शाळापूर्व तयारी मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य, शिक्षण विभागाच्या उपक्रमामुळे पटसंख्या वाढीसाठी होणार मदत

By निखिल म्हात्रे | Published: April 26, 2024 11:19 AM2024-04-26T11:19:03+5:302024-04-26T11:20:42+5:30

‘पहिले पाऊल’ हा शाळापूर्व तयारी मेळावा उपक्रम रायगड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये राबविण्यात आला.

Pre school preparation fair puts smiles on students faces Education Department s initiative will help boost pass numbers | शाळापूर्व तयारी मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य, शिक्षण विभागाच्या उपक्रमामुळे पटसंख्या वाढीसाठी होणार मदत

शाळापूर्व तयारी मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य, शिक्षण विभागाच्या उपक्रमामुळे पटसंख्या वाढीसाठी होणार मदत

अलिबाग : ‘पहिले पाऊल’ हा शाळापूर्व तयारी मेळावा उपक्रम रायगड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये राबविण्यात आला. या आगळ्यावेगळ्या स्वागताने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मुलांना शिक्षणाची गोडी वाटावी यासाठी हा प्रयत्न आहे.

शाळांमधील परीक्षा संपल्या आहेत. एक ते दोन मे रोजी अनेक शाळांमधील परीक्षांचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळांबद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठी शाळापूर्व तयारी मेळावा अभियान सुरू करण्यात आले आहे.

खासगीकरणामुळे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ती वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील दोन हजार ९१० शाळांमध्ये शाळापूर्व तयारी अभियान राबविले. या अभियानानिमित्ताने पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व खाऊ देऊन स्वागत केले. पालकांचादेखील यावेळी सन्मान करण्यात आला.

...असे झाले स्वागत
शाळेच्या पहिल्या दिवशी चौलमळा येथील प्राथमिक शाळेत दाखल करताना नवीन प्रवेशार्थी विद्यार्थ्यांची बैलगाडीमधून संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, संपूर्ण शाळेची सजावट करण्यात आली होती. पहिले पाऊल टाकताना कागदावर कुंकवात उजवे पाऊल बुडवून त्यांचे ठसे घेण्यात आले. त्यावर शाळेचे व मुलांचे नाव शाळेत दाखल केल्याची तारीख टाकून तो कागद लॅमिनेशन करून शाळेत जतन करून ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका विनिता थळकर यांनी दिली.

जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढावी, जिल्हा परिषद शाळेबद्दल विद्यार्थ्यांना आकर्षण निर्माण व्हावे यासाठी शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये हा उपक्रम शनिवारी घेण्यात आला.
कृष्णा पिंगळा,
गटशिक्षणाधिकारी, अलिबाग

Web Title: Pre school preparation fair puts smiles on students faces Education Department s initiative will help boost pass numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.