सांगली : अनिकेत कोथळेच्या कुटुंबास ठार मारण्याचा कट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 12:52 PM2018-10-28T12:52:58+5:302018-10-28T12:54:08+5:30

सांगली शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबियास ठार मारण्यासाठी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातील कैद्याने ‘सुपारी’ घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

conspiracy to kill the family of Aniket kothale in sangli | सांगली : अनिकेत कोथळेच्या कुटुंबास ठार मारण्याचा कट

सांगली : अनिकेत कोथळेच्या कुटुंबास ठार मारण्याचा कट

सांगली : सांगली शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबियास ठार मारण्यासाठी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातील कैद्याने ‘सुपारी’ घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ही बाब समजताच कोथळे कुटुंबियांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. पण संरक्षण दिले नाही. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना तरी देण्याची मागणी केली आहे.

सांगली शहर पोलिसांनी लुटमारीच्या गुन्ह्यात 6 नोव्हेंबर 2017 रोजी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला उलटा टांगून बेदम मारहाण केली होती. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी अनिकेतचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदूर्ग) येथे जाळला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहूल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले व कामटेचा मामेसासरा बाबासाहेब कांबळे यांना अटक केली होती. कामटेसह पाच पोलिसांना बडतर्फ करण्यात आले आहे. सध्या ते कळंबा कारागृहात आहेत. केवळ कांबळे जामिनावर बाहेर आहे. घटनेनंतर कोथळे कुटुंबास सहा महिने पोलीस संरक्षण दिले होते. घराबाहेर 24 तास पोलिसांचा पहारा होता. त्यानंतर संरक्षण काढून घेण्यात आले.

अनिकेत कोथळेचे बंधू आशिष यांच्या मित्राचा मित्र एका गुन्ह्यात कळंबा कारागृहात आहे. या मित्राला भेटण्यासाठी तो काही दिवसापूर्वी कळंब्याला गेला होता. त्यावेळी कारागृहात असलेल्या मित्राने कोथळे कुटुंबाला ठार मारण्यासाठी येथून ‘सुपारी’ दिल्याचे सांगितले. ही सुपारी एकाने घेतली असल्याचेही त्याने सांगितले. मित्राने सांगलीत आल्यानंतर ही बाब आशिष यांना सांगितली. आशिष यांनी शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांना भेटून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आशिष यांच्या मित्रास बोलावून त्याचा जबाबही नोंदवून घेतला. आशिष यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांची भेट घेऊन कुटूंबास पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. मात्र त्यांना संरक्षण मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी शस्त्र परवान्यासाठी प्रस्ताव दिला आहे. शहर पोलीस पोलीस शस्त्र परवाना देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
 

Web Title: conspiracy to kill the family of Aniket kothale in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.