राज्य जिंकण्याची सुरुवात सांगलीतूनच : अशोक चव्हाण -मिरजेत काँग्रेसची वचनपूर्ती सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:21 AM2018-05-03T00:21:22+5:302018-05-03T00:21:22+5:30

सांगली : ज्यांनी मोठमोठ्या घोषणा करून आणि जनतेला पूर्ण न होणारी आश्वासने देऊन सत्ता मिळविली, त्या भाजप सरकारला जनतेच्या प्रश्नांशी देणे-घेणे नाही, हे सिध्द झाले आहे

The beginning of winning the state from Sangli: Ashok Chavan - Congress meeting in Mumbai | राज्य जिंकण्याची सुरुवात सांगलीतूनच : अशोक चव्हाण -मिरजेत काँग्रेसची वचनपूर्ती सभा

राज्य जिंकण्याची सुरुवात सांगलीतूनच : अशोक चव्हाण -मिरजेत काँग्रेसची वचनपूर्ती सभा

Next
ठळक मुद्दे सांगली महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले

सांगली : ज्यांनी मोठमोठ्या घोषणा करून आणि जनतेला पूर्ण न होणारी आश्वासने देऊन सत्ता मिळविली, त्या भाजप सरकारला जनतेच्या प्रश्नांशी देणे-घेणे नाही, हे सिध्द झाले आहे. सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाणीव नसलेल्या या सरकारला खाली खेचण्याची वेळ आली असून राज्यात व देशात पुन्हा कॉँग्रेसची सत्ता आणण्यासाठी जिंकण्याची सुरूवात सांगलीमधून करणार असल्याचे प्रतिपादन कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी मिरज येथे केले.
कॉँग्रेसच्यावतीने मिरज येथील किसान चौकात आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात चव्हाण बोलत होते. पेट्रोलचे वाढते दर, नोटाबंदी, जीएसटीमुळे सर्वसामान्य जनतेचे झालेले हाल या प्रश्नांवर कॉँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी भाजप सरकारवर टीकेची झोड उठविली. कॉँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
चव्हाण पुढे म्हणाले की, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा एकदा आश्वासने देण्यास, जनतेला आमिषे दाखविण्यास सुरूवात केली आहे. मात्र, सूज्ञ जनता याला भुलणार नाही. नांदेडमध्ये अनेक आव्हाने असतानाही तेथील जनतेने कॉँग्रेसला स्पष्ट कौल दिला. तसाच कौल सांगलीतील जनता कॉँग्रेसला देणार आहे. भाजप सरकारकडून प्रत्येक कामात अडथळा आणण्याचे काम सुरू आहे. तरीही न डगमगता महापालिका क्षेत्रासाठी सत्ताधारी कॉँग्रेसने अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या महापालिका निवडणुकीतही कॉँग्रेसला एकहाती सत्ता जनतेने द्यावी. येणारे राज्य हे कॉँग्रेसचेच असल्याने त्याची सुरूवात सांगलीतील विजयाने होणार आहे.
आजवर कधीही खोटे बोलून कॉँग्रेसने कधी सत्ता मिळविली नाही. मात्र, खोटे बोलून आणि जनतेला न पूर्ण होणारी आश्वासने देऊन भाजपने राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळविली. तरूणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले. मात्र, त्यातील एक लाखही नोकºया ते देऊ शकले नाहीत. भाजप सरकारच्या काळात महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचाच आमदार अत्याचार प्रकरणात आहे, तर जम्मूमध्ये अत्याचार करणाºयांच्या समर्थनार्थ भाजप आमदार आंदोलन करतात. यावरून भाजप ही भारतीय जनता पार्टी नसून भारत जलाओ पार्टी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजपने सत्तेवर येताना जनतेला दिलेले एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेले नाही. यावरून हे फसवणूक करणारे शासन असल्याचे सिध्द होते. नोटाबंदी आणि जीएसटीसारखा अविचारी निर्णय घेणाºया भाजपमुळे सर्वसामान्य जनतेचे मोठे हाल होत आहेत. कृषिप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या आपल्या देशाचा कृषी विकास दर ८ टक्क्यांनी घसरला, तरीही या सरकारला शेतकºयांची काळजी नाही. त्यासाठी सत्तेपासून भाजपला रोखण्यासाठी कॉँग्रेसचे कार्यकर्ते प्रयत्न करतील. राज्यघटना बदलण्याची भाषा करणाºया या सरकारचे धोरण धोकादायक असून त्यापासून देशाला वाचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एक होऊन केंद्रात आणि राज्यातही भाजपला सत्तेवरून खाली खेचावे. सर्व मतभेद विसरून सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व पुन्हा एकदा महापालिकेवर कॉँग्रेसचा तिरंगा फडकवावा.
राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यात योगदान नसणारे भाजपचे नेते आता देशभक्ती शिकवू लागले आहेत. राष्टÑीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ ची असताना, संघाने स्वातंत्र्य लढ्यात सहभागी न होता ब्रिटिशांच्या बाजूने लढण्यात धन्यता मानली. ६० वर्षात प्रथमच भाजप सरकारच्या काळात न्यायाधीशांनाही असुरक्षित वाटू लागले आहे. पंतप्रधान मोदींचे मंत्रीच, आम्ही संविधान बदलण्यासाठी सत्तेवर आल्याचे सांगत असल्याने, असल्या धोकादायक सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी मंत्री प्रतीक पाटील यांचीही भाषणे झाली. कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत केले, तर प्रा. सिध्दार्थ जाधव यांनी आभार मानले.
आ. सतेज पाटील, महापौर हारूण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, बसवेश्वर सातपुते, शरद रणपिसे, शैलजा पाटील आदी उपस्थित होते.

