कालवा दुरूस्तीपर्यंत पाणी पुरवठा बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 07:31 PM2018-09-27T19:31:11+5:302018-09-27T19:59:43+5:30

दांडेकर पुलाजवळील कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. तसेच लाखो लिटर पाणी वाया गेले.

Water supply stop till canal repair | कालवा दुरूस्तीपर्यंत पाणी पुरवठा बंद 

कालवा दुरूस्तीपर्यंत पाणी पुरवठा बंद 

googlenewsNext
ठळक मुद्देलष्कर,पर्वती भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम कालव्याच्या दुरूस्तीसाठी सुमारे दोन दिवसांचा कालावधीकालव्यात पाणी नसल्यामुळे तब्बल ३५० मिलियन लिटर पाण्याचा तुटवडा भासणार

पुणे : खडकवासला कालव्यातून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात पाणी उचलून शहरातील विविध भागात पाणीपुरवठा केला जातो. मात्र, कालवाच फुटल्याने जलशुध्दीकरण केंद्रात पाणी घेता येणे शक्य नाही. त्यामुळे कालव्याची दुरूस्ती होत नाही, तोपर्यंत शहरातील काही भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून बंद पाईपलाईनमधून पर्वती जलशुध्दीकरण केंद्रात पाणी घेतले जाते. तसेच काही पाणी कालव्यातून उचलले जाते. त्यानंतर लष्कर व पर्वती भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दांडेकर पुलाजवळील कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. तसेच लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे खडकवासला धरणातून सोडण्यात आलेले पाणी गुरूवारी साडेअकराच्या सुमारास बंद करण्यात आले. 
कालव्याच्या दुरूस्तीसाठी सुमारे दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत कालव्यात पाणी सोडले जाणार नाही. परिणामी शहरातील काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तर काही भागात दोन दिवस पाणीच येवू शकणार नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजीपूर्वक पाण्याचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.
कालवा फुटल्यामुळे लष्कर भागातील होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून असणाऱ्या कोंढवा, मुंढवा, हडपसर, महमदवाडी, काळेपडळ, येरवडा, कोरेगावपार्क, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, खराडी, वडगावशेरी, चंदननगर, नगररस्ता, विमाननगर आदी भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. 
पर्वती व वडगाव जलकेंद्रच्या कार्यकारी अभियंत्याकडून प्राप्त झालेल्या माहिनीनुसार पर्वती जलशुध्दीकरण केंद्रात कालव्यामधून लष्कर भागासाठी दररोज २५० मिलियन लिटर आणि पर्वती भागासाठी दररोज १०० मिलियन लिटर पाणी घेतले जाते. कालव्यात पाणी नसल्यामुळे तब्बल ३५० मिलियन लिटर पाण्याचा तुटवडा भासणार आहे. परिणामी शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.   

Web Title: Water supply stop till canal repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.