सह्याद्रीवाडीला भूस्खलनाचा धोका; ग्रामस्थ भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 03:10 AM2018-07-24T03:10:09+5:302018-07-24T03:10:30+5:30

१३ कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर; भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून लवकरच पाहणी

The risk of landslides in Sahyadriwadi; The villagers are frightened | सह्याद्रीवाडीला भूस्खलनाचा धोका; ग्रामस्थ भयभीत

सह्याद्रीवाडीला भूस्खलनाचा धोका; ग्रामस्थ भयभीत

googlenewsNext

- सिकंदर अनवारे

दासगाव : महाड तालुक्यातील आंबेशिवथर गावाच्या वरील बाजूस असलेल्या दुर्गम अशा सह्याद्रीवाडी या धनगरवस्तीत जमिनीला भेग पडल्याने भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले असून, ग्रामस्थांनी आपली घरे सोडून डोंगराखाली स्थलांतर केले आहे. त्यांच्या वाडीवरील काही ग्रामस्थांची घरे आंबेशिवथर गावाजवळ असल्याने या पाच घरात सह्याद्रीवाडीवरील जवळपास १३ कुटुंबे एकत्रित राहत आहेत.
महाड तालुक्यातील आंबेशिवथर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावापासून दोन किलोमीटर उंच डोंगरावर सह्याद्रीवाडी (धनगरवाडी) वसाहत आहे. गेली दीडशे वर्षे हे लोक या ठिकाणी राहत असून, याठिकाणी १३ घरे आहेत. गेला आठवडाभर पडत असलेल्या पावसाने जमिनीला भेगा पडल्याचे दिसून आले. या वाडीवर घरांपासून जवळपास साधारण ३० फूट अंतरावर जमिनीला तडे गेले आहेत. यामुळे जमीन खचते की काय अशी भीती ग्रामस्थांना वाटू लागली आहे. पावसाची संततधार आणि जमिनीला पडलेल्या भेगा पाहून स्थानिक प्रशासनाने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. आंबेशिवथर गावाजवळ सह्याद्रीवाडीवरील काही लोकांनी दोन वर्षांपूर्वी घरे बांधली आहेत. त्या ठिकाणी सध्या हे ग्रामस्थ रहात आहेत.
भेगा पडून जमीन खचल्याची माहिती महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार यांना कळताच त्यांनी त्वरित सह्याद्रीवाडी, आंबेशिवथर, पारमाची या गावांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती सपना मालुसरे, गटविकास अधिकारी मंडलिक, विस्तार अधिकारी वाघमोडे, माजी सरपंच सुभाष मालुसरे, आंबेशिवथरचे सरपंच विठ्ठल मालुसरे यांनी वाडीतील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करून भविष्यात पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांची डोंगरावरून पायपीट
आंबेशिवथर गावापासून दोन किमी अंतरावर डोंगरात वसलेल्या सह्याद्रीवाडीत सुमारे पंधरा घरे असून ७८ ग्रामस्थ पिढ्यानपिढ्या राहात आहेत.
जवळपास २२ विद्यार्थ्यांना विद्यालयीन शिक्षणासाठी दररोज पायपीट करावी लागते, तर काही ग्रामस्थ माणगाव आणि गोरेगाव येथे मजुरीसाठी जातात. सह्याद्रीवाडीत रस्ता, पिण्याचे पाणी, अशा मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थ हलाखीचे जीवन जगत आहेत.

सद्यस्थितीत सह्याद्रीवाडीतील सर्व ग्रामस्थांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था मंदिर आणि शाळांतून करण्यात आली आहे. परिसराची पाहणी भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांकडून होईपर्यंत ग्रामस्थांचा मुक्काम येथेच राहील.
- प्रदीप कुडळ, नायब तहसीलदार,महाड

Web Title: The risk of landslides in Sahyadriwadi; The villagers are frightened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.