‘पाली भूतीवली’चे पाणी बिल्डरांसाठी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 11:33 PM2019-05-27T23:33:46+5:302019-05-27T23:33:57+5:30

कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी पाली भूतीवली धरणाची निर्मिती शासनाने केली आहे.

'Pali Bhoothawale' for water builders? | ‘पाली भूतीवली’चे पाणी बिल्डरांसाठी?

‘पाली भूतीवली’चे पाणी बिल्डरांसाठी?

Next

- कांता हाबळे 

नेरळ : कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी पाली भूतीवली धरणाची निर्मिती शासनाने केली आहे. शासनाचा हा उद्देश पाली भूतीवली धरणात यशस्वी झालेला दिसत नाही. कारण धरणाच्या जलाशयात २००४ पासून पावसाचे पाणी साठून राहत असून पाटबंधारे विभागाने शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी कालवे बांधले नसल्याने शेती केली जात नाही. दरम्यान,पडून असलेले पाणी तेथील बिल्डर अनेक वर्षे वापरत आहेत, मात्र त्यावर शासनाचा कोणताही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.
पाली भूतीवली धरण तेथील तीन गावे स्थलांतरित करून बांधण्यात आले असून परिसरातील १५ गावामधील ११०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी हे धरण बांधले गेले. १९९२ मध्ये धरणाचे काम सुरू झाले आणि धरणाची मुख्य भिंत २००४ मध्ये पूर्ण झाल्यानंतर धरणाच्या जलाशयात पाणीसाठा झाला. मात्र त्यावेळपासून आजतागायत धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्याकरिता कालवे बांधण्यात आलेले नाहीत. पाटबंधारे खात्याला एवढ्या वर्षात कालवे बांधण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करता आले नाही. त्यामुळे मुख्य कालवा आणि उजवा तसेच डावा असे १५ किलोमीटर लांबीचे कालवे बांधून पूर्ण झाले नाहीत.
परिणामी शेतीसाठी पाणी सोडता येत नाही अशी भूमिका पाटबंधारे खाते घेत असते. परंतु या धरणाची निर्मिती शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी करण्यात आली होती, पण शासनाचा हा उद्देश कागदावर राहिला असून धरणाचे पाणी बिल्डर लॉबीसाठी आंदण दिले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
>धरण उशाला आणि कोरड घशाला; ग्रामस्थांची अवस्था
धरणाच्या मुख्य जलाशयात वीज पंप टाकून त्याद्वारे पाणी उचलले जात असून त्यावर पाटबंधारे खात्याचे पर्यायाने शासनाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. कारण तेथील एका बिल्डरला पाणी देण्याचा पाटबंधारे खात्याने केलेला करार डिसेंबर २०१६ मध्ये संपला आहे असे असताना देखील धरणाच्या जलाशयातून पाण्याचा उपसा सुरू आहे.
त्यावेळी धरणाच्या समोर असलेल्या आणि धरण ज्या ग्रामपंचायतीमध्ये आहे त्या ग्रामपंचायतीमधील सर्व वाड्यांना साधे पिण्याचे पाणी नाही. मात्र त्यावेळी बिल्डर लॉबी वापरत असलेल्या पाण्यावर त्या त्या ठिकाणी स्वीमिंग पूल पाण्याने भरलेले आहेत असे विदारक चित्र पाली भूतीवली धरण परिसरात आहे.
धरण उशाला आणि कोरडा घशाला अशी स्थिती पाली भूतीवली हद्दीमधील ग्रामस्थांची झाली असून त्यात अधिक रहिवासी हे आदिवासी आहेत, त्यांना मात्र या पाण्याचा काहीही उपयोग होत नाही. त्याचवेळी धरणाचे कालवे अनेक शेतकऱ्यांनी जमिनी देऊन देखील करण्यात येत नसल्याने स्थानिक लोकांनी पाटबंधारे खात्याला जबाबदार धरले आहे. पाटबंधारे विभाग बिल्डरसाठी आपले पाणी राखून ठेवत असून त्यांना पाणी देण्यासाठी धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्याकरिता कालवे बांधले जात नसल्याचा आरोप देखील स्थानिक शेतकरी करीत आहेत.
>आपण या धरणाच्या कामाला गती मिळावी म्हणून प्रयत्न केले आहेत, त्यामुळे धरणाची उभारणी ज्यासाठी झाली आहे,तो उद्देश सफल करण्यासाठी आपला शासन दरबारी पाठपुरावा सुरू राहील. कालवे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी मिळावा यासाठी देखील आपले प्रयत्न सुरू असून स्थानिक लोकप्रतिनिधी यांची मानसिकता शेतीला पाणी मिळावे अशी दिसत नसल्याने शेतकरी वर्ग आपल्या शेतात कधी पाणी येणार याकडे चातकासारखी वाट पाहत आहे.
- देवेंद्र साटम, माजी आमदार
>धरणातील पाणी देण्याबाबतचे सर्व अधिकार कोलाड विभागीय कार्यालयाला असून तेथून कोणालाही पाणी देण्याचे कोणतेही निर्देश आले नाहीत. त्यामुळे सध्या त्या खासगी संस्थेला धरणातून पाणीपुरवठा सुरू असल्याबद्दल तत्काळ चौकशी केली जाईल. त्याचवेळी कालव्यांची कामे करण्यासाठी आवश्यक निधीची मागणी शासनाकडे केली आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर तत्काळ कालव्यांच्या कामांना सुरुवात होईल.
- पी.सी. रोकडे, उपअभियंता, पाटबंधारे विभाग
>पाली -भूतीवली या धरणाची निर्मिती शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी करण्यात आली होती, परंतु अनेक वर्षे उलटूनही परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. या भागातील आदिवासी बांधवांना देखील पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, परंतु त्यांना देखील या धरणाचे पाणी मिळत नाही. शासनाचा हा उद्देश कागदावर राहिला असून धरणाचे पाणी बिल्डर लॉबीसाठी आंदण दिले. बिल्डर धरणाच्या मुख्य जलाशयात वीज पंप टाकून पाणी उचलत आहे. पाटबंधारे खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाने लवकरात लवकर या भागातील शेतकºयांना शेतीसाठी पाणी द्यावे, अशी परिसरातील आम्हा सर्व शेतकºयांची मागणी आहे.
- हेमंत घारे, शेतकरी-उमरोली

Web Title: 'Pali Bhoothawale' for water builders?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.