मासेमारीतील बदल टिपण्यासाठी हवे विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:46 PM2019-05-12T23:46:23+5:302019-05-12T23:46:35+5:30

मनोज मुळ्ये । लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या काही वर्षात मासेमारीच्या तंत्रात खूप बदल झाले आहेत. मत्स्य जीवनातही ...

The University wants to see the changes in the fishing | मासेमारीतील बदल टिपण्यासाठी हवे विद्यापीठ

मासेमारीतील बदल टिपण्यासाठी हवे विद्यापीठ

Next

मनोज मुळ्ये ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेल्या काही वर्षात मासेमारीच्या तंत्रात खूप बदल झाले आहेत. मत्स्य जीवनातही बदल झाले आहेत. हवामान, दूषित पाणी यामुळे एकूणच सागरी उपलब्धींवर परिणाम होत आहे. या साऱ्यावर संशोधन करण्यासाठी कोकणाला स्वतंत्र मत्स्य व्यवसाय आणि सागरी विज्ञान विद्यापीठाची निकड आहे. दुर्दैवाने सर्वच राजकीय पक्षांना कोकण विकासाचे वावडे असल्याने गेली अनेक वर्षे ही मागणी रखडत राहिली आहे.
ज्यावेळी यांत्रिक नौका अस्तित्त्वात आल्या, त्यावेळी रत्नागिरीतील मच्छीमारांसाठी तो खूप अप्रूप असलेला विषय होता. १९६0चा काळ होता तो.
त्यावेळी डॉ. माधवराव रानडे यांनी पुढाकार घेतला. एक यांत्रिक नौका आणून त्यांनी मच्छीमारांना त्याद्वारे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. त्यांचे हे प्रयत्न, मासेमारीतून मिळणारे परकीय चलन, मासेमारीला असलेला वाव हे लक्षात घेऊन शरद पवार यांनी त्यांना विशेष प्रोत्साहन दिले.
त्यातूनच १९८१ साली रत्नागिरीमध्ये मत्स्य महाविद्यालय स्थापन झाले. हे महाविद्यालय नागपूरला जोडले गेले तर ज्या उद्देशाने डॉ. माधवराव रानडे यांनी प्रयत्न केले, त्या उद्देशालाच हरताळ फासला जाईल.
गेल्या १९ वर्षात या विद्यापीठाने एकही संशोधन केंद्र सुरू केलेले नाही. तिथे खारे पाणी नाही. पण गोड्या पाण्यातीतील मत्स्य संवर्धनाचेही संशोधन त्यांनी केलेले नाही. पूर्ण विकसित झालेले महाविद्यालय अशा विद्यापीठाच्या ताब्यात गेल्याने संशोधनाला खीळ बसण्याची भीती आहे.
कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा, खारभूमी, गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन अशा विविध बाजू लक्षात घेत या महाविद्यालयाने आपली संशोधन केंद्र विकसित केली. १९८१पासून विकसित झालेले हे महाविद्यालय आता समुद्र नसलेल्या भागातील मत्स्य विद्यापीठाच्या घशात घातले जात आहे आणि त्याची पुरेशी जाणीव सरकारला नसल्याचेच दिसून येत आहे.
कशाला हवे आहे स्वतंत्र मत्स्यव्यवसाय विद्यापीठ
गेल्या २0 वर्षात मासेमारीच्या तंत्रात खूप मोठे बदल झाले आहेत. हवामान, प्रदूषण याचा परिणाम मत्स्यजीवांवर होत आहे. सतत होणाºया या बदलांवर संशोधन होत राहाणे आवश्यक आहे.
कोकणाला ७२0 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभूनही सागरी विज्ञानावर अभ्यास करणारे महाविद्यालय कोकणात नाही.
मासळीचे साठे कोठे आहेत, हे शोधण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्त्वात आल्या आहेत. याची तांत्रिक माहिती कशी घ्यावी, हे शिकवणारे छोटेखानी अभ्यासक्रम सुरू होणे गरजेचे आहे.
समुद्र दरवर्षी अतिक्रमण करत आहे. पूर्वी किनाºयावर ज्या भागात रस्ते होते, स्मशानभूमी होत्या, ती जागा आता पाण्याखाली आहेत. यावर अभ्यास करण्यासाठी सागरी विज्ञान अभ्यासक्रमांची गरज आहे.
निमखाºया पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी कोकणात खूप मोठा वाव आहे. त्यातून रोजगाराच्या अफाट संधी उपलब्ध आहेत. मात्र त्याच्या अभ्यासासाठी स्वतंत्र विद्यापीठाची गरज आहे.
काही प्रश्न : मत्स्य महाविद्यालयाच्या संलग्नतेमुळे उपस्थित

कृषी क्षेत्रातील पदव्या देण्यासाठी महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे आहेत, तर मत्स्य व्यवसाय विज्ञान अभ्यासक्रमासाठी स्वतं विद्यापीठ का असू नये?
मराठवाडा विद्यापीठाने आपल्या भागातील मुलांना समुद्राचा अभ्यास करता यावा, यासाठी रत्नागिरीमध्ये सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र सुरू केले आहे. मात्र, मत्स्य हा विशेष विषय असलेला नागपूर पशु आणि मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठाने आजवर असा प्रयत्न का केलेला नाही?
महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असतानाही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला त्यातील पदवी देण्याचा अधिकार आहे. मग मत्स्यविषयक पदवी देण्याचा अधिकार केवळ नागपूरमधील पशु आणि मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठालाच का?
मत्स्य व्यवसाय विज्ञान क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणाची आणि डॉक्टरेटची पदवी देण्याचा अधिकार मुंबईतील सेंट्रल इन्स्टिट्युट आॅफ फिशरीज एज्युकेशन संस्थेला आहे. मग तो कोकण कृषी विद्यापीठाला का नसावा?
एकाच अभ्यासक्रमावर आधारित कला, वाणिज्य, शास्त्र शाखेतील पदव्या देण्यासाठी वेगवेगळ्या संस्था आहेत. मत्स्यविषयक पदवी देण्याचा अधिकार एकाच (नागपूरच्या) विद्यापीठाला का देण्यात आला आहे?

डॉ. मुणगेकर यांनी काय सुचवले आहेत उपाय...
कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य व्यवसाय आणि सागरी विज्ञान विद्यापीठ स्थापन व्हावे.
विद्यापीठाचे मुख्यालय रत्नागिरी असावे.
या विद्यापीठाला रत्नागिरीतील शिरगाव मत्स्य महाविद्यालय संलग्न करण्याबरोबरच इंदापूर, पुणे येथे मत्स्य महाविद्यालय आणि सिंधुदुर्गात सागरी विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात यावे.
पाच वर्षांसाठी ५८0 कोटी रूपयांची तरतूद करावी. (२0११ साली आवश्यक असलेल्या गरजांनुसार त्यांनी ही रक्कम सूचित केली होती.)
रत्नागिरीमध्ये मुख्यालय आणि दोन नवीन महाविद्यालये यांच्या उभारणीसाठी १७५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात यावी.
नव्या विद्यापीठामार्फत महाविद्यालय, विविध शाखा आणि त्याचबरोबर शैक्षणिक उपक्रम राबवण्यात यावेत.
विद्यापीठाकडून मत्स्य विज्ञान, सागरी विज्ञान आणि निम्नस्तर शिक्षण शाखा चालवण्यात याव्यात.

Web Title: The University wants to see the changes in the fishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.