रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची बिकट अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 02:31 AM2019-06-27T02:31:46+5:302019-06-27T02:32:36+5:30

विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून पालकातून संताप व्यक्त केला जात आहे

In the Raigad district, the Zilla Parishad schools are in critical condition | रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची बिकट अवस्था

रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची बिकट अवस्था

googlenewsNext

आंबेमाची, हळदुले शाळा बंदच!

प्रकाश कदम
पोलादपूर : शैक्षणिक वर्ष १७ जूनपासून सुरू झाले. शाळेचा पहिला दिवस शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्याचा असतो. मात्र, पोलादपूर तालुक्यातील आंबेमाची व हळदुळे गावातील शाळांचा अजून पहिला दिवस उजाडलाच नाही, कारण तेथे शिक्षकांची संख्या शून्य असून पदे रिक्त आहेत, या शाळांची दारे उघडलीच नाहीत. शाळा सुरू होऊन दहा दिवस झाले तरी या शाळेचे दरवाजे बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून पालकातून संताप व्यक्त केला जात आहे

पोलादपूर पंचायत समिती येथील शिक्षण विभागातील मुख्य शिक्षण विस्तार अधिकारीपदी प्रभारी असणारे सुभाष साळुंखे हेच गेली काही वर्षे कारभार सांभाळत आहेत. यामुळे बराचसा कारभार व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू आहे. पोलादपूर तालुक्यातील आंबेमाची पटसंख्या ५, हळदुले पट ६ ,कालवली मराठी पट ४,कालवली पाटीलवाडी पट ३, कामथवाडी पट ५, खांडज पट ५ ,कुडपण खुर्द पट १२, पिंपळवाडी पट १, क्षेत्रपाळ गावठाण पट १०, बोरघर पट ८, वाकनमुरावाडी पट ४, कुंभळवणे पट २,गौळवाडी पट २ अशी विद्यार्थी संख्या असून प्रत्येकी शाळेत २ पदे शिक्षकांची रिक्त आहेत. त्यामुळे या १३ शाळांमधील अनेक शाळा बंद आहेत, नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवले जाते, मात्र अजूनही आंबेमाची, हळदुले या शाळांना शैक्षणिक साहित्य मिळालेच नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले. या शाळा शिक्षकाविना बंद आहेत.

प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांनी शाळा केंद्रातील चिरेखिंड शाळेत चालवण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात असा आदेश दिला नसल्याची माहिती उघड झाली,केंद्रप्रमुख अनिल पाटील यांनी लहुलसे शाळेतील शिक्षकांना आंबेमाची, हळदुले शाळा चालवण्याच्या आदेश व्हॉट्सअ‍ॅपवर दिल्याचे सांगितले. त्यामुळे शिक्षण विभागाचा कारभार व्हॉट्सअ‍ॅपवर चालत असल्याचे दिसून येते.

रिक्त पदे
पोलादपूर शिक्षण विभागात वरिष्ठ शिक्षण अधिकारी दोनपैकी एक पद रिक्त, कनिष्ठ विस्तार अधिकारी दोन पदे रिक्त, केंद्रप्रमुख १३ पैकी ९ पदे रिक्त, शिक्षक ३३३ पैकी २६७ असून ६६ पदे रिक्त.

आज शाळा सुरू होऊन १० दिवस झाले असून शिक्षक नसल्याने शाळा बंद पडली आहे, तसेच विद्यार्थ्यांना कोणतेही शैक्षणिक साहित्य देण्यात आले नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
होत आहे.
- सुवर्णा कुमठेकर, अध्यक्ष
शाळा व्यवस्थापन समिती, आंबेमाची

कुंभे शाळा सुरुवातीचे चार दिवस बंद

- गिरीश गोरेगावकर
माणगाव : राज्यात १७ जून रोजी शाळा सुरू झाल्या; परंतु माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेची शाळा कुंभे माणगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सीताराम मोहिते यांच्या हलगर्जीमुळे सुरू झाली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
संपूर्ण राज्यात १७ जून रोजी शाळा सुरू करण्याचे शासनाने आदेश दिले होते; परंतु त्यापूर्वी १५ जून रोजी सर्व मुख्याध्यापकांची सभा घेऊन पुस्तके ताब्यात देण्यात आली. शिक्षक हजर असल्याची खातरजमा करण्यात आली. शासनाने १७ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव व पुस्तक वाटप कार्यक्रम संबंधित शाळांच्या परिसरात लोकप्रतिनिधीकडून करावयाचा आदेश आहे; परंतु शिक्षणाधिकारी मोहिते यांच्या हलगर्जीमुळे येथील लोकप्रतिनिधींना साधे निमंत्रण देण्याचे सौजन्य दाखविले नाही. कुंभे येथील शिक्षक द. ला. सुरवसे यांची शाळा सुरू होण्यापूर्वीच आंतरजिल्हा बदली झाली आहे; परंतु मोहिते यांनी या शाळेवर दुसऱ्या तात्पुरत्या शिक्षकाची नेमणूक करणे गरजेचे असताना तसे न करता सुरवसे यांना कार्यमुक्त केले. त्यामुळे या शाळेवर शिक्षकच नसल्याने ही शाळा सुरुवातीचे चार दिवस बंद होती. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप, नवीन बालके प्रवेश हा कार्यक्रम १७ जूनला सकाळी १० वाजता घ्यावयाचा होता, मात्र कार्यक्रम झाला नाही. याला सर्वस्वी जबाबदार गटशिक्षणाधिकारी मोहिते हेच आहेत असे ग्रामस्थांचे म्हणणे असून नुकत्याच झालेल्या आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीतसुद्धा गटशिक्षणाधिकारी मोहिते यांच्याबाबत निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे, गांगवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोर तोंडलेकर यांनी प्रश्न उपस्थित करून त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. कुं भेशाळेत शिक्षकच नसल्याने या शाळेवर तात्पुरता शिक्षक सोनावणे यांची नेमणूक २१ जून रोजी करून शाळा सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी सीताराम मोहिते यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य; इमारतीची दुरवस्था
कुंभे शाळा ही डोंगरावर दुर्गम भागातील शाळा आहे. शाळेच्या परिसरात घाण पसरली असून दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. शाळेचे दरवाजे मोडलेल्या अवस्थेत आहेत तर खिडक्यांना झडपा नसून पत्रा मारून बंद केलेल्या दिसत आहेत. दरवाजातून एखादे जनावर घुसू शकते अशी अवस्था रायगड जिल्हा परिषदेच्या कुंभे शाळेची झाली आहेत. तरी याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष के ले जात आहे.

