रत्नागिरी : सर्वाधिक साठा असूनही पाणीटंचाई तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 08:03 PM2018-04-27T20:03:54+5:302018-04-27T20:03:54+5:30

उन्हाळी हंगामात राज्यातील अन्य विभागांपेक्षा सर्वाधिक पाणीसाठा असलेला विभाग अशी कोकणची ओळख यावर्षीही कायम आहे. याच कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये ५३ टक्के जलसाठा असूनही जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या सध्या गंभीर आहे.

Ratnagiri: Despite high reservoir, water shortage is severe | रत्नागिरी : सर्वाधिक साठा असूनही पाणीटंचाई तीव्र

रत्नागिरी : सर्वाधिक साठा असूनही पाणीटंचाई तीव्र

Next
ठळक मुद्देराज्यातील सर्वाधिक पाणीसाठा रत्नागिरी विभागात५० टक्केपेक्षा अधिक जलसाठ्याचा वापर टंचाई दूर करा

रत्नागिरी : उन्हाळी हंगामात राज्यातील अन्य विभागांपेक्षा सर्वाधिक पाणीसाठा असलेला विभाग अशी कोकणची ओळख यावर्षीही कायम आहे. याच कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये ५३ टक्के जलसाठा असूनही जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या सध्या गंभीर आहे.

दरवर्षी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमधील ५० टक्केपर्यंत साठाच सिंचनासाठी वापरला जातो. उर्वरित जलसाठा जिल्ह्यातील उन्हाळी हंगामातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वापरावा, ही जनतेची मागणी अद्यापही दुर्लक्षित आहे. टंचाई तीव्र असतानाही खेड तालुक्यातील ८ वाड्यांना २ खासगी टॅँकर्सनी पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ५ कोटी ४९ लाख ८० हजार रुपयांचा संभाव्या पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील २६१ गावांमधील ४८६ वाड्यांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात समावेश आहे. मात्र, टंचाई भीषण असतानाही खेड तालुक्याशिवाय अन्यत्र टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू झालेला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील खासगी व सार्वजनिक विहिरी तसेच अन्य जलसाठ्यांतील पातळी बाष्पीभवनाने खालावली असून्, विहिरी, जलसाठे कोरडे पडले आहेत. जलसाठा असलेले जलसाठे उशाशी आहेत. मात्र, टंचाईग्रस्त भागातील जनतेच्या घशाला कोरड पडली आहे.

जिल्हा टंचाई कृती आराखड्यानुसार या उन्हाळी हंगामात ९८ गावांमधील २९३ वाड्यांना पाणी टंचाई भेडसावण्याची शक्यता लक्षात घेऊन ३३ टॅँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन झाले आहे. त्यासाठी ३५ लाख ८५ हजार रुपये खर्च येणार आहे. यंदाच्या टंचाई आराखड्यानुसार लांजा तालुक्यातील ८ गावांमधील ८ वाड्यांमध्ये टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठा करण्यासाठी खासगी विहिरींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या हंगामात विंधन विहिरींची दुरुस्ती किवा विहिरींमधील गाळ काढण्याबाबत कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी यंदा जिल्हा नियोजनमधून ११० गावांमधील १६२ वाड्यांमध्ये विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत. त्यासाठी ९७ लाख २० हजार रुपयांची तरतूद आराखड्यात केली आहे. यातील काही विंधन विहिरींचे काम सुरू आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेकडून टंचाई आराखडा तयार केला जातो. मोठ्या संख्येने त्यात संभाव्य टंचाईग्रस्त गाव वाड्यांचा समावेश होतो. प्रत्यक्षात कार्यवाही किती होते, हा संशोधनाचा विषय ठरतो आहे.

कोकणातील प्रकल्पांमध्ये पावसाळा येईपर्यंत मुबलक जलसाठा उपलब्ध असतो. मध्यम प्रकल्पांमध्येही पाणीसाठा असतो. या प्रकल्पांमधून साडेआठ हजार हेक्टर शेतीसाठी पाणी उपलब्ध होते. प्रत्यक्षात साडेतीन ते चार हजार हेक्टर क्षेत्रच ओलिताखाली आणले जाते. त्यामुळे ५० टक्केपेक्षा अधिक जलसाठा हा पावसाळा येईपर्यंत विनावापर धरणांमध्येच पडून राहतो. पावसाने पुन्हा ही धरणे भरून जातात. या उर्वरित धरणसाठ्याचा टंचाई दूर करण्यासाठी वापर होऊ शकतो. त्यासाठी टंचाईग्रस्त गावे आणि ही धरणे यांची ह्यकनेक्टिव्हिटीह्ण असणे आवश्यक आहे.

सर्वाधिक साठा कोकणात

२३ एप्रिल २०१८च्या नोंदीप्रमाणे राज्यातील ३२४६ जलप्रकल्पांमध्ये ३३.६० टक्के पाणीसाठा होता. त्यामध्ये सर्वाधिक जलसाठा हा कोकण विभागातील १७५ प्रकल्पांमध्ये ५०.७१ टक्के एवढा आहे. अमरावती व नागपूर विभागांमध्ये सरासरी केवळ १८ टक्के एवढाच जलसाठा शिल्लक असून, तेथील जलसंकट तीव्र आहे.

रत्नागिरी शहरात टॅँकरने पाणीपुरवठा सुरू

रत्नागिरी शहराची नळपाणी योजना जुनी झाल्याने जागोजागी या योजनेच्या जलवाहिन्या बाद झाल्या आहेत. ६३ कोटी खर्चाच्या या सुधारित नळपाणी योजनेचे काम आता सुरू झाले आहे. मात्र, शहरात कमीदाबाने अपुरा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नगर परिषदेतर्फे दररोज टॅँकरने ३० ते ४० फेऱ्यांद्वारे शहरात पाणीपुरवठा केला जात आहे.

Web Title: Ratnagiri: Despite high reservoir, water shortage is severe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.