पाच कोटी रुपयांची व्हेल माशाची ‘उलटी’ जप्त; डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई

By नितीश गोवंडे | Published: September 3, 2023 06:39 PM2023-09-03T18:39:07+5:302023-09-03T18:47:45+5:30

गुडलक कॅफेच्या पाठीमागील बाजूला व्हेल माशाच्या उलटीची विक्री होणार असल्याची माहिती डेक्कन पोलिसांची घटनास्थळी धाव

'Vomit' of whale fish worth Rs 5 crore seized; Bold action by Deccan Police | पाच कोटी रुपयांची व्हेल माशाची ‘उलटी’ जप्त; डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पाच कोटी रुपयांची व्हेल माशाची ‘उलटी’ जप्त; डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई

googlenewsNext

पुणे : शहरात एकीकडे गँगवॉर सुरू असताना एक नवीन गुन्हेगारीची घटना उघडकीस आली आहे. समुद्रातील बलाढ्य अशा व्हेल माशाची महागडी उलटी विकण्यासाठी आलेल्या एकाला पकडण्यात डेक्कन पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी पकडलेल्या या उलटीची किंमत ५ कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील अत्यंत रहदारीचा परिसर म्हणवणाऱ्या गुडलक कॅफेच्या पाठीमागील बाजूला व्हेल माशाच्या उलटीची विक्री होणार असल्याची माहिती डेक्कन पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश भोसले यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस यांना फोनद्वारे ही माहिती कळवली. त्यांच्या आदेशावरून भोसले आणि त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने उलटी विक्री करण्यासाठी आलेल्या इसमाला ताब्यात घेतले. यावेळी वनविभागाचे कृष्णा आनंद हाके यांची देखील उपस्थिती होती. विश्वनाथ रतन गायकवाड (३८, रा. खोपडेनगर, गुजरवाडी, कात्रज) असे डेक्कन पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव असून, तो मध्य प्रदेश येथून ही उलटी विकण्यासाठी घेऊन आला होता, अशी माहिती निरीक्षक विपीन हसबनीस यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ गायकवाड याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर त्याच्याकडे असलेल्या सॅकची तपासणी केली असता एका मोठ्या झाडाच्या खोडासारखी वस्तू पोलिसांना आढळली. वनविभागाच्या हाके यांनी ती व्हेल माशाची उलटी असून त्याची किंमत ५ कोटी असल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी पोलिसांनी विश्वनाथ गायकवाड विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याच्या अन्य एका साथीदारासह तो उलटी कुणाला विकण्यासाठी आला होता याचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले करत आहेत.

ही कारवाई पोलिस उपायुक्त संदिप सिंह गील्ल, सहायक पोलिस आयुक्त वसंत कुँवर, डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनिस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश भोसले, दत्तात्रय सावंत, पोलिस हवालदार बोरसे, धनश्री सुपेकर, पोलिस नाईक सचिन गायकवाड, अंमलदार रोहित पाथरूट, महेश काळे, धनाजी माळी आणि दशरथ गभाले यांच्या पथकाने केली.

Web Title: 'Vomit' of whale fish worth Rs 5 crore seized; Bold action by Deccan Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.