रत्नागिरीतील राहुल कळंबटे यांनी काढलेली बालिकेच्या थ्रीडी रांगोळीला देशात चौथा क्रमांक 

By शोभना कांबळे | Published: April 26, 2024 04:11 PM2024-04-26T16:11:23+5:302024-04-26T16:12:49+5:30

रत्नागिरी : थ्रीडी रांगोळीत तीन जागतिक विक्रम केलेले रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी दोन वर्षांपूर्वी काढलेल्या ...

The 3D rangoli of a girl drawn by Rahul Kalambate from Ratnagiri is the fourth number in the country | रत्नागिरीतील राहुल कळंबटे यांनी काढलेली बालिकेच्या थ्रीडी रांगोळीला देशात चौथा क्रमांक 

रत्नागिरीतील राहुल कळंबटे यांनी काढलेली बालिकेच्या थ्रीडी रांगोळीला देशात चौथा क्रमांक 

रत्नागिरी : थ्रीडी रांगोळीत तीन जागतिक विक्रम केलेले रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी दोन वर्षांपूर्वी काढलेल्या बालिकेच्या थ्रीडी रांगोळीला देशात चौथा क्रमांक मिळाला आहे. राजस्थान येथील २७ आर्ट पॉइंट संस्थेतर्फे ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्यात आली.

राहुल कळंबटे यांनी अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत अगदी मोलमजुरी करून कलेचे शिक्षण घेतले. २०१० मध्ये अंशकालीन भरतीमध्ये कलाशिक्षक म्हणून नगरपरिषद शाळेत ६ महिने कंत्राटी काम मिळाले. शाळेत असतानाच त्यांनी संस्कार भारती रांगोळी याची सुरूवात केली. व्यक्तिचित्रण रांगोळी शिकायची खूप इच्छा होती. पण, यातील दिग्गजांनी रांगोळी शिकवण्यासाठी नकार दिला. एवढेच नव्हे तर ‘ तुला जमणार नाही’ असे सांगत निराशा केली. मात्र, रत्नागिरीतील कलाकार प्रशांत राजीवले आणि राजू भाताडे या समवयस्क रांगोळी कलाकारांनी त्यांना संधी दिली. त्यांच्यासोबत राहून राहुल कळंबटे रांगोळी काढायला लागले.

त्याआधी ते कागदावर व्यक्तिचित्रण करत होते. पण, नंतर त्यांनी रांगोळीतून व्यक्तिचित्रण करायला सुरुवात केली आणि त्यातील थ्रीडी या अभिनव रांगोळीने त्यांना सांगली येथे राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवून दिला. त्यानंतर त्यांच्या हातून अनेक थ्रीडी रांगोळ्या साकार झाल्या. आतापर्यंत त्यांनी सुमारे बारा विविध व्यक्तींच्या थ्रीडी रांगोळ्या काढल्या. त्यात प्रत्यक्ष त्यांच्या मुलाचा देखील समावेश आहे.

दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी शहरातील सहकार नगर येथील राधाकृष्ण रेसिडेन्सीतील रहिवासी स्वरूप मिरजुळकर यांची मुलगी स्वर्णी हिच्या पहिल्या वाढदिनी राहुल कळंबटे यांनी अथक १७ तासांत तिचे थ्रीडी रांगोळीतून हुबेहूब चित्र साकार केले. या रांगोळीचे फोटो राज्यभरातच नव्हे तर इतर राज्यांमध्येही व्हायरल झाले. त्यामुळे या थ्रीडी रांगोळीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

राजस्थान येथील २७ आर्ट पॉइंट संस्थेतर्फे ‘नववी नॅशनल ऑनलाईन आर्ट कॉम्पिटिशन २०२४’ स्पर्धा घेण्यात आली. यात देशातील ३५० पेक्षा जास्त कलाकार सहभागी झाले होते. या स्पर्धेत रियलॅस्टिक पेंटिंग, लँडस्केप पेंटिंग, फोटोग्राफी, प्रिंटमेकिंग, ऍब्सट्रेक पेंटिंग, पोट्रेट, स्कल्पचर, मिक्स मीडिया, डिजिटल पेंटिंग, रांगोळी या सर्व प्रकारांचा समावेश होता. त्यांचे फोटोग्राफ ऑनलाईन मागविण्यात आले होते. राहुल कळंबटे यांनी स्वर्णी हिच्या थ्रीडी रांगोळीचा फोटो स्पर्धेसाठी पाठविला. या थ्रीडी रांगोळीने या स्पर्धेतही बाजी मारत कळंबटे यांना देशात चौथा क्रमांक मिळवून दिला.

Web Title: The 3D rangoli of a girl drawn by Rahul Kalambate from Ratnagiri is the fourth number in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.