मुख्यमंत्र्यांना विश्वविक्रम करायचाय..! पालकांनो, सेल्फी अपलोड करा; संदेशपत्रासाठी शाळा वेठीस
By संतोष भिसे | Published: February 28, 2024 12:42 PM2024-02-28T12:42:33+5:302024-02-28T12:42:58+5:30
पत्र नव्हे, निवडणुकीचा प्रचार
संतोष भिसे
सांगली : चोवीस तासांत लिहिलेल्या पत्रांचा सर्वांत मोठा ऑनलाइन अल्बम बनवून विक्रम करण्याचा शासनाचा मानस मनात आहे. या हट्टापोटी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी गेल्या महिन्याभरापासून वेठीस धरले गेले आहेत.
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमात १ लाख ३ हजार ३३३ सरकारी व खासगी शाळांनी सहभाग घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिलेले संदेशपत्र २ कोटी ११ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. ते प्रत्येकाने शाळेत वाचण्याचे फर्मान गेल्या पंधरवड्यात निघाले. त्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांनी घरी पत्र वाचून सेल्फी अपलोड करण्यास सांगितले गेले.
हा खटाटोप संपण्यापूर्वीच रविवारी (दि. २५) नवे फर्मान येऊन थडकले. संदेशपत्र पालकांनी वाचून त्यावरील अभिप्रायाचे छायाचित्र www.mahacmletter.in या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे. २४ तासांत सर्वाधिक पालकांनी लिहिलेल्या व अपलोड केलेल्या अभिप्रायाचा ऑनलाइन विश्वविक्रम करण्याचा प्रशासनाचा मनोदय आहे. या कामासाठी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊपासून २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजून ५९ मिनिटे, असा २३ तास ५९ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता.
अनंत अडचणी परी..
मुख्यमंत्र्यांच्या संदेशपत्रासाठी नेटवर्कच्या अडथळ्यासह अनंत अडचणींचा सामना करत पालकांनी सेल्फी अपलोड केले. ‘तुम्ही सांगितलंय, तर तुम्हीच करा’ असे म्हणत काही पालकांनी शाळेत येऊन शिक्षकांसमोर ठिय्याही मारला.
पत्र नव्हे, निवडणुकीचा प्रचार
मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यास लिहिलेले संदेशपत्र म्हणजे जणू निवडणुकीच्या प्रचाराचा नमुनाच आहे. ते म्हणतात, (थोडक्यात गोषवारा) : चंद्रयान ३ मोहिमेने भारताचे नाव अंतराळावर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही सुविधा उपलब्ध केल्या आहेत. वाचन व साहित्यात अभिरुची वाढीसाठी महावाचन महोत्सव राबविणार आहोत. ‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेतून विद्यार्थ्यांना बूट, पायमोजे, गणवेश देऊ. पुस्तकाचे ओझे कमी करण्यासाठी वहीची पाने जोडली आहेत.
आम्हाला शिकवू द्या
संदेशपत्रासोबत सेल्फी आणि शैक्षणिक गुणवत्ता यांचा काही परस्परसंबंध असावा असे वाटत नाही. सेल्फी घेऊन अपलोड करणे, हा शिक्षकांच्या कामाचाही भाग नाही. अध्यापनाच्या व्याख्येत ते बसत नाही. अन्य सर्व अशैक्षणिक उपक्रमांतून आम्हाला मुक्त करा आणि मुलांना शिकवू द्या, अशी आमची मागणी आहे. - कृष्णा पोळ, सरचिटणीस, शिक्षक भारती