पालखी मार्गाच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळणार कधी?

By admin | Published: May 29, 2017 02:52 AM2017-05-29T02:52:54+5:302017-05-29T02:53:39+5:30

जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज ३३२ व्या पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी

When will the Palkhi corridor get its start? | पालखी मार्गाच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळणार कधी?

पालखी मार्गाच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळणार कधी?

Next

राजेंद्र काळोखे/लोकमत न्यूज नेटवर्क
देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज ३३२ व्या पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी असताना पालखी मार्गाची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी अद्यापही संबंधित विभागांना वेळ मिळालेला नाही. पालखीपूर्वी देहू-देहूरोड हा पालखी मार्ग तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. रस्त्याच्या कडेचा राडारोडा, वाढलेली धोकादायक झुडपे, झाडे,
अनधिकृत जाहिरात फलक काढणे, साईडपट्टे भरणे, नवीन झाडे लावणे, पथरस्ते दुरुस्त करणे, रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्या मागे घेणे आदीतून पालखी मार्ग सुरक्षित करावा, अशी भाविकांची व ग्रामस्थांची मागणी आहे.
श्री संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे १६ जूनला प्रस्थान असून या मार्गावरून पालखी १७ जूनला पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डीत दुसऱ्या मुक्कामासाठी जाणार आहे. हा रस्ता पालखी मार्ग म्हणून घोषित होऊन जवळपास पाच वर्षे लोटली, मात्र देहूगाव ते निगडी या मार्गावर पालखी मार्ग विकास कामांच्याअंतर्गत कोणतेही काम अद्याप सुरू झाले नसल्याने त्याचे रुंदीकरणही रखडलेले आहे. देहू ते झेंडेमळा हा अडीच किलोमीटरचा रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वर्ग केला आहे. उर्वरित निगडीपर्यंतचा मार्ग कॅन्टोन्मेंट हद्दीत आहे. देहूरोड फॅक्टरी ते निगडी दरम्यानचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे. या रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. मात्र, झेंडेमळा ते देहूरोडपर्यंतचा रस्ता हा पूर्णपणे कटक मंडळाच्या हद्दीतून जातो. या रस्त्याच्या रुंदीकरणाकडे मात्र अद्यापही दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा पालखी महामार्ग म्हणून रस्त्याच्या विकासासाठी साडेचार हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबत संसदेत सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, या रस्त्याच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे देहूतून निघताना अरुंद रस्त्यावरून पालखी जात असताना मोठी गर्दी होत असल्याने या मार्गाचे तातडीने रुंदीकरण होणे गरजेचे आहे.
रस्त्याचे साईडपट्टी भरलेली नाही. आगोदरच अरुंद असलेल्या रस्त्याच्या कडेला लहान लहान झुडपे वाढलेली असल्याने रस्त्याच्या कडेने भाविकांना चालताना अडचण होते. काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग व काही ठिकाणी बांधकामांचा राडारोडा यामुळे रस्ता अधिकच अरुंद झालेला पहायला मिळतो. झेंडेमळा ते चिंचोली हद्दीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्टी भरलेली नाही. त्यामुळे गर्दीच्या वेळी भाविक रस्त्याच्या कडेने चालताना पडण्याची शक्यता आहे.
रस्त्याच्या कडेला वाहन उतरवताना चालकाला कसरत
करावी लागते. त्यामुळे अपघातही घडतात. देहू शस्त्रास्त्र भांडाराच्या समोर दोन बाभळीची झाडे ही पादचारी मार्गावरच पडलेली असून पादचारी मार्गही पूर्णपणे उखडलेला आहे. या पादचारी मार्गाचा वापर चालण्यासाठी करता येत नाही, अशी परिस्थिती आहे. (क्रमश:)

चिंचोली पालखी तळाची मागणी
चिंचोली येथील श्री संत तुकाराममहाराज पादुका स्थानावर दुपारी जेवणासाठी पालखी विसावत असते. परिसरात केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. यामुळे परिसरात मुरमाचा सडा पडलेला आहे. याच भागात पालखी विसावत असल्याने भाविकही या माळराणावर विसावतात; मात्र त्यांना विश्रांतीसाठी योग्य अशी जागा नाही. शनिमंदिराच्या परिसरातील मोठमोठे खड्डे आहेत ते बुजवावेत, सपाटीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून व भाविकांकडून होत आहे.


रुंदीकरण रखडले
देहू कॅन्टोन्मेंट बोर्डातून काही मार्ग जात असल्याने त्यांनी तातडीने ही कामे करावीत. शासनाने पालखी मार्गाचे तातडीने रुंदीकरण हाती घ्यावे, अशी मागणी संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे व पालखी सोहळा प्रमुख सुनील व अभिजित मोरे यांनी केली आहे.
महाद्वार कमानीजवळ असलेल्या जाहिरातींचे मोठे फलक व रस्त्याच्या अगदी कडेला रोवलेल्या फलकांच्या खांबामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. पण आळंदीकडून देहूरोडला जाणाऱ्या वाहनचालकांना समोरची वाहने दिसत नसल्याने अपघाताची शक्यता आहे. पालखी मार्गावर देहू ते पंढरपूर पालखीमार्गाचे फलक लावावेत. दिशादर्शक फलकही लावावेत, अशी मागणीही होत आहे.

Web Title: When will the Palkhi corridor get its start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.