गांडूळ खताचे गाव अशी रत्नागिरीच्या कोतवड्याला मिळणार नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 05:39 PM2017-11-29T17:39:28+5:302017-11-29T17:54:16+5:30

रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील शेतकऱ्यांनी शेती उत्पादन वाढवण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प सुरू करायचे ठरवले आहे. अनुलोम संस्थेचे मार्गदर्शन व झेप ग्रामविकास महिला मंचाच्या प्रेरणेने ग्रामस्थांनी स्वखर्चाने खतासाठी दोन गादीवाफे केले.

A new identity will be given to Ratnagiri cottage village | गांडूळ खताचे गाव अशी रत्नागिरीच्या कोतवड्याला मिळणार नवी ओळख

रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील शेतकऱ्यांनी अनुलोम व झेप ग्रामविकास महिला मंचाच्या प्रेरणेने गांडूळ खत प्रकल्पसाठी स्वखर्चाने दोन गादीवाफे केले.

googlenewsNext
ठळक मुद्देकोतवडे ठरणार गांडूळ खताचे गावप्रत्येक घरी प्रकल्प करण्याचा संकल्पअनुलोम संस्थेचे मार्गदर्शन, झेप ग्रामविकास महिला मंचाची प्रेरणा शेतकऱ्यांचे गट करून कृषी विभागाशी जोडले जाणार

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथील शेतकऱ्यांनी शेती उत्पादन वाढवण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प सुरू करायचे ठरवले आहे. अनुलोम संस्थेचे मार्गदर्शन व झेप ग्रामविकास महिला मंचाच्या प्रेरणेने ग्रामस्थांनी स्वखर्चाने खतासाठी दोन गादीवाफे केले.

पुढील १५ दिवसांत आणखी १२ वाफे केले जाणार आहेत. प्रत्येक घरी असा प्रकल्प करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. यातूनच कोतवड्याला गांडूळ खताचे गाव अशी नवी ओळख मिळणार आहे.

कोतवडे येथील शेतकरी वर्षाला सुमारे पाच-सहा हजार रुपयांचे खत विकत घेतात. तेवढ्याच रुपयांत दुप्पट खत मिळू शकेल, या अनुलोमच्या सल्ल्यानंतर शेतकरी खूश झाले आणि त्यांनी गांडूळ खतनिर्मिती करण्याचे ठरवले.

शेतीसाठी लागणारे खत वापरून उर्वरित खताची विक्री करून पैसेही मिळू शकतात. याकरिता अनुलोमने पहिला कार्यक्रम सनगरेवाडीमध्ये घेतला. तालुका कृषी विभाग-आत्माच्या तालुका समन्वयक हर्षला पाटील यांनी खताचे प्रात्यक्षिक गावकऱ्यांना दाखवले.


अनुलोमतर्फे सामाजिक काम व शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जातो व भविष्यात कोतवड्यात शेतकऱ्यांचे गट करून त्यांना कृषी विभागाशी जोडले जाणार आहे, असे अनुलोम रत्नागिरी-सिंधुदुर्ग संस्थेचे उपविभागप्रमुख स्वप्नील सावंत यांनी सांगितले.

ग्रामविकासाला चालना मिळण्याच्या दृष्टीने लोकसहभागातून गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प विकासाचे केंद्र बनेल. यानिमित्ताने शेतीतील परिवर्तनला सुरवात झाली आहे. यातून रोजगार निर्माण होईल, असे अनुलोमचे भाग जनसेवक रवींद्र भोवड म्हणाले.

झेप संस्थेच्या समृद्धी सोनार म्हणाल्या की, अनुलोमने केलेल्या मार्गदर्शनामुळे गरज असलेला गांडूळ खत प्रकल्प सुरू होत आहे. भविष्यात गावात किमान १५ प्रकल्प सुरू होऊन शेती उत्पादन नक्कीच वाढेल. कृषी सहायक तायडे, मनाली सनगरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

जमिनीचा पोत सुधारणार

गादीवाफ्यात महिलांनी पालापाचोळा, नारळाची सोडणे, शेण, कचरा यांचे थर केले. त्यानंतर त्याच्यात गांडूळ सोडण्यात आले. त्यावर पाणी शिंपडून ते नेहमी ओले राहावे याकरिता गोणपाटाने झाकण्यात आले. या खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात, ह्यूमसचे प्रमाण भरपूर असल्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश झाडांना भरपूर उपलब्ध होतात. हे फायदे कोतवड्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

Web Title: A new identity will be given to Ratnagiri cottage village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.