मांडवा बंदरातील कुस्ती स्पर्धांना दीडशे वर्षांची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 01:20 AM2018-08-22T01:20:36+5:302018-08-22T01:20:59+5:30

खाऱ्या मातीत रंगतो आखाडा; हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, छत्रपती पुरस्कारप्राप्त कुस्तीपटूंचा आवर्जून सहभाग

150 years old tradition of wrestling competitions in Mandva Bandh | मांडवा बंदरातील कुस्ती स्पर्धांना दीडशे वर्षांची परंपरा

मांडवा बंदरातील कुस्ती स्पर्धांना दीडशे वर्षांची परंपरा

googlenewsNext

- जयंत धुळप 

अलिबाग : ‘दंगल’ चित्रपटामुळे कुस्तीत जगप्रसिद्ध झालेल्या फोगट गर्ल्सचीच चुलत बहीण विनेश फोगट हिने सोमवारी इतिहास रचला. आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीचे सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला मल्ल ठरली. मात्र, या कुस्तीचे मूळ महाराष्ट्राच्या मातीत शेकडो वर्षांपूर्वी रुजले आहे. अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरावर समुद्रकिनारच्या खाºया मातीत नारळी पौणिमेच्या दिवशी होणाºया कुस्ती स्पर्धेने ‘कुस्ती’ या क्रीडा प्रकारास समाजमान्यता देऊन मोठे यश प्राप्त केले आहे.
मांडवा बंदरावरील दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या कुस्ती स्पर्धांची कथा मोठी रोचक आहे. त्याकाळी अलिबाग-मुरुड तालुक्यांना जोडणारा साळाव पूल नव्हता. अलिबाग तालुक्यातील मांडवा हे बंदर मुंबई बंदराच्या सर्वात जवळचे बंदर होते. मांडवा बंदरात श्रमिक कामगारांकडून मालाची चढ-उतार होत असे तर बैलगाडीतून माल रेवदंड्याला आणि गलबतातून पलीकडे साळावला जात असे. त्याकाळी करमणुकीची साधने नसल्याने सण-उत्सवाचे औचित्य साधून खेळांचे आयोजन करण्याची संकल्पना कोकणात प्रसिद्ध होती. मांडवा बंदरात श्रमिक कामगारांसाठी, त्यांचे मनोरंजन तसेच ताकद वाढविण्यासाठी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली.
मांडवा बंदरातील खाºया वाळूत नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून १५० वर्षांपूर्वी बैलगाडीवाल्यांनी वर्गणी काढून कुस्ती स्पर्धा सुरू करण्यात आल्याचे मांडव्याच्या टाकादेवी स्पोर्ट्स क्लबचे सचिव सुनील म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मांडव्याच्या बैलगाडीवाल्यांनी सुरू केलेल्या कुस्ती स्पर्धेत विजयी मल्लास रुमाल आणि बिल्ले अशी पारितोषिके त्याकाळात देण्यात येत असे. त्यानंतर आगरी-कोळी समाजाने स्पर्धांची पारितोषिके रोख आणि लाकडी ढाल अशा स्वरूपात देण्यास प्रारंभ केला.
टाकादेवी स्पोटर््स क्लबने स्पर्धा आयोजित करण्यास प्रारंभ केल्यापासून पारितोषिके अधिकाधिक आकर्षित झाली. मोठ्या रोख पारितोषिकांबरोबरच घड्याळे आणि मेटल चषक अशा पारितोषिकांचा प्रारंभ झाला. गतवर्षी आव्हानाची कुस्ती तब्बल ७५ हजार रुपये रोख पारितोषिकाची झाली. मानाच्या आव्हानाच्या कुस्तीकरिता कुस्तीशौकिनांकडून संकलित होणाºया पारितोषिकांच्या रोख रकमेपैकी ७० टक्के विजयी कुस्तीपटूस तर ३० टक्के उपविजेत्या कुस्तीपटूस देण्याची आगळी परंपरा येथे असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
कालांतराने साळावच्या खाडीवरचा आणि अन्य पूल तयार झाले. दळणवळणाची साधने वाढली आणि बैलगाडीचा वापर बंदच झाला. परिणामी बैलगाडीवाल्यांनी सुरू केलेली ही कुस्ती स्पर्धा मांडवा पंचक्रोशीतील कोळी-आगरी समाज बांधवांनी वर्गणी काढून सुरू ठेवून परंपरा अबाधित राखली.

कुस्तीच्या जोरावरच नोकरी
सध्या राज्य परिवहन मंडळात वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत असलेले गजानन पाटील हे राष्ट्रीय कुस्तीपटू याच टाकादेवी स्पोर्ट्स क्लबचे सदस्य आणि सक्रिय कार्यकर्ते आहेत. पाटील यांच्याप्रमाणेच मांडवा पंचक्रोशीतील अनेक तरुणांनी व्यायामशाळेत शरीर कमावून कुस्तीपटू बनून जिल्हा,राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावून याच कुस्तीच्या जोरावर विविध कंपन्या आणि पोलीस दलात नोकºया संपादन केल्या आहेत.

पुरस्कारप्राप्त कुस्तीपटू
टाकादेवी स्पोर्ट्स क्लबच्यावतीने आयोजित कोकणातील १५० वर्षांपूर्वीच्या मांडव्याच्या बंदरातील खाºया वाळूतील कुस्तीचे आगळेपण संपूर्ण देशभरातील कुस्तीमल्लांच्या मोठ्या औत्सुक्याचा विषय बनले आहे.
गेल्या २०-२५ वर्षांपासून देशातील हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, छत्रपती पुरस्कारप्राप्त कुस्तीपटू आवर्जून स्पर्धेत सहभागी होतात. या व्यतिरिक्त सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई आदी जिल्ह्यातील कुस्ती आखाड्यांतील कुस्तीपटू या नारळीपौर्णिमा कुस्ती स्पर्धेत मांडवा बंदरातील खारी माती अंगाला लावण्यात धन्यता मानतात.

Web Title: 150 years old tradition of wrestling competitions in Mandva Bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड