महाड - कुर्ला धरणाला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:14 PM2019-07-06T23:14:53+5:302019-07-06T23:15:06+5:30

वर्षानुवर्षे दुरुस्ती रखडली, झाडे-झुडपे वाढल्याने भिंत कमकुवत

Mahad - Kurla dam leak | महाड - कुर्ला धरणाला गळती

महाड - कुर्ला धरणाला गळती

googlenewsNext

- सिकंदर अनवारे


दासगाव : महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुर्ला धरणाला गेल्या काही वर्षांपासून गळती लागली आहे. हे धरण दुरुस्त करण्याबाबत धरण सुरक्षा समिती आणि पाटबंधारे विभागाला महाड नगरपालिकेने पत्रव्यवहार केला आहे, मात्र हा प्रस्ताव लालफितीत अडकल्याने धरणाची दुरुस्ती रखडली आहे.


महाड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १९६२ साली कुर्ला धरण बांधण्यात आले आहे. धरणाचे काम दगडी असून क्षमता जवळपास ०.५११ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. आतापर्यंत केवळ एकदाच धरणातील गाळ काढल्याचे सांगण्यात येते, मात्र गेल्या चाळीस वर्षांत धरणाची दुरुस्ती वा गाळ काढून स्वच्छता झालेली नाही. यामुळे सध्या धरणाची दुरवस्था झाली आहे.


महाडमधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून कुर्ला धरण शहरवासीयांची तहान भागवत आहे. सध्या कुर्ला धरणाची देखभाल महाड नगरपरिषदेच्या अखत्यारीत आहे. मात्र पालिकेच्या दुर्लक्षामुळे धरणाची दुरवस्था झाली आहे. येथे असलेल्या सुरक्षा कर्मचारी निवासाचे खंडर बनले आहे. धरणाच्या भिंतीवरील वाटेला तडे गेले आहेत. तर धरणाच्या एका बाजूला गळती लागली आहे.


धरणाकडे जाणाºया वाटेला मोठे भगदाड पडले आहेत. येथील रेलिंगही तुटून गेले आहे. धरणाच्या भिंतीवर झाडे-झुडपे वाढल्याने कमकुवत होऊन तडा जाण्याची शक्यता आहे. धरणाला जवळपास तीन ते चार ठिकाणी गळती लागली आहे. ही गळती अद्याप दुरुस्त करण्यात आलेली नाही. धरणाच्या देखभाल दुरुस्तीचे काम महाड नगरपरिषदेकडे असले तरी धरणाबाबत तांत्रिक माहिती नसल्याने पालिकेने २७ मार्च २०१७ रोजी एक ठराव केला आहे. ठरावानुसार धरणाचे मजबुतीकरण, गळती काढणे, साइड रेलिंग, नवीन पाथवे, फेन्सिंग, गेट, सुरक्षारक्षक निवास या कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार धरणाच्या दुरुस्तीबाबत अहवाल तयार करण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. तर धरणाचे सर्वेक्षण करण्याचे काम नाशिक येथील धरण सुरक्षा समितीकडे देण्यात आल्याची माहिती महाड नगर पालिकेच्या अभियंत्यांनी दिली.


महाड नगर परिषदेने केलेल्या ठरावानुसार धरणाचे मजबुतीकरण, उंची वाढवणे, पदपथ दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे. धरण सुरक्षा समितीकडून अद्याप कोणताच अहवाल आलेला नाही.
 

गेल्या अनेक वर्षांत कुर्ला धरणाची देखभाल दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे धरणाची भिंतही कमकुवत झाली आहे. धरणाचा दुरुस्तीबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
- सुनील कविस्कर,
बांधकाम सभापती


महाड शहराजवळील कुर्ला धरणाच्या दुरुस्तीबाबत संपूर्ण धरणाचे सर्वेक्षण करून अहवाल धरण सुरक्षा समितीकडे पाठवण्यात आला आहे. अंतिम निर्णय अद्याप आला नाही.
- सुहास कांबळे, अभियंता, बांधकाम विभाग

Web Title: Mahad - Kurla dam leak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.