ललितकला केंद्राची ‘भाजयुमाे’कडून तोडफोड, १० ते १२ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 11:59 AM2024-02-04T11:59:05+5:302024-02-04T11:59:30+5:30

याप्रकरणी १० ते १२ कार्यकर्त्यांवर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Vandalism of Lalitkala Kendra by 'BHAYUMA', case registered against 10 to 12 activists | ललितकला केंद्राची ‘भाजयुमाे’कडून तोडफोड, १० ते १२ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

ललितकला केंद्राची ‘भाजयुमाे’कडून तोडफोड, १० ते १२ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे : भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललितकला केंद्रात प्रवेश करीत केंद्राची तोडफोड केली. तसेच फलकाला शाई फासण्याची घटना घडली. याप्रकरणी १० ते १२ कार्यकर्त्यांवर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ललितकला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून शुक्रवारी (दि. २) सायंकाळी ‘जब वी मेट’ या नाटकाचे प्रयाेग सुरू हाेते. सदर नाटक रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या पडद्यामागील आयुष्यावर आधारित असून, ताे विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा अंतर्गत भाग होता. मात्र रामायणाचा विपर्यास केल्याच्या आरोपावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी नाटकाचा प्रयोग बंद पाडला. विद्यार्थ्यांशी हाणामारी केली.

या प्रकरणी पाेलिसांत तक्रार दाखल हाेताच केंद्रप्रमुख डाॅ. प्रवीण भोळे व पाच विद्यार्थ्यांना अटक केली गेली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवारी दुपारी त्यांना न्यायालयीन काेठडी देण्यात आली. जामिनासाठी दाखल अर्जावर सुनावणी देताना जामीन मंजूर करण्यात आला.

या दरम्यान शनिवारी दिवसभर विद्यापीठात ललितकला केंद्राच्या बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात होता. विद्यापीठाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले होते. ललितकला केंद्र बंद ठेवले होते. असे असतानाही भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीतच ललितकला केंद्राचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि सामानाची तोडफोड केली. केंद्राच्या फलकाला काळी शाई फासली. ‘जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. पाेलिस बंदोबस्त असताना असा धुडगूस कार्यकर्ते घालू कसे शकतात, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

विद्यापीठात तीन महिन्यांपूर्वीच दोन संघटनांमध्ये सदस्य नोंदणीवरून हाणामारी झाली होती. त्यामुळे विद्यापीठात १४४ कलम लागू केले होते. त्यावेळी जवळपास महिनाभर विद्यापीठात हे कलम लागू होते. विद्यापीठात वारंवार असे प्रकार घडत असताना विद्यापीठ प्रशासन कोणतीही ठोस भूमिका का जाहीर करीत नाही? प्रशासन अभाविप आणि भाजप युवा मोर्चा या संघटनेच्या लोकांना पाठीशी घालत आहे का, असा जाब विद्यार्थ्यांनीही कुलगुरू डाॅ. सुरेश गोसावी यांना विचारला आहे.

Web Title: Vandalism of Lalitkala Kendra by 'BHAYUMA', case registered against 10 to 12 activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.