऊस तोडी आणि उसाची वाहतूक सुरुच राहिल्याने खवळलेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी ‘राजारामबापू’ आणि ‘हुतात्मा’च्या कार्यक्षेत्रात ऊस वाहनांच्या टायरमधील हवा सोडून ऊस वाहतूक रोखून धरली.

गुरुवारी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत इस्लामपूर, नवेखेड, जुनेखेड, बोरगाव, रेठरेहरणाक्ष, राजारामनगर फाटा, पुणदी, नागराळे अशा गावांमधील ऊस वाहतूक रोखली. इस्लामपूरच्या शाहुनगर परिसरात ‘राजारामबापू’साठी ऊस वाहतूक करणा-या बैलगाड्यांच्या टायरमधील हवा सोडल्यानंतर तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी कारखान्याच्या शेती विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही तेथे जाऊन परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवली. अन्य आंदोलकांकडेही पोलिसांचे लक्ष आहे.

शेतक-यांच्या हितासाठीच आंदोलन : महेश खराडे 
ऊस दराचे आंदोलन हे शेतक-यांच्या हितासाठीच आहे. आंदोलनाच्या माध्यमातून शेतक-यांचे नुकसान करण्याचा कोणताही हेतू नाही. त्यामुळे शेतक-यांनी दर जाहीर होईपर्यंत थोडा धीर धरावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे यांनी गुरुवारी केले. ते म्हणाले की, ऊस दराच्या बाबतीत सध्या सुरू असलेला संघर्ष हा शेतक-यांच्या हिताचा आहे. सर्वच शेतक-यांनी याबाबतीत एकजूट दाखवून धीर धरण्याची गरज आहे. ही एकजूट होऊन ऊसतोड थांबली, तर कारखानदार आणि शासन यांना शेतक-यांच्या बाजूने निर्णय घ्यावाच लागेल. त्यासाठीच आमचा संघर्ष सुरू आहे. शेतक-यांनी ऊस तोड थांबवून या आंदोलनास साथ द्यावी. शेतक-यांच्या बांधावर जाऊन तोड रोखणे किंवा ट्रॅक्टर अडविणे ही गोष्ट कोणत्याही कार्यकर्त्याला न पटणारीच आहे. मात्र आंदोलनाची धार कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत. शेतक-यांचे हित साधले जाऊ नये म्हणूनही ताकद वापरली जात आहे. त्यामुळेच आम्ही शेतक-यांच्या एकजुटीची ताकद दाखवून देत आहोत. लवकरच याबाबतचा निर्णय कारखानदार व शासनाला घ्यावा लागेल. कारखाने जोपर्यंत दर जाहीर करीत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याकडे ऊस येणार नाही, हा निर्धार आम्ही केला आहे. त्याप्रमाणेच आंदोलन सुरू आहे. लवकरच या आंदोलनाला यश येईल आणि शेतक-यांचे हित साधले जाईल, असे खराडे म्हणाले. 

शेतक-यांनीच तोडी घेऊ नयेत : जाधव
उसाचा पहिला हप्ता कारखानदारांनी ताबडतोब जाहीर करावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन आणखी तीव्र करेल. शेतक-यांनी दराचा निर्णय होईपर्यंत काही दिवस थांबावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी केले आहे.

Web Title: Farmers Strike in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी