मतदारांत अविश्वास आणि अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:38 PM2019-04-12T23:38:08+5:302019-04-12T23:38:14+5:30

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क । सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे ...

Disbelief and uncomfortable among the voters | मतदारांत अविश्वास आणि अस्वस्थता

मतदारांत अविश्वास आणि अस्वस्थता

Next

शरद जाधव ।

लोकमत न्यूज नेटवर्क ।

सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे कशापद्धतीने पाहतात, त्यांच्या नजरेतून कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जायला हवेत, याचा आढावा घेणारी ही मुलाखत...
साहित्यिक, अभ्यासक म्हणून तुम्ही सध्याच्या निवडणुकीच्या वातावरणाकडे कसे पाहता?
पहिल्या निवडणुकीपासून मला अनुभव आहे. पहिली निवडणूक सोडली तर, प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविला आहे. आजच्या मतदारांमध्ये प्रकर्षाने अस्वस्थता दिसून येते आहे. अविश्वासाचे वातावरण वाढत आहे. सर्वच घटकांमध्ये अस्वस्थता व त्याबद्दलचा विश्वास वाटत नसल्याचे या निवडणुकीतच दिसून येत आहे. साहित्यिक म्हणून हे अस्वस्थ करणारे आहे.
लोकसभा निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असायला हवेत?
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षणाचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शिक्षणासाठी भरीव तरतूद व क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी प्रत्यक्षात कृती होताना दिसत नाही. प्राथमिक शिक्षणाचा पाया खूपच कमकुवत आहे. डिजिटलायझेशनकडे लक्ष देताना श्रम आणि शिक्षणाची सांधेजोड होताना दिसत नाही. शिक्षणाबद्दल खूप मोठी अनास्था असून, शिक्षण घेतलेल्यांनी श्रम करायचेच नाहीत, असा समज निर्माण झालेला आहे. शिक्षण क्षेत्राला अग्रस्थान हवे.
तुमच्या क्षेत्राशी निगडित मुद्द्यांना राजकीय पक्ष किती महत्त्व देतात?
भाषिक प्रश्न अद्यापही कायम आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा, याची अनेक वर्षांपासूनची मागणी असली तरी, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. संशोधनासाठी निरामय वातावरण मिळत नसून, त्यात सवंगपणा आला आहे. विद्यापीठस्तरावर संशोधनात सुमारपणा आला आहे. कसदार साहित्य निर्माण होताना दिसत नाही आणि प्रामाणिक संशोधकांना शासकीय पातळीवर दडपण सहन करावे लागत आहे.
नवीन मतदारांना
काय आवाहन कराल?
प्रत्येक पिढीच्या समस्या वेगळ्या आहेत. समाजातील अनेक स्तरावर कार्यरत तरूणांच्या काही अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी मतदान जरूर करावे. सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळण्यासाठी मतदान करावे.

Web Title: Disbelief and uncomfortable among the voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.