रत्नागिरीत साकारणार ‘फॉरेन्सिक लॅब’, सिंधुदुर्गसाठीही उपयुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 09:44 PM2018-02-11T21:44:08+5:302018-02-11T21:44:15+5:30

विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या मुद्देमालाचे शास्त्रीय विश्लेषण मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये लघु न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाकडून घेण्यात आला आहे.

'Forensic Lab' will also be implemented in Ratnagiri, Sindhudurg | रत्नागिरीत साकारणार ‘फॉरेन्सिक लॅब’, सिंधुदुर्गसाठीही उपयुक्त 

रत्नागिरीत साकारणार ‘फॉरेन्सिक लॅब’, सिंधुदुर्गसाठीही उपयुक्त 

Next

 - अरुण आडिवरेकर 

रत्नागिरी  - विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या मुद्देमालाचे शास्त्रीय विश्लेषण मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये लघु न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाकडून घेण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला असून, रत्नागिरीतील खेडशी येथील नॅनो सिटी येथे ही प्रयोगशाळा साकारणार आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी ही प्रयोगशाळा उपयुक्त ठरणार आहे.

जिल्ह्यातील वाढते गुन्हे आटोक्यात आणताना दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये आरोप सिद्ध करून आरोपीला शिक्षा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असते. विविध प्रकारच्या गुन्ह्यांमधील जप्त नमुन्यांचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करून त्याबाबतचा अहवाल विहीत कालावधीत तपास यंत्रणांना उपलब्ध करून देणे व त्यानंतर उपलब्ध अहवाल न्यायालयात वैधानिक पुरावा म्हणून सादर करण्यामध्ये न्याय सहायक प्रयोगशाळांचे महत्त्व असाधारण आहे. विशेषत: फौजदारी खटल्यांमध्ये सिद्धपराध करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. मात्र, वाढत्या गुन्ह्यांचा विचार करता, हे अहवाल मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गृह विभागाने राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये लघु वैज्ञानिक प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात घडणाºया गुन्ह्यांच्या बाबतीत जप्त केलेल्या नमुन्यांचा अहवाल मिळवण्यासाठी हे नमुने मुंबई किंवा पुणे येथे पाठवले जातात. त्यामुळे हा अहवाल मिळण्यास खूपच उशीर होत असल्याचे दिसत होते. मुंबई, पुणे याठिकाणी अनेक नमुने येत असल्याने त्यांचा अहवाल वेळेत मिळणे कठीण होते. त्यामुळेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना सोयीस्कर ठरणाºया कोल्हापूर येथे नव्याने लॅब सुरू करण्यात आली. कोल्हापूर येथील लॅबमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणाहून नमुने पाठवले जात असल्याने या ठिकाणीदेखील कामाचा ताण अधिक आहे. त्यामुळे नवीन लघु वैज्ञानिक प्रयोगशाळा सुरू करण्यास शासनाने हिरवा कंदील दिला आहे. लघु न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत विविध दर्जाची १४३ पदे व अद्ययावत साहित्य सामग्रीसाठी वर्षाला १२.९२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

