सांगलीत विनामोबदला पंचवीस वर्षे कृष्णामाईची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 11:55 PM2019-06-08T23:55:22+5:302019-06-08T23:57:24+5:30

अशोक डोंबाळे । सांगली : ‘देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे’, असे महात्मा गांधी मानत असत. या विधानाचा ...

 Cleanliness of Krishnamachi for 25 years in Sangli | सांगलीत विनामोबदला पंचवीस वर्षे कृष्णामाईची स्वच्छता

स्वच्छतादूत सतीश दुधाळ यांच्या तीनचाकी सायकलीवरही स्वच्छतेचा संदेश देणाºया ओळी लिहिल्या आहेत.

googlenewsNext
ठळक मुद्देसुशिक्षितांनाही लाजवणारी कामगिरी । स्वामी समर्थ घाट ते वसंतदादा स्मारकापर्यंत हमालाकडून नियमित सेवा --संडे हटके बातमीफोटोसेशनपुरते स्वच्छता अभियान राबविणाऱ्यांना लाजवेल अशी ही कामगिरी आहे.

अशोक डोंबाळे ।
सांगली : ‘देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे’, असे महात्मा गांधी मानत असत. या विधानाचा स्वच्छतादूत सतीश कऱ्याप्पा दुधाळ यांच्या मनावर प्रभाव आहे. त्यामुळेच ते वयाच्या पंधराव्या वर्षापासून सांगलीतील कृष्णा नदी आणि स्वामी समर्थ घाट ते वसंतदादा स्मारक परिसराची अखंडित पंचवीस वर्षे विनामोबदला स्वच्छता करीत आहेत. फोटोसेशनपुरते स्वच्छता अभियान राबविणाऱ्यांना लाजवेल अशी ही कामगिरी आहे.

चाळीसवर्षीय सतीश दुधाळ येथील जामवाडीत राहतात. शिक्षण जेमतेम पाचवीपर्यंत झाले आहे. घरच्या दारिद्र्यामुळे शिक्षण न घेता खेळण्या-बागडण्याच्या वयातच त्यांना गणपती पेठेत हमालीचे काम करावे लागले. मात्र त्यांनी कधीही परिस्थितीचे भांडवल केले नाही. स्वत:ला शिक्षण घेता आले नाही, म्हणून त्यांनी मुलांना उच्चशिक्षित बनविण्याचा निश्चय केला आहे. याचबरोबर त्यांना लहान वयापासूनच सामाजिक कार्याची ओढ लागली. सतीश वयाच्या पंधराव्या वर्षापासून सांगलीतील स्वामी समर्थ घाट येथील कृष्णा नदीत पोहण्यासाठी जातात. तेव्हापासून ते सकाळी एक तास स्वच्छता अभियान एकटेच राबवितात. एका हातात झाडू आणि दुसºया हातात डस्टबिन घेऊन, जिथे कचरा दिसेल तेथे जाऊन कचरा उचलतात.

मागील पंचवीस वर्षापासून ते कृष्णामाईची स्वच्छता करीत आहेत. रोज सकाळी सहा ते सातपर्यंत स्वच्छता अभियान राबविणे, हा त्यांचा नित्यक्रम आहे. रोज शंभर ते दीडशे किलो कचरा गोळा करून कुंडीत टाकत आहेत. स्वच्छता करीत असताना अनेक वाईट प्रसंगही आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, अनेक सुशिक्षित लोक गुटखा, मावा खाऊन मी स्वच्छता करीत असताना समोरच पिचकाºया, प्लास्टिकच्या रिकाम्या पुड्या टाकतात. खूप वाईट वाटते. हे लोक मानसिकदृष्ट्या कधी सुशिक्षित होतील, असा प्रश्न पडतो. काहीजण पूजेचे साहित्य टाकतात. अशिक्षितांना सांगून पटते. ते नदीपात्राबाहेर निर्माल्य ठेवतात. पण, सुशिक्षित मंडळींना सांगूनही पटत नसल्यामुळे ते नदीतच टाकतात.

सतीश यांची मालवाहतुकीची तीनचाकी सायकल आहे. या सायकलवरही त्यांनी ‘आपली कृष्णामाई स्वच्छ कृष्णामाई’, ‘जल है तो कल है’ असा संदेश मोठ्या अक्षरात लिहिला आहे. संपूर्ण भूमी कचरामुक्त झाली पाहिजे, या हळव्या ध्यासाप्रती आपण अखंड स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते स्वच्छता अभियानात ऊर्मीने काम करतात. अनेक स्वच्छता दूत तयार करायचे आहेत, अशी त्यांची अपेक्षा आहे. स्वयंप्रेरणेतून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.स्वच्छता स्वत:पासून झाली पाहिजे. स्वच्छ परिसर ठेवणे व स्वच्छता राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ही भावना ज्यावेळी प्रत्येकाच्या मनात येईल, तेव्हाच ही भूमी कचरामुक्त होईल, असेही त्यांचे मत आहे.

डस्टबिनची साथ सोडली नाही
सध्या काहीजण स्वच्छता अभियान केवळ फोटोसेशनपुरते करतात. मात्र सतीश कुठेही गेले तरी त्यांच्यासोबत डस्टबिन कायम असते. ते रस्त्यावरील व रेल्वेने प्रवास करीत असताना कचरा गोळा करुन डस्टबीनमध्ये टाकतात. हा त्यांचा नित्यक्रम मागील पंचवीस वर्षांपासून सुरू आहे.

स्वच्छतेसाठी अनेकांची मदत
किसन जाधव, तात्या शिंदे, सुभाष सदलगे हेही कृष्णामाईची स्वच्छता करीत होते. या ज्येष्ठांचा आदर्श आणि महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश यामुळेच मलाही स्वच्छतेची आवड निर्माण झाली. सरकार ग्रुप, कृष्णामाई जलतरण संस्थेच्या पदाधिकाºयांचाही कृष्णा नदी परिसर स्वच्छ ठेवण्यात मोलाचा वाटा आहे. कृष्णामाई जलतरण संस्थेचा मी सध्या सदस्य झालो आहे. विजय कडणे आणि आभाळमाया फौंडेशनचे संस्थापक प्रमोद चौगुले यांनी वेळोवेळी पाठीवर कौतुकाची थाप दिल्यामुळे स्वच्छता अभियानास बळ मिळाले आहे, असे सतीश दुधाळ यांनी सांगितले.


 

Web Title:  Cleanliness of Krishnamachi for 25 years in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.