स्वच्छ रायगडला केवळ ३३% मतदान; फक्त ४९ हजार ६७४ मतदारांनी केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 11:35 PM2018-09-05T23:35:57+5:302018-09-05T23:36:14+5:30

 Only 33% polling in clean Raigad; Only 49 thousand 674 voters made the poll | स्वच्छ रायगडला केवळ ३३% मतदान; फक्त ४९ हजार ६७४ मतदारांनी केले मतदान

स्वच्छ रायगडला केवळ ३३% मतदान; फक्त ४९ हजार ६७४ मतदारांनी केले मतदान

Next

- आविष्कार देसाई

अलिबाग : वोट फॉर स्वच्छ रायगड साठी आॅनलाईन मतदान प्रक्रिया पुर्ण झालीे. ग्रामीण भागातील १६ लाख ६४ हजार पाच लोकसंख्येपैकी फक्त ४९ हजार ६७४ मतदारांनी म्हणजे ३३.४९ टक्के मतदारांनी मतदान केले आहे. रायगडकरांनी मतदान करण्यासाठी दाखवलेली उदासीनता जितकी अधोरेखित होते, तितकेच स्वच्छ सर्वेक्षणात रायगड जिल्ह्याला अव्वल स्थानी आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी केलेले प्रयत्न अपुरे पडल्याचेही प्रकर्षाने जाणवते. मतदारांनी मतांचे दान कमी टाकले असले तरी, रायगड जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये कोकणात प्रथमस्थानी आला आहे, तर राज्यामध्ये आठव्या स्थानावर आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने या बाबतच्या जिल्हास्तरीय एक, तसेच प्रत्येक तालुकास्तरावर एक, अशा एकूण १६ कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. त्याचप्रमाणे बॅनर, होर्डिंग्ज, रॅली, भिंती रंगवणे आणि आढावा सभाही घेतल्या होत्या. आॅनलाइन वोटिंगसाठी फक्त पाच गुण देण्यात आले होते. रायगड जिल्ह्याला ते मिळाले आहेत. मात्र, एकूणच वोटिंगची आकडेवारी वाढली असती, तर जिल्हा प्रथम स्थानावर निश्चितपणे राहिला असता.
रायगड जिल्ह्याला अव्वल आणण्याची जबाबदारी ही पाणी व स्वच्छता विभागाची होती, तशीच ती रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मतदारांचीही होती. लोकप्रतिनिधींनीही यामध्ये विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले नाही. स्वत: निवडणुकीत उभे असतात, तेव्हा जिंकण्यासाठी जीवाचे रान करत असल्याचे सर्वांना माहितीच आहे; परंतु ती लोकप्रतिनिधींची तळमळ वोट फॉर रायगडसाठी दिसून आली नाही.

सोशल मीडियावर अफवांचे पेव
- देशामध्ये रायगड जिल्हा अव्वल स्थानी आलेला आहे, त्यामुळे ३० आॅक्टोबरला रायगड जिल्ह्याचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अशा प्रकारची चुकीची पोस्ट सोशल मीडियावर फिरत होती. याची गंभीर दखल रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने घेतली. चुकीच्या पोस्ट टाकून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्यात येईल, असा इशारा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.

रायगडला कोकणात सर्वाधिक मते
रायगड जिल्ह्याची २०११ च्या जनगणनेनुसार १६ लाख ६४ हजार ००५ लोकसंख्या आहे. त्यामध्ये १३ लाख ४४ हजार ३४५ पुरुष मतदार, तर १२ लाख ८९ हजार ८५५ स्त्री मतदार आहेत. नुकत्याच झालेल्या वोट फॉर रायगडसाठी रायगड जिल्ह्यातील फक्त ४९ हजार ६७४ ग्रामीण जनतेने मतदान केले. त्याची टक्केवारी ही फक्त ३३.४९ टक्के एवढी आहे. हे प्रमाण एकूण ग्रामीण लोकसंख्येच्या अगदीच नगण्य असेच म्हणावे लागेल. ६६.५१ टक्के लोकांनी मतदानात सहभाग घेतला नाही.
रायगड जिल्ह्याला अवघे ३३.४९ टक्के एवढे मतदान झाले, असे असले, तरी रायगड जिल्हा हा कोकण विभागामध्ये अव्वल ठरला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला २९ हजार २५८ मते मिळाली. रत्नागिरी जिल्ह्याला १३ हजार ४९३, ठाणे जिल्हा नऊ हजार २७६ आणि पालघरला आठ हजार ४६६ मते मिळाली. त्यामुळे रायगड जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक मते मिळाल्याने प्रथमस्थानी राहिला आहे.

प्रशासनाला जनतेपर्यंत पोहोचण्यास उशीर
स्वच्छ भारत अभियान देशभर राबवण्यात येत आहे. आता या अभियानामध्ये कोणत्या जिल्ह्याने खरोखरच प्रयत्न करून जिल्हा स्वच्छ केला आहे का? हे जाणून घेण्यासाठी केंद्रीय समितीमार्फत नुकतेच सर्वेक्षणाचे कामही संपलेले आहे. सर्वेक्षण करताना आॅनलाइन मतदान करण्याचा पर्याय रायगडकरांसाठी ठेवण्यात आला होता. आपल्या जिल्ह्यासाठी आॅनलाइन वोटिंग करण्याच्या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने जनजागृती करण्याला आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात केली.मतदानासाठी १ आॅगस्ट ते ३१ आॅगस्ट अशी मुदत देण्यात आली होती, त्यामुळे प्रशासनाला जनतेपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला, हे कोणीच नाकारू शकत नाही.

Web Title:  Only 33% polling in clean Raigad; Only 49 thousand 674 voters made the poll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड