उमरोली पुलावर अडकली कार; पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:30 PM2019-07-20T23:30:45+5:302019-07-20T23:31:07+5:30

चालकाच्या प्रसंगावधानामुळे चौघांचे वाचले प्राण

Car stuck on Umaroli bridge; | उमरोली पुलावर अडकली कार; पुराचा फटका

उमरोली पुलावर अडकली कार; पुराचा फटका

googlenewsNext

पनवेल : दोन आठवड्यापूर्वी उमरोली येथील पुलावरून दोन जणांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. शनिवार, २० जुलै रोजी याच पुलावरून सायंकाळी ५.३० च्या सुमारास एक चारचाकी कार वाहून जाताना वाचली आहे. यातील चारही जण सुरक्षित असून घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उमरोली गावात जाण्या-येण्यासाठी असलेल्या छोट्याशा पुलावरून ९ जुलै रोजी दुचाकीवरून वाहून गेलेल्या सारिका आंब्रे व आदित्य आंब्रे यांचा मृत्यू झाला होता. ग्रामस्थाचे न ऐकून घेता आदित्य याने दुचाकी पाण्यात टाकल्याने ते वाहून गेले होते. यातील आदित्य याचा मृतदेह ११ जुलै रोजी जुई कामोठे येथे तर सारिका हिचा मृतदेह १७ जुलै रोजी बेलापूर खाडीत सापडला होता. २० जुलै रोजी पनवेल परिसरात पुन्हा एकदा पावसाने मुसळधार सुरु वात केल्याने गाढी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे उमरोलीच्या पुलावरून पाणी वाहून जात होते. पुलावरून फूटभर पाणी वाहून जायला लागल्यावर येथील गावातील ग्रामस्थ बाहेर जाण्याचे थांबतात. मात्र, या गावात सोसायटी झाल्याने येथे राहणाऱ्या नागरिकांना या पाण्याचा अंदाज येत नाही व ते या पुलावरून पाणी वाहून जात असतानाही गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. शनिवारी पनवेलच्या दिशेने एमएच ०२ ईपी ९४०१ गाडी येत होती. या वेळी गावातील काही ग्रामस्थ पुलाच्या पलीकडे उभे होते. पाणी जास्त वाहत जात असल्याने त्यांनी या कारचालकाला कार पाण्यात न टाकण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांचे न एकता कारचालकाने आपली कार पाणी वाहून जाणाºया पुलावरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याची कार दोन वेळा पाण्याचा प्रवाहामुळे मागून उचलत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

प्रसंगावधान राखून चालकाने कशीबशी कार पलीकडे नेली. या वेळी कारमध्ये तीन महिला व एक कारचालक असे चौघे जण होते. सुदैवाने ते पाण्यात वाहून जाता जाता वाचल्याचे येथील प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दैव बलवत्तर म्हणून कार वाहून गेली नाही, अशी भावना या वेळी एका नागरिकाने व्यक्त केली. त्यानंतर घटनास्थळी तालुका पोलीस दाखल झाले, या वेळी कारचालक एवढा घाबरला होता की त्याला व्यवस्थित बोलताही येत नव्हते.

पुलाला एक वर्ष लागणार
उमरोली येथे जवळपास दीड कोटी रुपयांचा नवीन व उंच असणारा पूल बांधण्यात येत आहे. मात्र, हा पूल अर्धवट स्थितीत आहे. मार्च महिन्यात या पुलाचे काम सुरू करण्यात आले असून, पूल तयार करण्यासाठी १२ महिन्यांचा कालावधी असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे.

Web Title: Car stuck on Umaroli bridge;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.