फॉरेन्सिक व्हॅन ठरतेय उपयुक्त

फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणारे नमुने अचूक असतील तर त्यांचा अहवाल लवकर प्राप्त होण्यास मदत होते. त्यामुळे हे नमुने अचूकपणे घेणे गरजेचे आहे. त्यासाठी रत्नागिरीच्या पोलीस दलात ‘मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन’ दाखल झाली आहे. गुन्ह्याच्या घटनास्थळी जावून ही गाडी नमुने घेत असल्याने हे नमुने अचूक मिळत आहेत. आतापर्यंत ५० गुन्ह्यांच्या तपासकामात या वाहनाने आपली कामगिरी बजावली आहे. या वाहनात पोलीस कॉन्स्टेबल दिनार वाडेकर हे फॉरेन्सिक तज्ज्ञ हे काम करत आहेत. तसेच उमेश सदाशिव साळुंखे हे अंगुली मुद्रा तज्ज्ञ आणि प्रज्ञा खोब्रागडे या सहाय्यक रासायनिक विश्लेषक म्हणून काम करत आहेत. या वाहनामध्ये दहा प्रकारचे किटस् उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्राथमिक तपास कीट, बुलेट होल टेस्टिंग कीट, सिमेन डिटेक्शन कीट, ब्लड डिटेक्शन कीट, फिंगर प्रिंट डेव्हलपमेंट कीट, डीएनए सॅम्पल कीट, फोटोग्राफी कीट, एक्सप्लोझिव्ह डिटेक्शन कीट, नार्को टेस्ट कीट, गन शॉट डिटेक्शन कीट यांचा समावेश आहे. रत्नागिरीतील तीन महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये या वाहनाद्वारे घेण्यात आलेले नमुने महत्त्वाचे ठरले आहेत. त्यामध्ये विमानतळ येथील मजुराचा खून, सोमेश्वर येथील खून व मंडणगड येथील खुनांचा समावेश आहे. या वाहनावर काम करणाºया दिनार वाडेकर यांनी मुंबई येथे एक महिन्याचे प्रशिक्षण घेतले असून, भौतिक पुरावे व्यवस्थित गोळा करण्यासाठी हे वाहन उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसोयींनी युक्त असलेले हे वाहन असून, अतिसंवेदनशील गुन्ह्यांच्या तपासात हे वाहन उपयुक्त ठरल्याचेही वाडेकर यांनी सांगितले.

रत्नागिरीत दोन विभागांच्या चाचण्या

खेडशी येथील नॅनो सिटीमध्ये लघु वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. येथे केवळ दोन विभागांच्याच चाचण्या करण्यात येणार आहेत. यात जीवशास्त्रीय व विष चिकित्सेचा समावेश आहे

‘कोहिनूर’मधील चोरीचा छडा लागला

या वाहनामध्ये फिंगर प्रिंट डेव्हल कीट आहे. या कीटमध्ये विविध प्रकारचे लाईटस् असणारी बॅटरी आहे. या बॅटरीसाठी आठ विविध प्रकारचे लाईटस लावता येतात. यामध्ये असणा-या लाईटस्च्या आधारे हॉटेल कोहिनूरमध्ये चोरीदरम्याने खडबडीत भिंतीवर उठलेले ठसे घेता आले होते. त्याच्या सहाय्याने ही चोरी उघड झाली होती.

आठ ठिकाणी चाचणी 

सध्या मुंबईतील कलिना येथे याचे मुख्यालय आहे. त्याशिवाय मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर याठिकाणी प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा कार्यरत आहेत. भौगोलिकदृष्ट्या जवळ पडणाºया लॅबमध्ये पोलीस गुन्ह्यांचा मुद्देमाल पाठवला जातो. त्यामुळे हजारो प्रकरणे तपासाविना पडून आहेत.

डीएनए चाचणीसाठी पुणे

बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये डीएनए चाचणीचा अहवाल महत्त्वाचा ठरतो. डीएनए चाचणी मुंबई, नागपूर, पुणे याठिकाणी केली जाते. रत्नागिरीतील गुन्ह्यांमध्ये डीएनए चाचणीसाठी पुणे येथे नमुने पाठवले जातात. हा अहवाल मिळण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे काहीवेळा गुन्हा न्यायालयात नेण्यासही खूपच उशीर होतो.

रत्नागिरी जिल्ह्यात फॉरेन्सिक लॅब तयार झाल्याने त्याचा फायदा निश्चितच होणार आहे. यामुळे गुन्ह्यांच्या तपासकामाला यामुळे गती मिळेल. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा भौगोलिक विचार करता, या दोन्ही जिल्ह्यांतील गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले नमुने मुंबई, पुणे किंवा कोल्हापूर याठिकाणी पाठवणे आणि त्याठिकाणाहून अहवाल प्राप्त होणे याला विलंब लागतो. रत्नागिरीत ही लॅब झाल्यास रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार आहे.

- शिरीष सासणे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी.

Web Title: 'Forensic Lab' will also be implemented in Ratnagiri, Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.