राष्टÑवादीशी आघाडीचा निर्णय जरा जपूनच...
कॉँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील म्हणाले की, आगामी महापालिका निवडणुकीत कॉँग्रेससाठी अत्यंत चांगले वातावरण आहे. वरिष्ठ पातळीवर राष्टÑवादीशी आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, नुकतेच राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष झालेल्या नेत्यांचा महापालिकेतील गट म्हणजे भाजपची ‘बी’ टीम आहे. जिल्ह्यातही भाजपला ‘जेजेपी’ म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे नेत्यांनी जरा जपूनच आघाडीबाबत निर्णय घ्यावा. कॉँग्रेसतर्फे दगड जरी उभा केला तरी, त्यास निवडून आणण्याची आमची जबाबदारी आहे.

चंद्रकांत पाटील : यांची भाषा अयोग्य
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, सांगली महापालिका निवडणुकीत पुन्हा विजय मिळविण्यासाठी कार्यकर्तेच नव्हे, तर नेतेही जीव तोडून मेहनत करणार आहेत. गाड्यांचे दार उघडणाºयांना उमेदवारी न देता, मेरीटवर उमेदवारी दिली जाणार आहे. सांगलीत महापालिकेची सत्ता मिळविण्याची भाजपला चांगलीच घाई झाली आहे. त्यामुळेच त्यांचे नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना भेटवस्तू वाटण्याचे आदेश दिले आहेत. पाटील यांची ही भाषा मस्तीची असून, मिशन २०१९ डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी काम करावे.
पतंगराव, मदनभाऊ आणि हाफिजभार्इंची आठवण
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी कॉँग्रेसचा पहिलाच मेळावा मिरजेत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्यातील प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावत, सांगली महापालिकेवर कॉँग्रेसचाच पुन्हा तिरंगा फडकणार, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. याचवेळी प्रत्येक नेत्याने, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, मदन पाटील आणि माजी आ. हाफिज धत्तुरे यांच्या निधनाने नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असून, ती भरून काढत महापालिका जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. महापालिकेवर कॉँग्रेसची पुन्हा सत्ता म्हणजे या नेत्यांना श्रध्दांजली ठरणार असल्याचेही नेत्यांनी सांगितले.

Web Title: The beginning of winning the state from Sangli: Ashok Chavan - Congress meeting in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.