सेनेच्या धनुष्याला रत्नागिरीत भाजपचा बाण? विधानसभेची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 02:40 PM2019-07-09T14:40:48+5:302019-07-09T19:08:24+5:30

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना जिल्ह्यात शिवसेना व भाजप या दोन मित्र पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. युती म्हणून शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या गुहागर, रत्नागिरी व देवगड या विधानसभा मतदारसंघांवर भाजप आपला हक्क सांगणार असल्याची चर्चा आहे.

BJP's arrow in Ratnagiri with Senate's bow! Assembly preparations | सेनेच्या धनुष्याला रत्नागिरीत भाजपचा बाण? विधानसभेची तयारी

सेनेच्या धनुष्याला रत्नागिरीत भाजपचा बाण? विधानसभेची तयारी

Next
ठळक मुद्देसेनेच्या धनुष्याला रत्नागिरीत भाजपचा बाण? विधानसभेची तयारीजिल्ह्यात सेना-भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण, युतीबाबत संभ्रमच

रत्नागिरी : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना जिल्ह्यात शिवसेना व भाजप या दोन मित्र पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. युती म्हणून शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या गुहागर, रत्नागिरी व देवगड या विधानसभा मतदारसंघांवर भाजप आपला हक्क सांगणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास शिवसेनेला दुसऱ्या मतदार संघांचा विचार करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अन्यथा भाजपच्या परंपरागत मतदारसंघात भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची वेळही शिवसेनेवर येऊ शकते. तशी निवडणूक रणनीती भाजपअंतर्गत आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी दापोली - खेड, चिपळूण व राजापूर हे तीन विधानसभा मतदारसंघ युतीच्या पूर्वीच्या जागा वाटपानुसार शिवसेनच्या हक्काचे आहेत. मात्र, मध्यंतरी युती नसताना रत्नागिरी, गुहागर व देवगड या मतदारसंघातून सेना व भाजपचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत आमने-सामने उभे ठाकले होते. अलिकडच्या लोकसभा निवडणुकीत सेना व भाजपची निवडणूकपूर्व युती झाली, तर गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेमध्ये सेना-भाजपने पॅचअप केले.

येत्या तीन महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्याची अधिसूचना प्रसिध्द व्हावयाची आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपच्या परंपरागत रत्नागिरी, गुहागर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड विधानसभा मतदारसंघांवर भाजप हक्क सांगणार काय, अशी चर्चा सुरू झाली होती व त्यात तथ्य आहे.

दोन महिन्यांपूर्वीच रत्नागिरीत भाजप व संबंधित सर्व सहकारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यावेळीही या मतदारसंघांवर भाजपने आपला हक्क सांगावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. युती झाली नाही तर पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर स्वतंत्र लढतील. पण युती झाली तर दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून कलगीतुरा रंगण्याची चिन्हे अधिक आहेत.

गुहागर परंपरागत

गुहागर मतदार संघावर भाजपने दावा केला आहे. गुहागर हा मतदारसंघ परंपरागत भाजपचा आहे. तेथून अनेकवेळा विनय नातू हे विजयी झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघावरील आपला हक्क भाजप सोडणार नाही. परंतु जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी केवळ याच मतदारसंघावरील हक्क सांगण्याबाबत आग्रही दिसून येत आहेत. मात्र, रत्नागिरी व देवगडवरही हक्क सांगणार, असे म्हणणारे भाजपचे पदाधिकारी त्याबाबत गुहागरप्रमाणे आग्रही भूमिका घेत नसल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

रत्नागिरीबाबत उत्सुकता

रत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत यांनी पहिल्या दोनवेळा राष्ट्रवादीतर्फे, तर तिसऱ्यावेळी सेनेतून विजय मिळवला आहे. हा मतदारसंघ सुरुवातीला भाजपच्या वाट्याला आला होता. आता सेनेने या मतदारसंघात वर्चस्व निर्माण केले आहे. हा मतदारसंघ भाजपलाच मिळावा, असा आग्रह आहे. त्यामुळे या मतदारसंघाबाबत उत्सुकता आहे. रत्नागिरीऐवजी सेनेला जिल्ह्याबाहेरचा मतदारसंघ द्यावा किंवा जिल्ह्यातील सेनेचा मतदारसंघ रत्नागिरीच्या मोबदल्यात भाजपला मिळावा, असे पर्यायही सुचविले जात आहेत.

रत्नागिरीच्या बदल्यात चिपळूण !

जिल्ह्यातील चिपळूण व दापोली मतदारसंघात भाजपचे बळ आता वाढले असल्याचे भाजपअंतर्गत मत आहे. चिपळूण नगर परिषदेमध्ये भाजपचे नगराध्यक्ष आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही मतदारसंघांवर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दावा करावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. रत्नागिरी सेनेला सोडावयाचा असेल तर चिपळूण किंवा दापोली मतदारसंघ सेनेने भाजपला सोडावा, अशी मागणीही होत आहे. त्यामुळे जागांवरून तेढ निर्माण होणार आहे.

Web Title: BJP's arrow in Ratnagiri with Senate's bow! Assembly preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.