Will physical attraction be called love? | ​शारीरिक आकर्षणाला प्रेम म्हणाल का?

-रवींद्र मोरे 
प्रेम या शब्दामध्ये बऱ्याच गोष्टी ठरलेल्या आहेत, वर्तमानपत्र उघडले की, एक तरी चांगली, वाईट बातमी प्रेमातून घडलेल्या प्रसंगातून वाचावयास मिळते. मुले-मुली वयात आली की, अट्रॅक्शन होणे हे स्वाभाविक आहे. मात्र अट्रॅक्शनमुळेच एकतर्फी प्रेमाचा जन्म होतो. एकतर्फी प्रेम ते मुलाकडून असो की मुलीकडून असो, यातून नेहमीच वाईट प्रसंगाला सामोरे जाण्याचा प्रसंग नेहमीच प्रेम करणाऱ्या मंडळींना येत असतो. यालाही कारण तसे आहे. कारण सध्या खऱ्या प्रेमाची संकल्पनाच बदलू पाहत आहे. प्रेमाचे रुपांतर फिजिकल अट्रॅक्शनमध्ये होताना दिसत आहे. 

फिजिकल अट्रॅक्शन हे प्राण्यांमध्येही असते आणि मानव हा प्राण्यांपेक्षा निश्चित वेगळा आहे. फिजिकल अट्रॅक्शनला आपण प्रेम म्हणाल का? जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. शरीर सुखाच्या भावनेपेक्षा मनोमिलनाची भावना स्वत:मध्ये जागृत करा. तेव्हाच तर तुम्ही खऱ्या प्रेम योगाचा खरा आनंद प्राप्त करू शकाल. 

आपण समाजात पाहतो, दररोज प्रेमावरून काही ना काही घडत असते. एकतर्फी प्रेमातून गुन्हेगारीचे प्रमाणही गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत वाढले आहे. कोणी आपल्या प्रेयसीचे नाव हातावर गोंदून घेतो, तर कोणी ब्लेडने स्वत:वर वार करून घेतो. एवढेच नाहीतर प्रियकरासाठी काही तरूणी स्वत:चा जीव देण्यासाठीही मागे- पुढे पाहत नाहीत. काही मुले तर प्रेमात स्वत:ला विसरून जातात व आपल्या रक्ताने प्रेयसीला पत्र लिहून प्रेम किती नि:स्वार्थ आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात.

अशा परिस्थिती प्रेयसी सोडून गेली तर तिचा खून करण्यातही आजचे 'प्रेम दिवाने' मागे राहत नाही, याला काय म्हणणार? खून अथवा आत्महत्या करण्यामागे 'प्रेम' नाही तर 'कामवासना' हेच खरे कारण आहे. 

'नि:स्वार्थ प्रेम' हे परमेश्वराच्या प्रार्थनेप्रमाणे असते. जो व्यक्ती स्वत:वर प्रेम करतो तोच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो. 'काटा माझ्या पायी रुतला शूल तुझ्या का रे हृदयी उठला', अशी भावना खऱ्या प्रियकर व प्रेयसीमध्ये असते. प्रेमात त्यागाची भूमिका महत्त्वाची आहे.

प्रेमाची व्याख्या ही प्रत्येक प्रियकाराने त्याच्या परीने करून घेतली आहे. प्रेमात पडणं सोपं आहे, मात्र ते निभावणं खूप कठीण आहे. 
Web Title: Will physical attraction be called love?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.