होळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी; सलग सुट्ट्यामुळे ट्रॅव्हल्सची चलती

By वैभव गायकर | Published: March 23, 2024 01:10 PM2024-03-23T13:10:51+5:302024-03-23T13:12:12+5:30

सलग सुट्ट्या आल्याने पनवेल परिसरात विविध महत्वाच्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी पहावयास मिळत आहे.

crowd of travelers going to the village for holi travels continue due to consecutive vacations | होळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी; सलग सुट्ट्यामुळे ट्रॅव्हल्सची चलती

होळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी; सलग सुट्ट्यामुळे ट्रॅव्हल्सची चलती

वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: होळी व धुळवड आपल्या गावी जाऊन नातेवाइकांसोबत साजरी करतात.यावर्षी या सणाच्या तोंडावर शनिवार,रविवार आणि सोमवार अशा सलग सुट्ट्या आल्याने पनवेल परिसरात विविध महत्वाच्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी पहावयास मिळत आहे.

कळंबोली,पनवेल बस डेपो,खारघर याठिकाणी शनिवार दि.23 रोजी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.विशेष म्हणजे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरु झाली आहे. अनेकांनी महिन्यापूर्वीच आरक्षण करुन ठेवले होते. कोकणात  जाणाऱ्या गाड्यांची प्रतीक्षायादीही तितकीच मोठी आहे.कोंकण रेल्वेच्या माध्यमातुन होळी निमित्त विशेष गाड्यांचे देखील नियोजन करण्यात आले आहे. अचानक वाढलेल्या गर्दीचा फायदा उठवत ट्रॅव्हल्सवाल्यांनीही तिकिटाचे दर पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढविल्याची ओरड आहे.रेल्वे गाड्यांमध्ये अशी गर्दी झाल्याचे पाहून ट्रॅव्हल्सवाल्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत.कळंबोली मॅक्डोनाल्ड स्टॉप वरून पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी जाणाऱ्या ट्राव्हॅल्स चालकांची गर्दी पहावयास मिळत आहे.

विविध राज्यांत होळी-धुळवडीचा सण वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा करण्याची परंपरा आहे. कुठे रंगाचा काला करून त्यात मित्रमंडळींना नखशिखान्त ओले करण्याचा, तर कुठे दंड्यांनी बदडून काढण्याची (लठमार) पद्धत आहे. कुठे गोड गाठी खाऊ घालून, तर कुठे भांग अन् चणा-चिवडा खाऊ घालून नाचत, गात रंगोत्सव साजरा करण्याची परंपरा जोपासली जाते. आपल्या गाव, शहरात साजरा होणाऱ्या उत्साहाने ओतप्रोत असणाऱ्या रंगोत्सवात सहभागी होण्यासाठी अनेकांनी आपापल्या गाव, शहरांकडे धाव घेतली आहे.

Web Title: crowd of travelers going to the village for holi travels continue due to consecutive vacations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.