उरुळी कांचनमध्ये स्वाइन फ्लूचे दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 02:19 AM2018-09-18T02:19:02+5:302018-09-18T02:19:16+5:30

आरोग्याचा प्रश्न गंभीर; तत्काळ उपाययोजनांची आवश्यकता

Two victims of swine flu are in Uruli Kanchan | उरुळी कांचनमध्ये स्वाइन फ्लूचे दोन बळी

उरुळी कांचनमध्ये स्वाइन फ्लूचे दोन बळी

googlenewsNext

उरुळी कांचन : पुणे शहरासह जिल्ह्यामध्येही स्वाइन फ्लूचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून, उरुळी कांचनमध्ये या आजारामुळे एका परिचारिकेसह दोन महिलांना जीव गमवावा लागला आहे. नुकताच चाकण परिसरातही स्वाइन फ्लूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सीमा चंद्रकांत ऐवारे (वय ३८, रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन), प्रभावती वाल्मीक कांचन (वय ६०, रा. काळेशिवार, शिंदवणे) अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. ऐवारे या स्वत: परिचारिका म्हणून काम करीत होत्या. त्यांच्या रक्ताच्या नमुन्याची तपासणी केली असता ती एच१एन१ पॉझिटिव्ह आली. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये हलविण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून त्या व्हेन्टिलेटरवर होत्या. शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पती, दोन मुले आहेत. तर, कांचन या पती वाल्मीक कांचन यांची सुश्रुषा करण्यासाठी हडपसरच्या एका खासगी रुग्णालयात होत्या. त्यांना तेथे स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला. उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी (दि. १२) मृत्यू झाला.
स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनिया व अन्य साथींच्या रोगांनी उरुळी कांचन परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासन यंत्रणा यावर गांभीर्याने उपाययोजना करण्यास प्राधान्य देताना दिसत नाही. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ग्रामविकास अधिकारी के. जी. कोळी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, की डुक्करमालकांना अनेकदा सांगूनही ते त्याचा बंदोबस्त करीत नाहीत. वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊन कारवाई करण्यात येईल.

Web Title: Two victims of swine flu are in Uruli Kanchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.