आदर्श ग्राम योजनेच्या निधीबाबत प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 02:00 AM2018-06-27T02:00:58+5:302018-06-27T02:01:00+5:30

रायगड जिल्ह्यातील तीन गावे सांसद आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत

Question about funds for the Adarsh ​​Gram Yojana | आदर्श ग्राम योजनेच्या निधीबाबत प्रश्नचिन्ह

आदर्श ग्राम योजनेच्या निधीबाबत प्रश्नचिन्ह

Next

आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील तीन गावे सांसद आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. १७२ विकासकामांपैकी १२१ कामे पूर्ण करण्यात संबंधित यंत्रणांना यश आले आहे. यात मावळचे खासदार श्रीरंग बारणे वगळता खासदार अनंत गीते आणि खासदार किरीट सोमय्या यांनी खासदार निधीचा एक रुपयाही खर्च केलेला नाही. बहुतांश कामे सीएसआर फंडातून करण्यात आली आहेत. विविध योजनांसाठी खर्च करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा एकत्रित हिशोब एकाही प्रशासकीय यंत्रणेकडे नसल्याने सांसद आदर्श ग्राम योजनेतील झालेल्या कामांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सांसद आदर्श ग्राम योजना आहे. त्यामुळे ती केंद्र सरकार तसेच त्या-त्या राज्य सरकारांसाठीही तितकीच महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक खासदारांनी पहिल्या टप्प्यात आपापल्या मतदार संघातील किमान एका गावाचा विकास करायचा आहे. यासाठी त्यांनी त्यांना दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या पाच कोटी खासदार निधीचा विनियोग करण्याला सरकारने कोणतीच हरकत घेतलेली नाही. निधीची कमतरता पडू नये यासाठी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून तो घेण्याची मुभा सरकारनेच परिपत्रक काढून दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चिंचोटी ग्रामपंचायत भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी विकासासाठी दत्तक घेतली आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे खासदार तथा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावाचा विकास करण्याचे ठरवले, तर शिवसेनेचेच मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील बांधपाडा या गावाचा समावेश केला आहे. खासदार बारणे यांनी आपल्या खासदार निधीतील तब्बल ४५ लाख रुपये या गावाच्या विकासासाठी दिले आहेत, मात्र खासदार अनंत गीते आणि खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांच्या खासदार निधीतील एक रुपयाही खर्च केलेला नाही.
गावांचा विकास करताना बहुतांश सीएसआर फंडातूनच कामे जास्त झाल्याचे बोलले जाते. उर्वरित कामे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यासारख्या अन्य फंडातून झाली आहेत तर काही प्रस्तावितही आहेत.
यातील गंभीर बाब म्हणजे विकासकामांवर खर्च करण्यात आला आहे त्याची एकत्रित आकडेवारी ग्रामपंचायतीकडे नाही, तसेच तहसीलदार अथवा प्रांताधिकारी यांच्याकडेही नाही.
जिल्ह्यातील विकासकामांचे नियोजन करणाºया जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडेही झालेल्या खर्चाचा एकत्रित तपशील उपलब्ध नव्हता. ग्रामपंचायत, तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालयाकडे तो मिळू शकेल, असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अशा खर्चाची एकत्रित आकडेवारी कोणाकडेच सापडली नाही. त्यामुळे आदर्श सांसद ग्राम योजनेतील कामे खरोखरच झाली आहेत का अथवा ती कागदावरतीच पूर्ण केल्याचे दाखवले जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया चिंचोटीचे ग्रामस्थ अ‍ॅड. राकेश पाटील यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. गावामध्ये जी कामे झाली आहेत त्या कामांचा दर्जा संबंधित अधिकाºयांनी कधी तपासून पाहिला आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दर तीन महिन्यांनी
आढावा बैठक आवश्यक
नियमानुसार सांसद आदर्श ग्राम योजनेचा आढावा संबंधित खासदारांनी दर तीन महिन्यांनी घेणे आवश्यक आहे.
मात्र गेल्या वर्षभरात अशा कोणत्याच कामांचा आढावा घेण्यासाठी कोणत्याच खासदारांनी स्वारस्य दाखवले नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे या योजनेसाठी खासदार उत्साही नसल्याचे दिसून येते. विशेष बाब म्हणजे यातील दोन खासदार शिवसेनेचे, तर एक खासदार भाजपाचा आहे. तीनही खासदार हे केंद्रामध्ये सत्तेत सहभागी आहेत.

Web Title: Question about funds for the Adarsh ​​Gram Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.