महाडमध्ये उर्दू शाळा खासगी इमारतीत

- सिकंदर अनवारे
दासगाव : महाड तालुक्यातील उर्दू शाळांची सध्या बिकट अवस्था असून या उर्दू शाळांना स्वतंत्र इमारती नसल्याने या शाळा अन्य इमारतीमध्ये भरवल्या जातात. जिल्हा परिषदेकडून मिळणाºया अल्प भाड्यामुळे इमारत दुरुस्ती होत नाही, यामुळे या शाळांमधील मुलांना मोडक्या शाळेत बसण्याची पाळी आली आहे.
महाड तालुक्यात सर्व शिक्षण अभियानातून अनेक प्राथमिक शाळा बांधण्यात आल्या. मात्र, यामध्ये उर्दू शाळा वंचित राहिल्या आहेत. तालुक्यात उर्दू शाळांची देखील मराठी प्राथमिक शाळांप्रमाणेच अवस्था झाली आहे. पटसंख्या घटल्याने या शाळादेखील बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. तालुक्यात दासगाव, कांबळे, अप्पर तुडील या तीन विभागात ३२ उर्दू प्राथमिक शाळा आहेत. यापैकी जवळपास २२ शाळांना स्वत:च्या इमारती नाहीत. या शाळा अन्य इमारतीमध्ये किंवा जमातीच्या इमारतीमध्ये चालवल्या जातात. महाडमधील दासगाव उर्दू, टोळ बु., वीर, वहूर, केंबुर्ली, किंजलोळी, रावढळ, कांबळे, राजेवाडी, अप्पर तुडील, चिंभावे, कुंबळे, लोअर तुडील, तेलंगे, खुटील, नडगाव, वराठी या गावांतील उर्दू प्राथमिक शाळा या खाजगी इमारतींमधून चालवल्या जात आहेत. जिल्हा परिषद याकडे दुर्लक्ष करत असून या इमारतींना अल्प भाडे दिले जात आहे. यामुळे या इमारतींची देखभाल दुरुस्ती या अल्प भाड्यात शक्य होत नाही. यामुळे अनेक शाळांचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे तर अनेक शाळांची दुरुस्ती न झाल्याने मोडकळीस आल्या आहेत.

इमारतीची दुरवस्था
या इमारती खासगी जागेत असल्याने निधी मिळत नाही. त्यामुळे शिक्षकाला पदरमोड करून दुरुस्ती करावी लागत आहे. वराठी गावात असलेल्या प्राथमिक उर्दू शाळेत सहा मुलेच आहेत. मात्र, येथील वर्ग हे जमातीच्या इमारतीत भरत आहेत. या ठिकाणी दुरुस्ती अनुदान नसल्याने शाळेचे छप्पर मोडकळीस आले आहे. शिवाय स्वच्छतागृहांची देखील अवस्था बिकट झाली आहे.

उर्दू माध्यमिक प्राथमिक शाळा या खासगी इमारतीमध्ये असल्याने त्यांना शासकीय दुरुस्ती निधी प्राप्त होत नाही. या शाळा भाडेतत्त्वावर आहेत. त्यामुळे संबंधित संस्था अगर जमातीने या दुरुस्त करणे अपेक्षित आहे.
- अरुणा यादव,
गटशिक्षण अधिकारी, महाड

तालुक्यातील बहुतांश उर्दू शाळा या खासगी जागेत भरवल्या जातात. यांना जिल्हा परिषद अल्प भाडे देत आहे. यामध्ये वाढ केल्यास इमारतींची दुरुस्ती करणे शक्य होणार आहे.
- शहनवाज अनवारे,
अध्यक्ष, दासगाव जमात
 

Web Title: In the Raigad district, the Zilla Parishad schools are in critical condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.