'कुपोषणाचा कलंक पुसण्यासाठी प्रयत्न करणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:43 PM2019-01-30T23:43:38+5:302019-01-30T23:43:55+5:30

आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांचा निर्धार; कर्जतमध्ये जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळा

Will try to wipe out malnutrition | 'कुपोषणाचा कलंक पुसण्यासाठी प्रयत्न करणार'

'कुपोषणाचा कलंक पुसण्यासाठी प्रयत्न करणार'

Next

कर्जत : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने आॅक्टोबर २०१८ पासून कम्युनिटी अ‍ॅक्शन फॉर न्यूट्रिशन नावाने कुपोषण निर्मूलनासाठी नवीन प्रकल्प सुरू केला आहे. महाराष्ट्रातील सहा आदिवासी जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली असून रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात या प्रकल्पाअंतर्गत २९ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत कुपोषण निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला. कर्जत तालुक्यातील ४० अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

कुपोषण निर्मूलनसाठी काम करणाऱ्या दिशा केंद्र या संस्थेची तालुका समन्वयक संस्था म्हणून या प्रकल्पामध्ये निवड झाली असून, दिशाकेंद्र, पंचायत समिती व एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेण यांच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. हा प्रकल्प प्रभावीपणे व एका मॉडल स्वरूपात राबवावा, यासाठी आवश्यक तो निधी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने उपलब्ध करून दिला जाईल, असे मत सहायक प्रकल्प अधिकारी डी. डी. काळपांडे यांनी मांडले.

कुपोषणामध्ये फक्त पोषण न मिळणे हे एकच कारण नसून गरोदरपणातील काळजी, सहा वर्षापर्यंत मुलांच्या पोषणाची योग्य काळजी, आरोग्य व पोषणाच्या योजना प्रभावीपणे राबवणे या सोबतच बालविवाह, दोन मुलांतील जन्माचे अंतर, कुटुंब नियोजन या सर्व बाबींचा एकत्रित परिणामातून कुपोषण वाढते, ते कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत आदिवासी विभागाच्या सल्लागार डॉ. शुभलक्ष्मी यांनी मांडले. साथी संस्था पुण्याचे शैलेश डिखळे व दिशाकेंद्र कर्जतचे अशोक जंगले यांनी ‘कम्युनिटी अ‍ॅक्शन फॉर न्यूट्रिशन’ या प्रकल्पाची माहिती दिली.

एकही मूल कुपोषणाचा बळी ठरू नये यासाठी पोषण आरोग्य सेवा सुधारणे, आरोग्य विभाग, बालविकास विभाग, आदिवासी विभाग व महसूल विभागाचे समन्वयातून व गाव पातळीवर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी अधिकारी यांच्या समन्वयातून हा प्रकल्प यशस्वीपणे राबवला जाईल असा विश्वास पंचायत समितीचे वरिष्ठ गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी व्यक्त केला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Will try to wipe out malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण