prakash mehta removed ravindra chavan new guardian minister of raigad district | दणका ! रायगडच्या पालकमंत्रिपदावरून प्रकाश मेहता यांची अखेर उचलबांगडी

मुंबई : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मेहतांकडे गृहनिर्माण खाते आणि रायगडचे पालकमंत्रिपद होते. मात्र, पालकमंत्रिपदावरून त्यांची गच्छंती झाली आहे.  त्यांच्या जागी अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी हे यामागचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
मेहता यांच्या जागी डोंबिवलीचे आमदार व राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. चव्हाण हे अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, बंदरे, वैद्यकीय शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. 
सावित्री नदी दुर्घटनेवेळी प्रकाश मेहतांविरोधात मोठी संतापाची भावना होती. त्यावेळीच त्यांना पालकमंत्रिपदावरुन हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. पालकमंत्री म्हणून  मेहतांचं जिल्ह्याकडं दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी होत्या. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनासारखे महत्त्वाचे कार्यक्रमही ते गांभीर्यानं घेत नव्हते. या साऱ्याचा फटका त्यांना बसल्याची चर्चा आहे.