पोलिसांनी जीव धोक्यात टाकून केला चोराचा तपास; अलिबागमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 09:31 PM2017-09-05T21:31:31+5:302017-09-05T21:31:47+5:30

मंगळवारी भर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अलिबाग पोलिसांच्या बिटमार्शल पोलीस मंगेश बिरवाडकर यांना एका आठवले या ज्येष्ठ नागरिक महिलेचा फोन आला,

Investigators investigate the life of the police; Events in Alibaug | पोलिसांनी जीव धोक्यात टाकून केला चोराचा तपास; अलिबागमधील घटना

पोलिसांनी जीव धोक्यात टाकून केला चोराचा तपास; अलिबागमधील घटना

Next

जयंत धुळप
रायगड, दि. 5- मंगळवारी भर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अलिबाग पोलिसांच्या बिटमार्शल पोलीस मंगेश बिरवाडकर यांना एका आठवले या ज्येष्ठ नागरिक महिलेचा फोन आला, आमच्या शेजारच्या जेष्ठ नागरिक महिला नम्रता जयप्रकाश नागवेकर (६९) यांच्या प्लॅटमध्ये चोर घूसला असून,त्याने आतून दरवाजा लावून घेतला आहे. बिटमार्शल पोलीस मंगेश बिरवाडकर यांनी आपला सहकारी पोलीस शिपाई राजू शिंदे यांच्यासह मोटरसायकलवरुन थेट या जेष्ठ नागरिक महिला रहात असलेल्या अलिबाग शहरातील ब्राम्हण आळीमधील शिवम सोसायटी गाठली.

ज्येष्ठ नागरिक महिला नागवेकर व आठवले यांच्याकडून प्राथमिक माहिती घेवून, इमारतीला लागूनच असलेल्या अत्यंत जिर्ण झालेल्या व धोकादायक अशा पत्र्याच्या शेडवर चढून पूढे नागवेकर यांच्या गॅलरीच्या ग्रिलची कडी तोडून, गॅलरीचा दरवाजा उघडून त्यांच्या घरात प्रवेश केला. घरात तपासणी केली असता, चोर कुठेच दिसून आला नाही. त्यानी तसेच पूढे जावून नागवेकर यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लॅचलॉक आतून नेहमी प्रमाणे उघडून श्रीमती नागवेकर यांना त्यांच्याच घरात घेतले. घरात चोर नसल्याची खातरजमा त्यांना करुन दिली,आणि नागवेकर यांनी निश्वास टाकला.

बिटमार्शल पोलीस मंगेश बिरवाडकर आणि पोलीस शिपाई राजू शिद यांनी हा नेमका काय प्रकार झाला याची शांतपणे चौकशी केली असता, सार्‍या प्रकाराचा उलगडा झाला. श्रीमती नागवेकर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेजारील श्रीमती आठवले यांच्या कडे गेल्या. त्यावेळी नागवेकर यांच्या घराचा दरवाजा वार्‍याने वा अन्य कारणाने बंद झाला आणि दरवाजाला असणारे लॅचलॉक आपोआप आतून बंद झाले. श्रीमती नागवेकर आपल्या घरी आल्यावर दरवाजा उघडण्यास गेल्या असता ,दरवाजा आतून बंद करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.आणि आपल्या घरात चोर घूसला असल्याचा समज झाला. श्रीमती आठवले यांच्या कडे अलिबाग पोलीस बिट मार्शलचा माेबाईल नंबर हाेता. आप्तकालीन परिस्थितीत त्यांना सहकार्य तत्काळ मिळावे याकरिता ज्येष्ठ नागरिकांना अलिबाग पाेलीसांचे हे नंबर्स जाणीवपूर्व देण्यात आले आहेत. श्रीमती आठवले यांनी माेबाईलवर फाेन केला आणि १० मिनीटांच्या आत पोलीस तेथे दाखल झाले. आणि पूढे तपास झाला. नसलेला चोर सापडणार नाही हे वास्तव, परंतू चोर आहे, अशी माहिती मिळताच त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तपास करणे हे कर्तव्य बिटमार्शल पाेलीस मंगेश बिरवाडकर आणि पोलीस शिपाई राजू शिद यांनी बिनचूक निभावले. चोर नाही हे सिद्ध करुन त्यांनी ज्येष्ठ महिला नागरिकांचा एक माेठा विश्वास संपादन केला हे पोलीस दलाच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे.
लॅचलॉक असर्‍या दरवाजाच्या वापरा बाबत ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत बिटमार्शल पोलीस स्टेशन वा पोलीस कट्रोलरुमला फोन करावा, पोलिसांचे सहकार्य त्यांना सत्वर उपलब्ध राहील असे आवाहन अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे यांनी केले आहे.

Web Title: Investigators investigate the life of the police; Events in Alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.