उन्हेरे येथे कुंडावर सोई-सुविधांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 11:22 PM2019-01-29T23:22:29+5:302019-01-29T23:22:47+5:30

आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याची स्थानिकांची मागणी

The lack of comfort in the trunk at Unhere | उन्हेरे येथे कुंडावर सोई-सुविधांचा अभाव

उन्हेरे येथे कुंडावर सोई-सुविधांचा अभाव

Next

- विनोद भोईर 

पाली : सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरम पाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र, येथे मूलभूत सुविधांची वानवा असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. येथील स्वच्छतागृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्नान करणाऱ्यांना कपडे बदलण्यासाठी खोल्या उपलब्ध नाहीत. शासकीय विश्रामगृहही बंद आहे. अशा अनेक गैरसुविधांमुळे येथे येणाºया पर्यटकांची गैरसोय होत आहे, त्यामुळे येथे किमान आवश्यक सोयी-सुविधा व्हाव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

रायगड जिल्ह्यात महाड येथील सव आणि सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथे गरम पाण्याचे कुंड आहेत. त्यातील उन्हेरे येथील कुंडांना पर्यटक व नागरिकांची अधिक पसंती आहे. या कुंडातील पाणी अंघोळीसाठी योग्य आणि स्वच्छ आहे; परंतु कुंडाजवळ असलेले रायगड जिल्हा परिषदेचे शासकीय विश्रामगृह बंद आहे. १९९३-९४ मध्ये बांधलेल्या या विश्रामगृहाची काही वर्षांपूर्वी दुरु स्ती होऊनही सद्यस्थितीत विश्रामगृह बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. विश्रामगृहाच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांना येथे राहता येत नाही, त्यांची मोठी गैरसोय होते.

उन्हेरे कुंड परिसरात असलेल्या विठ्ठल-रखमाई मंदिरासमोरील सभामंडपाचे काम कित्येक वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. या सभागृहाचा काही भाग खासगी जागेत असल्यामुळे काम अडले आहे, असे स्थानिकांनी सांगितले. तर डीपीडीसीच्या माध्यमातून फंड आल्यास सभागृहाचे काम पूर्ण होऊ शकते, असे जानकारांनी सांगितले. या सर्व सोयी-सुविधा झाल्यास या भागात पर्यटकांचा ओघ अधिक प्रमाणात वाढून पर्यटन विकासाला चालना मिळू शकेल.

पर्यटकांनीही येथे स्वच्छता राखून शांतता अबाधित ठेवणे गरजेचे आहे. येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर विश्वस्तांतर्फे तशा स्वरूपाचे फलकही लावण्यात आले आहेत. येथील दुरवस्थेकडे लक्ष देऊन कुंडाच्या ठिकाणी तसेच परिसरातस्वच्छता करावी. तसेच येथे येणाºया पर्यटकांसाठी संबंधितांनी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

उन्हेरे गरम पाण्याचे कुंड
पालीपासून अडीच ते तीन कि.मी. अंतरावर उन्हेरे गरम पाण्याचे कुंड आहेत, येथे एकूण तीन कुंड आहेत, त्यातील एक कुंड थंड पाण्याचे आहे तर उर्वरित दोन कुंड गरम पाण्याची आहेत. यापैकी थंड पाण्याचे व त्याच्या शेजारी असलेले गरम पाण्याचे कुंड उघड्यावर असून आकाराने लहान आहेत. तर दुसरे कुंड बंदिस्त असून, त्यामध्ये महिला व पुरु षांसाठी दोन भाग केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी या कुंडाच्या भोवती टाइल्स लावून रंगरंगोटी करण्यात आली आहे; परंतु येथील कपडे बदलण्यासाठी असलेल्या खोलीची दुरवस्था झाली आहे. सध्या ती कुलूप लावून बंद केली आहे, तसेच तेथे अस्वच्छता पसरली आहे.

स्वच्छतागृहाची झाली दुरवस्था
विश्रामगृहाच्या शेजारीच निर्मल भारत अभियानाअंतर्गत दोन लाख रु पये खर्चून फेब्रुवारी २०१४ मध्ये चार स्वच्छतागृह बांधण्यात आली आहेत; परंतु या स्वच्छतागृहामध्ये पूर्णपणे घाण झाली आहे. काही दरवाजे तुटले आहेत. देखभाल नसल्याने या स्वच्छतागृहाचा कोणालाही वापर करता येत नाही, तसेच या स्वच्छतागृहाच्या शेजारी अनेक वर्षांपासून असलेले कपडे बदलण्यासाठीच्या खोल्याही पूर्णपणे मोडकळीस आल्या असून खराब झाल्या आहेत. परिणामी, बाहेरील कुंडावर स्थानासाठी आलेल्या पर्यटकांना उघड्यावरच कपडे बदलावे लागतात.

येथे शासकीय निधीतून जी कामे झाली आहेत त्यांची कुठल्याच प्रकारे दुरु स्ती व देखभाल केली जात नाही. स्वच्छतागृह बांधले; पण तेथे पाण्याची व्यवस्था केली नाही. परिसरात कचराकुंड्या नाहीत. पर्यटक जेवण करतात त्याचा कचरासुद्धा तेथेच टाकलेला असतो. रात्री मद्यपींचा त्रास होतो. विश्रामगृहाचीसुद्धा दुरवस्था झाली आहे. येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर संस्थानाकडे कुंडाची देखभाल करण्याची अधिकृत परवानगी शासनाने दिल्यास व त्यांना त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला तर त्यांच्या मार्फत येथे देखभाल व सुरक्षा व्यवस्थितरीत्या राखली जाऊ शकते. तसेच शासनदेखील त्यांच्याकडे या संदर्भात जाब मागू शकेल.
- शिवमूर्ती पवार,
पोलीस पाटील, उन्हेरे

बल्लाळेश्वरच्या दर्शनासाठी आलेले भाविक तालुक्यातील हा नैसर्गिक ठेवा अनुभवण्यासाठी आवर्जून येतात. येथील परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. तेथे आवश्यक सोयी-सुविधा असणे गरजेचे आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून तसेच शासकीय निधीतून आगामी काळात येथे सोयी-सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- साक्षी दिघे, सभापती, पंचायत समिती, पाली-सुधागड

धार्मिक व भौगोलिकदृष्ट्या या ठिकाणास खूप महत्त्व आहे. त्यामुळे येथे असलेल्या गैरसोयी दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाकडून मुबलक निधी कुंड आणि त्याच्या परिसराच्या विकासासाठी उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा आहे.
- नंदकुमार देशमुख, ग्रामस्थ, उन्हेरे

शासनाने आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच कुंडाची आणि येथे असलेल्या वास्तूची नियमित देखभाल, दुरु स्ती होणे गरजेचे आहे.
- राजेश जमधरे, ग्रामस्थ, उन्हेर

Web Title: The lack of comfort in the trunk at Unhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड