चिडवल्याने तणावग्रस्त होतात लहान मुलं, हे कसं रोखाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 02:39 PM2018-12-12T14:39:57+5:302018-12-12T14:42:41+5:30

लहान मुलांची मस्ती कशी असते हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेकदा काही मुलं दुसऱ्या मुलांना सतत वेगवेगळ्या कारणांनी चिडवत असतात.

Bullying of students, here's what to do about | चिडवल्याने तणावग्रस्त होतात लहान मुलं, हे कसं रोखाल?

चिडवल्याने तणावग्रस्त होतात लहान मुलं, हे कसं रोखाल?

Next

(Image Credit : parentnetworkwny.org)

लहान मुलांची मस्ती कशी असते हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेकदा काही मुलं दुसऱ्या मुलांना सतत वेगवेगळ्या कारणांनी चिडवत असतात. कुणाला उंचीवरुन, कुणाला जाडेपणावरुन, कुणाला चष्मा लागल्याने तर कुणाला कपड्यांवरुन चिडवलं जातं. काही मुलं कमजोर असतात, त्यांच्यासोबत असं नेहमीच केलं जातं. तसेच ज्या लहान मुलांमध्ये आत्मविश्वास कमी आहे, त्यांच्यासोबतही असं वागण्यात येतं.  

त्यासोबतच एखादा विद्यार्थी जर शाळेत फार लोकप्रिय असेल तर त्यालाही वेगवेगळ्या कारणांनी चिडवलं जातं. पण हे गंमतीने चिडवणं काही मुलांसाठी महागात पडू शकतं. याने मुलं तणावग्रस्त होऊ शकतात आणि त्यांच्यातील भीती आणखी वाढू शकते. 

कुठे होतात या घटना?

याप्रकारचं वागणं हे वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या परिस्थीतींमध्ये बघायला मिळतं. अनेकदा मोबाइल फोन आणि ऑनलाइनच्या माध्यमातूनही अशाप्रकारच्या गोष्टी केल्या जातात. याला इलेक्ट्रॉनिक बुलिंग म्हटलं जातं. शाळेतील मुला-मुलींसोबत अशाप्रकारच्या घटना अधिक बघायला मिळतात. 

पालकांनी लक्ष देणं गरजेचं

असं आढळलं आहे की, अनेकदा लहान मुलं घरातील मोठ्यांसोबत अशाप्रकारच्या गोष्टी शेअर करत नाहीत. आणि त्यांना सांगितलही गेलं तरी त्यांना हे माहीत नसतं की, यावर कशी प्रतिक्रिया द्यावी. मात्र २० ते ३० टक्के लहान मुलंच त्यांच्यासोबत होणाऱ्या चुकीच्या व्यवहाराबाबत आई-वडिलांना सांगतात. 

हे कसं रोखाल?

शाळेतील स्टाफ आणि विद्यार्थींनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की, जर खेळाच्या मैदानात एखाद्या मुलासोबत असं केलं जात असेल तर ते रोखावं. तसेच शाळेतील शिक्षक, प्रशासन, ड्रायव्हर्स यांनीही याकडे लक्ष द्यावं. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही दिलं जावं की, त्यांच्यासोबत असं काही घडत असेल तर कशी प्रतिक्रिया द्यावी. शाळेत अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी एक समूह तयार केला जाऊ शकतो. शाळेतील स्टाफ, विद्यार्थी आणि शिक्षकांना नियमांची माहिती दिली गेली पाहिजे. जेणेकरुन अशा प्रकरणावर वेळीच कारवाई केली जावी आणि या घटना थांबवता याव्यात.

घाबरवणे आणि आत्महत्या

एखाद्याला घाबरवणे, भीती दाखवणे आणि आत्महत्या यात खोलवर संबंध आहे. अनेकदा शाळांमध्ये अशाप्रकारची प्रकरणे बघायला मिळतात. विद्यार्थी शाळेत त्यांच्यासोबत होणाऱ्या अशा व्यवहारामुळे आत्महत्या करतात. अशाप्रकारच्या व्यवहारामुळे विद्यार्थ्याला एकटेपणा, तणाव, आत्मविश्वास गमावणे या समस्या होऊ शकतात. या गोष्टींचा त्यांच्यावर इतका दबाव येतो की, ते आत्महत्येसारखं गंभीर पाउल उचलतात. पण केवळ याच कारणाने विद्यार्थी आत्महत्या करतात असं नाही तर इतरही अनेक कारणांनी विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग निवडतात. 

Web Title: Bullying of students, here's what to do about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.