पर्यटनस्थळ विकासाच्या प्रतीक्षेत, श्रीवर्धन तालुक्यातील जावेळेला भाविकांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 07:02 AM2018-05-28T07:02:06+5:302018-05-28T07:02:06+5:30

श्रीवर्धन तालुका पर्यटकांसाठी नंदनवन ठरत आहे. नगर परिषदेने शहरातील पर्यटनपूरक बाबींकडे लक्ष देत स्थानिक पातळीवर पर्यटन गर्दी खेचण्यात यश प्राप्त केले आहे.

Waiting for the tourist destination, the choice of devotees to Jawale in Shrivardhan taluka | पर्यटनस्थळ विकासाच्या प्रतीक्षेत, श्रीवर्धन तालुक्यातील जावेळेला भाविकांची पसंती

पर्यटनस्थळ विकासाच्या प्रतीक्षेत, श्रीवर्धन तालुक्यातील जावेळेला भाविकांची पसंती

Next

- संतोष सापते
श्रीवर्धन - श्रीवर्धन तालुका पर्यटकांसाठी नंदनवन ठरत आहे. नगर परिषदेने शहरातील पर्यटनपूरक बाबींकडे लक्ष देत स्थानिक पातळीवर पर्यटन गर्दी खेचण्यात यश प्राप्त केले आहे. मात्र तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक पर्यटनस्थळे विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. मौजे जावेळे गावातील प्राचीन शंकर मंदिर पायाभूत सोयीसुविधांच्या अभावांमुळे पर्यटनास मुक्त आहे.
श्रीवर्धन शहरापासून मौजे जावेळे हे गाव १२ किमी अंतरावर वसलेले आहे. जावेळे हे दक्षिण काशी असलेल्या हरिहरेश्वरपासून ९ किमी अंतरावर आहे. श्रीवर्धनकडून जावेळेकडे जाताना गालसुरे फाट्यावरून ३ किमी वळण रस्त्यावरून जावे लागते. गावची लोकसंख्या ६०० च्या आसपास आहे. जावेळे येथील प्राचीन स्वयंभू शंकर मंदिर हा एक अनमोल ठेवा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात उच्च डोंगर, डेरेदार वनराई हे मंदिर परिसराचे वैशिष्ट्य आहे. श्रावण महिन्यात तालुक्यातील असंख्य भाविक महादेवाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी करतात. स्थानिक जनतेकडून सदरच्या मंदिराचा जीर्णोद्धार एकदा करण्यात आला होता. त्यानंतर आजमितीस पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात दुर्लक्ष करण्यात आल्याचे निदर्शनास येते आहे. प्राचीन शंकर मंदिराचा मुख्य रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. त्यामुळे वाहतुकीस असंख्य अडचणी उद्भवत आहेत. भाविक व पर्यटक यांचा ओढा सदरच्या स्थळाकडे आहे; परंतु सोयीसुविधांच्या कमतरतेमुळे पर्यटक जावेळेस दुय्यम स्थान देतात. दक्षिण काशी हरिहरेश्वर येथे वर्षाला लाखो भाविक व पर्यटक भेट देतात. ते सर्व भाविक व पर्यटक जावेळेच्या स्वयंभू शंकर मंदिराच्या दर्शन व भेटीसाठी येऊ शकतात. रस्ता हा मुख्य प्रश्न आहे. गावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते आहे. पर्यटनास चालना मिळाल्यास हरिहरेश्वरच्या धर्तीवर स्थानिक पातळीवर रोजगाराची निर्मिती होऊ शकते. तरु णांचा मुंबईकडे आकर्षित होण्याचा वाढता कल कमी होण्यास मदत होईल. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती व लोकजागृतीची नितांत आवश्यकता आहे.
कोकणची नैसर्गिक रचना लक्षात घेता पर्यटनास पोषक वातावरण आहे. त्यासोबत मूलभूत गरजा व पायाभूत सुविधांची निर्मिती केल्यास पर्यटनास चालना मिळू शकते. कुसमेश्वर, मदगड व जावेळेचे शंकर मंदिर यांच्याकडे योग्य लक्ष केंद्रित केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती सहज शक्य आहे. हॉटेल व्यवसायास गती प्राप्त होऊ शकते. त्यासोबत वाहतूक व्यवसायाची भरभराट शक्य आहे. स्थनिक जनता शेतात निर्माण करणाऱ्या मालास बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. फणस, केळी, आंबा यासोबत मासळी व्यवसाय गती प्राप्त करू शकतो.
कोकणात औद्योगिकीकरणास चालना न देता निसर्ग सौंदर्याचा उपयोग करून पर्यटन विकास शक्य आहे. जावेळेपासून १३ किमीवर बागमांडला हे गाव आहे. बागमांडला येथे जलवाहतुकीची व्यवस्था आहे. त्याच्याजवळच ३ किमी अंतरावर हरिहरेश्वरचा अथांग समुद्रकिनारा लाभला आहे. भौगोलिक रचनेनुसार जावेळे संपन्न आहे.

