रत्नागिरी : सायबर गुन्ह्यांचा विळखा मजबूत होतोय, गुन्हेगारीची पाळेमुळे खोलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:48 AM2018-01-22T11:48:19+5:302018-01-22T11:55:27+5:30

इंटरनेट क्रांती ही आजवरची सर्वात मोठी क्रांती मानली जात असली तरी लोकांचा पैसा आणि खासगी आयुष्य आणि गोपनीयता याला सायबर गुन्ह्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. सन २०१६मध्ये ४४ सायबर गुन्ह्यांची प्रकरणे नोंद झाली आणि २०१७मध्ये ही संख्या तब्बल ५२ वर गेली आहे.

Ratnagiri: The cyber crimes are getting stronger, because of the crime level | रत्नागिरी : सायबर गुन्ह्यांचा विळखा मजबूत होतोय, गुन्हेगारीची पाळेमुळे खोलवर

रत्नागिरी : सायबर गुन्ह्यांचा विळखा मजबूत होतोय, गुन्हेगारीची पाळेमुळे खोलवर

googlenewsNext
ठळक मुद्देसायबर गुन्ह्यांचा विळखा मजबूत होतोयगुन्हेगारीची पाळेमुळे खोलवर- गोपनीय माहिती न देण्याची सवय ठेवा- झटपट श्रीमंतीचे स्वप्न नकोच

अरूण आडिवरेकर

रत्नागिरी : इंटरनेट क्रांती ही आजवरची सर्वात मोठी क्रांती मानली जात असली तरी लोकांचा पैसा आणि खासगी आयुष्य आणि गोपनीयता याला सायबर गुन्ह्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. सन २०१६मध्ये ४४ सायबर गुन्ह्यांची प्रकरणे नोंद झाली आणि २०१७ मध्ये ही संख्या तब्बल ५२ वर गेली आहे.

बँकेतून मॅनेजर बोलतोय. एटीएम बंद होणार आहे, पीन नंबर सांगा असे सांगून फसवणूक होण्याचे प्रकार सर्वाधिक आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी झालेल्या गुन्ह्यांचा शोध लावण्यात पोलिसांना शंभर टक्के यश आले आहे. झारखंड, उत्तरप्रदेश आणि दिल्ली हे भाग फसवणुकीचे मुख्य केंद्र असल्याची माहिती सायबर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणीस यांनी सांगितले.

आॅनलाईन बँकिंग, आॅनलाईन खरेदी, मेसेजिंग, ई-गव्हर्नस, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर, व्हिडिओ कॉल यामुळे देशांच्या सीमारेषा पुसून गेल्या असून, जगातील लोक एकमेकांच्या अगदी जवळ आले आहेत. वाढत्या इंटरनेटच्या वापराबरोबरच सायबर गुन्हेगारीची पाळेमुळेदेखील अधिक दूरवर पोहोचली आहेत.

माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे दैनंदिन व्यापार तसेच इतर अनेक व्यवहार करणे लोकांना सोयीस्कर झाले असले तरीही त्याचबरोबर त्यातील गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. हॅकींगच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार, तसेच अनेक प्रकारे आर्थिक फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर उघडकीला येत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह छायाचित्रे, प्रक्षोभक संदेश पाठवणे यासारख्या गुन्ह्यांची नोंद सायबर क्राईममध्ये करण्यात येते.

गेल्या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात सायबरचे ५२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये बँकेतून मॅनेजर बोलतोय सांगून फसवणूक झालेले ३४, सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे बदनामी झाल्याचे १०, आॅनलाईन फसवणुकीसह लॉटरी लागल्याचे सांगून, बनावट एटीएम वापरून, भीम अ‍ॅपविषयी लिंक अकाऊंटची माहिती घेऊन, टाईल्स विक्रीच्या व्यवसायाद्वारे फसवणूक आणि अ‍ॅमेझॉनवर तुम्हाला बक्षीस लागल्याचे सांगून फसवणूक झाल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. रत्नागिरीत आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक आहे.

झारखंड, उत्तरप्रदेश आणि दिल्ली ही फसवणूक करणाऱ्यांची केंद्र आहेत. मात्र, या व्यक्ती एका जागेवर स्थिर राहत नसल्याने त्यांचा शोध घेणे कठीण असते. गतवर्षी चिपळूण आणि सावर्डे येथील गुन्ह्यांप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोघांनाही झारखंडमधूनच ताब्यात घेण्यात आले होते.

