अलिबागमध्ये पोलिसांनी गिरवले निवडणूक प्रशिक्षणाचे धडे

By निखिल म्हात्रे | Published: January 31, 2024 05:26 PM2024-01-31T17:26:27+5:302024-01-31T17:27:10+5:30

लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक विभागदेखील कामाला लागला आहे.

Police conducted election training sessions in alibaug | अलिबागमध्ये पोलिसांनी गिरवले निवडणूक प्रशिक्षणाचे धडे

अलिबागमध्ये पोलिसांनी गिरवले निवडणूक प्रशिक्षणाचे धडे

निखिल म्हात्रे,अलिबाग : लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक विभागदेखील कामाला लागला आहे. मंगळवारी नियोजन भवन येथे पोलिसांसाठी दोन सत्रात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. विविध विभागात संवेदनशील मतदान केंद्र नव्याने समाविष्ट होऊ शकतात का, याची माहिती संबंधित प्रशिक्षणार्थींना घ्यावी लागणार आहे. 3 फेब्रुवारीपर्यंत ही माहिती त्यांनी जिल्हा निवडणूक विभागाला पाठवायची आहे. त्यानंतर संबंधित माहिती 10 फेब्रुवारीपर्यंत भारतीय निवडणूक आयोगला कळवण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांनी दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर बंदोबस्ताची जबाबदारी असली तरी त्यांनाही निवडणूक नियमांची माहिती असणे अपेक्षित असल्याने त्यांना निवडणूकविषयीचे बारकावे सांगण्यात आले. पोलिसांना निवडणूक कायदा आणि अधिकाराबाबतही माहिती देण्यात आली. निवडणूक आदर्श आचारसंहिता, कायदेशीर कार्यवाही, मतदा केंद्र प्रक्रिया, संवेदनशील मतदान केंद्रे आणि तेथील कार्यवाही, प्रत्यक्ष निवडणूक आणि मतमोजणीच्या दिवशीची भूमिका, संशयास्पद हालचाली, पैशांचा वापर यासंदर्भात कायद्यातील तरतूद आणि अधिकार याविषयीची माहिती पोलिसांना देण्यात आली.

मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत या विधानसभा क्षेत्रांचा समावेश होता. या विभागासाठी सकाळ सत्रात प्रशिक्षण देण्यात आले, तर अलिबाग, पेण, महाड आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघासाठी दुपार सत्रामध्ये प्रशिक्षण पार पडले. यासाठी 355 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. काही पोलीस प्रशिक्षणार्थींनी काही शंका उपस्थित केल्या, त्यांचे निरसन करण्यात आले. निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्याबाबत निवडणूक विभाग सक्षम आहे. यापुढेही अन्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडणार असल्याचे उबाळे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Police conducted election training sessions in alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.