आम्ही गावपातळीवर पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. येथे भाविक व पर्यटक यांची नेहमी गर्दी असते. रस्ता ही मुख्य समस्या आहे. गाव ते मंदिर रस्ता खराब झाला आहे. पर्यटक वाढीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- हरिश्चंद्र मळेकर,
माजी सरपंच, जावेळे
जावेळेकडे जाणाºया पर्यटकांना आम्ही फाट्यावर सोडतो. मुख्य मंदिरापर्यंत पक्क्या रस्त्याच्या अभावी आम्ही मंदिरापर्यंत जाऊ शकत नाही. विशेषत: श्रावण महिन्यात सदर मार्गावर गर्दीमुळे धंदा जास्त असतो. हरिहरेश्वरच्या तुलनात्मकदृष्ट्या पर्यटक जावेळेला कमीच जातात.
- शैलेश ठाकूर, चालक,
विक्र म वाहतूकदार
एस टी वाहतूक तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वत्र चालू आहे. जावेळे फाट्यावर प्रवासी चढ-उतार केला जातो. पर्यटनवृद्धी झाल्यास निश्चितच सदर मार्गावर फेºयांमध्ये वाढ करण्यात येईल.
- माणिक टेंगले, एस.टी. स्थानक प्रमुख, श्रीवर्धन

स्थानिक जनतेला पर्यटन व्यवसायाचे महत्त्व समजले आहे. त्यादृष्टीने आम्ही पर्यटनपूरक बाबींकडे लक्ष केंद्रित करीत आहोत. जावेळेचे जागृत देवस्थान आहे. गावकºयांना रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. तसेच शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करून तालुक्यातील जावेळे हे पर्यटन क्षेत्र घोषित करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- सुजित तांदळेकर,
शिवसेना संपर्कप्रमुख, श्रीवर्धन

जावेळे गाव हे अद्याप विकासाच्या मुख्य प्रवाहात आलेले नाही. तेथे पर्यटनास फारच वाव आहे. जावेळेचे पुरातन शंकर मंदिर हे वनराईच्या सान्निध्यात वसलेले आहे. भविष्यात संधी मिळाल्यास जावेळेच्या विकासासाठी निश्चितच प्रयत्न करू. पर्यटनपूरक बाबींकडे लक्ष देण्याचा आमचा मानस आहे.
- दर्शन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष, श्रीवर्धन

जावेळे शिवमंदिरास पर्यटक व भाविक जास्तीतजास्त यावेत यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. सन २०१४मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निधीतून विविध कामे करण्यात आली.
- अभय पाटील, ग्रामसेवक,
जावेळे ग्रामपंचायत

Web Title: Waiting for the tourist destination, the choice of devotees to Jawale in Shrivardhan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.