अनेकदा अशा गुन्ह्यांमध्ये संबंधितांना पकडणे खूप कठीण असते. ज्या खात्यावर पैसे टाकले जातात, ते खातेदेखील तात्पुरत्या स्वरूपाचे असते. दिवसाचे टार्गेट पूर्ण झाले की, ही मंडळी आपले बस्तान दुसरीकडे हलवतात. एखाद्याची फसवणूक झाल्यास त्याला त्याची रक्कम मिळणे गरजेचे असते. त्यामुळे फसवणूक झाल्यानंतर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

सायबर क्राईम गुन्ह्यांअंतर्गत सन २०००मध्ये कायदा अंमलात आला आहे. यामध्ये ६६ ते ७४ असे सेक्शन असून, या सेक्शननुसार त्या व्यक्तीवर आरोप सिद्ध झाल्यास १ वर्ष ते ७ वर्षापर्यंत तुरूंगवास आणि १० लाखांपर्यंत दंड ठोठावण्यात येऊ शकतो, अशी माहिती रविराज फडणीस यांनी दिली.


आमिषाला बळी पडू नका
झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषामुळे अनेकजणांची फसवणूक होते. लॉटरी लागली आहे, पैसे मिळणार आहेत, असे फोन आल्यावर माणूस मोहाला बळी पडतो. त्यामुळेच असे प्रकार घडत आहेत. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तुमच्या खात्यातून पैसे अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्यास तत्काळ पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा.
- रविराज फडणीस
पोलीस उपनिरीक्षक,
सायबर, रत्नागिरी.

 


व्हॉट्सअ‍ॅपचा आॅल इंडियाचा ग्रुप

सायबर गुन्ह्यांचा शोध तातडीने लागण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा आॅल इंडिया ग्रुप तयार करण्यात आला आहे. फसवणुकीचा प्रकार घडताच या ग्रुपवर त्याची माहिती टाकल्यास तत्काळ कारवाई केली जाते. याठिकाणी माहिती टाकल्यास काही क्षणातच सर्व यंत्रणा काम करते.

मुलांवर लक्ष गरजेचे

अनेकवेळा मोबाईलवरून मुले आॅनलाईन खरेदी किंवा विविध साईटस् बघत असतात. त्यामुळे आपली गोपनीय माहिती त्याद्वारे इतरांना जाऊ शकते. मुले मोबाईल हाताळताना किंवा इंटरनेटचा वापर करताना काय पाहतात ते पहा.

योग्य वेबसाईटसच पाहाव्यात

इंटरनेटचा वापर करताना आपण अनेक साईटस् पाहतो. या साईटस् पाहताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. अशा साईटस् सुरू करण्यापूर्वी  https// असे लिहिले आहे का? ते पाहावे. या अक्षरांमधील एस हे अक्षर ती साईट सुरक्षित असल्याचे दर्शवते.

ओटीपी नंबर कुणालाही देऊ नका

आॅनलाईन खरेदी करताना रजिस्टर केलेल्या नंबरवर ओटीपी नंबर येतो. हा नंबर ग्राहकाने कोणालाही कधीच सांगू नये. हा नंबर घेऊन अनेकजण आॅनलाईन पैसे काढण्याची शक्यता असते.

एटीएम वापरताना काळजी घ्या

एटीएमचा वापर करणाऱ्या व्यक्तीने ते वापरताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. एटीएम कार्ड वापरताना आजूबाजूला कोणी व्यक्ती नाही ना याची खबरदारी घ्यावी. आपले एटीएम कार्ड दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये किंवा त्यांचा नंबर कोणाला सांगू नये.

बँकेतून कधीच फोन येत नाही

एटीएम कार्ड बंद होणार असल्याबाबत कधीच कोणतीही बँक ग्राहकाला स्वत:हून फोन करत नाही. त्यामुळे असे फोन हे केवळ ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशानेच केले जातात. त्यामुळे असा फोन आल्यास ग्राहकांनी आपली माहिती देण्याऐवजी बँकेशी संपर्क साधावा.

व्हॉट्सअ‍ॅपवर नोंदवा तक्रार

नागरिकांची फसवणूक झाल्यास त्यांना तत्काळ पोलीस स्थानकात तक्रार देता यावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून व्हॉट्सअ‍ॅप नंबर देण्यात आला आहे. ८८८८५०६१८१ या क्रमांकावरून तत्काळ आपली तक्रार देता येऊ शकते. त्याची दखलही तत्काळ घेतली जाते.
 

Web Title: Ratnagiri: The cyber crimes are getting stronger, because of the crime level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.