सत्तेत भाजपच, मुख्यमंत्री कोण? पक्षातच मोठी स्पर्धा; वसुंधरा राजे, बालकनाथ की...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 12:44 PM2023-12-03T12:44:25+5:302023-12-03T12:45:24+5:30

Rajasthan Assembly Election Result 2023: वसुंधरा राजे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर असले तरी भाजपमधून अनेक नेते यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

rajasthan assembly election result 2023 who will be the chief minister of rajasthan many leaders of bjp in competition | सत्तेत भाजपच, मुख्यमंत्री कोण? पक्षातच मोठी स्पर्धा; वसुंधरा राजे, बालकनाथ की...

सत्तेत भाजपच, मुख्यमंत्री कोण? पक्षातच मोठी स्पर्धा; वसुंधरा राजे, बालकनाथ की...

Rajasthan Assembly Election Result 2023: राजस्थान विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा परंपरा कायम ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. आताचे कल पाहता राजस्थानमध्ये भाजपने मुसंडी मारली असून, काँग्रेस पिछाडीवर आहे. भाजप ११२, काँग्रेस ७१, बसप ३ आणि अन्य १० जागांवर आघाडीवर आहेत. राजस्थानमध्ये भाजप सत्तेत येणार हे जवळपास निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. भाजप सत्तेत आल्यास मुख्यमंत्री कोण, हा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. 

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदासाठी भाजपमध्येच स्पर्धा असल्याचे काहीसे चित्र आहे. वास्तविक वसुंधरा राजे याच भाजपसाठी सर्वाधिक पसंतीचा चेहरा आहेत, असे सांगितले जात आहे. निवडणूक निकालांची मतमोजणी सुरू होण्याच्या आदल्यादिवशी रात्री उशिरापर्यंत वसुंधरा राजे यांनी बैठकांचे सत्र सुरू ठेवले होते, अशी माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी भाजपचे सरकार राजस्थानमध्ये सत्तेत असताना वसुंधरा राजे याच मुख्यमंत्री होत्या. 

वसुंधरा राजे यांनाच पक्षातून स्पर्धा

राजस्थान निवडणुकांचे एक्झिट पोल आले, त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती असेल, असा प्रश्न राजस्थानातील जनतेला विचारण्यात आला होता. त्यावेळेस भाजप खासदार बालकनाथ यांना अशोक गेहलोत यांच्यानंतर सर्वाधिक पसंती मिळाली होती. बालकनाथ यांना राजस्थानातील योगी असे संबोधले जाते. इतकेच नव्हे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ज्या नाथ संप्रदायातील आहेत, बालकनाथही त्याच संप्रदायाचे आहेत. त्यामुळे वसुंधरा राजे यांच्यासह बालकनाथ यांचे नावही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याची जोरदार चर्चा आहे.

दीया कुमारी आणि सीपी जोशी यांचेही नाव आघाडीवर 

जयपूर घराणाच्या दीया कुमारी यांच्याकडे वसुंधरा राजे यांचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. दीया कुमारी खासदार आहेत. भाजपने दीया कुमारी यांना राजस्थान विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जयपूर जिल्ह्यातील विद्याधर नगर या मतदारसंघातून दीया कुमारी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याशिवाय राजस्थान भाजपचे अध्यक्ष सीपी जोशी हेदेखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, गजेंद्र सिंह शेखावत, भूपेंद्र चौधरी आणि अर्जुनराम मेघवाल, अश्विनी वैष्णव, सुनील बंसल यांचे नावही या यादीत असल्याचे म्हटले जात आहे. भाजपची सत्ता आल्यास यापैकी कोणालाही राजस्थानात पाचारण केले जाऊ शकते, असा कयास बांधला जात आहे. तसेच अनेक जाहीर सभांमध्ये पीएम नरेंद्र मोदींनी अर्जुनराम मेघवाल यांचे नाव ज्या पद्धतीने घेतले आहे, त्यामुळे त्यांनाही मुख्यमंत्रीपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. 
 

Web Title: rajasthan assembly election result 2023 who will be the chief minister of rajasthan many leaders of bjp in competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.