राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:05 PM2018-09-30T23:05:36+5:302018-09-30T23:05:52+5:30

The BJP's procession in the citadel of NCP | राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची खलबते

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची खलबते

Next

अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शेतकरी नेते शरद जोशी, खासदार राजू शेट्टी यांच्या काळ्या मातीतील तालमीत तयार झालेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आता कोल्हापूरचे भाजपमधील वस्ताद महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या लाल मातीच्या तालमीत आगामी लोकसभा आणि विधानसभा मैदानाची तयारी सुरू केली आहे. यासाठी या दोन्ही मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात राजकीय जोर—बैठका काढून शड्डूही ठोकला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळातील आपले स्थान भक्कम केले. परंतु त्यांच्याबद्दल शेतकºयांमधूनच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. म्हणूनच त्यांनी आता शेतकºयांचे नेते म्हणून भाजपची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी प्रथम विकास आघाडीचे इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे वैभव शिंदे यांना भाजपमध्ये आणले. याव्यतिरिक्त त्यांच्या गळाला काहीच लागलेले नाही. म्हणूनच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर मतदारसंघ केंद्रबिंदू ठेवून भाजपच्या नेत्यांना आमंत्रित केले जात आहे.
सांगली — सातारा — कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील भाजपचे मंत्री, विद्यमान खासदार, आमदार, जि. प. अध्यक्ष, सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस आदी प्रमुख पदाधिकाºयांचा गोपनीय मेळावा इस्लामपूर येथे निशिकांत पाटील यांच्या शिक्षण संकुलात झाला. यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्याची रणनीती ठरविण्यात आली, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अगोदरच शड्डू ठोकला आहे. त्यांनाच बळ देण्यावरही मंथन झाले.
इस्लामपूर, शिराळा, पलूस—कडेगाव विधानसभा मतदारसंघातील बुथनिहाय काम अत्यंत चांगले झाले आहे. या मतदारसंघात भाजपला घवघवीत यश मिळेल, असाही सूर या बैठकीतून निघाला.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कितीही प्रयत्न केले तरी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ३० वर्षाहून अधिक काळ आमदार व मंत्री म्हणून इस्लामपूर मतदारसंघावर असलेली पकड ढिली करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना जंग जंग पछाडावे लागणार, हे मात्र निश्चित.
म्हणूनच इस्लामपूर केंद्रस्थानी...
जयंत पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न, राजू शेट्टी यांना रोखण्याची तयारी करताना चारही लोकसभा मतदारसंघांशी जुळलेली इस्लामपूरची नाळ हेरून भाजपकडून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर मतदारसंघच केंद्रबिंदू ठेवून भाजपच्या नेत्यांना आमंत्रित केले जात आहे.

Web Title: The BJP's procession in the citadel of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.