रायगडाच्या लोकसभा उमेदवारी साठी आता शिवसेनेची एन्ट्री, विकास गोगावले यांचे झळकले भावी खासदार म्हणून बॅनर

By राजेश भोस्तेकर | Published: March 9, 2024 01:45 PM2024-03-09T13:45:14+5:302024-03-09T13:45:39+5:30

आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून महाडमध्ये बॅनर झळकले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात महायुतीमध्येच उमेदवारीवरून रणसंग्राम निर्माण झाला आहे. 

Now Shiv Sena's entry for Raigad's Lok Sabha candidature, | रायगडाच्या लोकसभा उमेदवारी साठी आता शिवसेनेची एन्ट्री, विकास गोगावले यांचे झळकले भावी खासदार म्हणून बॅनर

रायगडाच्या लोकसभा उमेदवारी साठी आता शिवसेनेची एन्ट्री, विकास गोगावले यांचे झळकले भावी खासदार म्हणून बॅनर

अलिबाग : रायगड लोकसभा जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. जिल्ह्यातील शिवसेना आमदार यांचा सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी असताना शिवसेना शिंदे गटातर्फे युवा सेनेने लोकसभा निवडणुकीत उडी मारली आहे. आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून महाडमध्ये बॅनर झळकले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात महायुतीमध्येच उमेदवारीवरून रणसंग्राम निर्माण झाला आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी तर्फे बैठकांचे सत्र सुरू आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. रायगडात यावेळी लोकसभा जागेवरून महायुतीमध्येच रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजप ही रायगडाची जागा लढविण्यास इच्छुक आहे. केंद्र स्तरावर रायगड भाजप नेत्याची मोर्चे बांधणी सुरू आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत. तटकरे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी असा पक्षाचा आग्रह आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रायगड लोकसभा जागेवरून आपापसात झगडा सुरू आहे. 

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील जागेचा तिढा सुटलेला नाही आहे. त्यात आता शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेने लोकसभा उमेदवारी साठी उडी घेतली आहे. शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. महाड मध्ये विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून बॅनर झळकले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रायगडाची जागा मिळावी यासाठी मागणी करणार असल्याचे युवा  सेनेकडून सांगितले जात आहे. 

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले तर पालकमंत्री उदय सामंत यांनी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनाच उमेदवारी मिळावी अशी प्रतिक्रिया आधी बोलून दाखवली आहे. मात्र युवा सेनेच्या सेनेच्या एन्ट्रीने रायगड लोकसभा जागेवरून ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे महायुतीत वरिष्ठ पातळीवर नेते मंडळी रायगडाच्या जागेचा तिढा सोडविणार कसा याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Now Shiv Sena's entry for Raigad's Lok Sabha candidature,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.