The vacuum cleaner plucked the hair of the woman's head, 165 stitches on the head, and the water was in the brain | व्हॅक्युम क्लिनरमुळे महिलेच्या डोक्याचे केस उपटले, डोक्याला १६५ टाके, मेंदूत झाले पाणी
व्हॅक्युम क्लिनरमुळे महिलेच्या डोक्याचे केस उपटले, डोक्याला १६५ टाके, मेंदूत झाले पाणी

चाकण : येथील औद्योगिक कंपनीत काम करताना व्हॅक्युम क्लिनरच्या पंख्याच्या हवेने एका कामगार महिलेच्या डोक्याचे केस उपटून निघाले असून या अपघातात महिलेच्या डोक्याला १६५ टाके पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. एक महिन्यापूर्वी घटना घडूनही कंपनीने महिलेवर उपचार करण्यास टाळाटाळ केली. अखेर याप्रकरणी कंपनीतील कामगारांना सुरक्षा विषयक कोणतीही साधने न पुरवता व सुरक्षेच्या दृष्टीने योग्य काळजी न घेतल्या बाबत काल ( दि. ११ ) रात्री दहाच्या नंतर उशिरा कंपनीचा व्यवस्थापक शर्मा, सुपरवायझर व सुरक्षा अधिकाऱ्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना दिनांक ८ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. चाकण एमआयडीसीतील नाणेकरवाडी ( ता.खेड ) हद्दीत ओ.बी.एस.जी. प्रा. लि. या कंपनीत आठ दिवसांपूर्वी कारखान्यात काम करताना घडली आहे. सीमा विश्वंभर राठोड ( वय २५, रा. यशवंत कॉलनी, नाणेकरवाडी, चाकण, मुळगाव मालेगाव, जि. वाशीम ) असे जखमी झालेल्या कामगार महिलेचे नाव आहे. या घटनेत कामगार महिलेच्या डोक्यावरील पुढील भागातील केस उपटून निघाले आहेत. कंपनीत उपचारासाठी उंबरठे झिजवूनही कंपनीने उपचारास टाळाटाळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. जखमी महिलेने कंपनीचे व्यवस्थापक, सुपरवायझर यांनी सुरक्षेची साधने न पुरवता काम करण्यास भाग पाडल्याबद्दल चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हि महिला कंपनीत कंत्राटदारामार्फत मदतनीस म्हणून काम करीत होती. कंपनीतील चार नंबरचे नट बोल्ट तयार होणाऱ्या यंत्राजवळ सफाईचे झाडूकाम करताना यंत्राजवळील पाईप साफ करण्यासाठी लागणाऱ्या व्हॅक्युम क्लिनरच्या हवेने डोक्याचे केस ओढले गेले. त्यात डोक्यावरचे केस निघून महिला जखमी झाली.  त्यानंतर उपचारासाठी ईएसआय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर सदर महिलेस चाकण येथील जयहिंद हॉस्पिटल मध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एक महिन्याचा कालावधी लोटल्यामुळे व वेळेवर उपचार न मिळाल्याने संबंधित महिलेच्या मेंदूत पाणी झाले असून शनिवारी प्लास्टिक सर्जन डॉ. वसंत गुळवे  शस्रक्रिया करणार असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुभाष पवार पुढील तपास करीत आहेत.


Web Title: The vacuum cleaner plucked the hair of the woman's head, 165 stitches on the head, and the water was in the brain
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.