ज्या महापालिकेत कचरा वेचला तिथेच डॉक्टर म्हणून रुजू झाला (व्हिडीओ)

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 07:04 PM2019-03-14T19:04:50+5:302019-03-14T19:17:34+5:30

डॉ. तुषार अडागळे. पुणे महापालिकेत मागच्या महिन्यापर्यंत घनकचरा विभागाचे कर्मचारी म्ह्णून काम करणारे तुषार आता आरोग्य खात्यात डॉक्टर म्हणून रुजू झाले आहेत.

Tushar become doctor after working at garbage department at PMC | ज्या महापालिकेत कचरा वेचला तिथेच डॉक्टर म्हणून रुजू झाला (व्हिडीओ)

ज्या महापालिकेत कचरा वेचला तिथेच डॉक्टर म्हणून रुजू झाला (व्हिडीओ)

Next

पुणे : कष्ट, सातत्य आणि निश्चयाच्या बळावर काहीही अशक्य नाही असं म्हणतात. या वाक्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. तुषार अडागळे. पुणे महापालिकेत मागच्या महिन्यापर्यंत घनकचरा विभागाचे कर्मचारी म्ह्णून काम करणारे तुषार आता आरोग्य खात्यात डॉक्टर म्हणून रुजू झाले आहेत. तुषार यांच्या आयुष्याचा हा प्रवास दोन वाक्यात संपणारा नसून चिकाटी आणि फिनिक्सच्या भरारीप्रमाणे आहे. 

 

 तुषार कधीही हुशार विद्यार्थी नव्हते हे स्वतःच मान्य करतात. त्यांच्या भाषेत सांगायचं झाल्यास, 'मी दहावीला तीन विषयात नापास झालो. बारावी जेमतेम ४२ टक्क्यांनी पास झालो. सुरुवातीला मी बीएस्सीला ऍडमिशन घेतली. त्यावेळी जेमतेम तीन महिन्यात मी वडिलांना मला बी एस्सी. करायची इच्छा नसल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी मला बीएचएमएस (होमिओपॅथीला) ऍडमिशन घेऊन दिली. तीन वर्षाच्या बी एस्सीमधून मी तीन महिन्यात पळून आलो म्हटल्यावर पुढे साडेपाच वर्ष एकाच कोर्स करणं मला अशक्य वाटतं होत. पण वडिलांना नाही म्हणू शकलो नाही. या सगळ्या गोंधळात माझी आज्जी चंद्राबाई मात्र तिच्यानंतर तिच्या जागी माझे नाव महापालिकेच्या नोकरीत लावण्याच्या तयारीत होती. माझी शिक्षणतली ओढ बघता ही नोकरीच माझं आयुष्य सावरेल असं तिला वाटतं होतं. 

मेडिकल कॉलेज सुरु झालं आणि सहा महिन्यात मला महापालिकेत रुजू होण्याचे  पत्र आलं. अर्थात डॉक्टरकीच तेव्हा इतकं खरं वाटत नसल्याने मीसुद्धा महापालिकेत रुजू झालो. सकाळी ६ ते दुपारी १ अशा कामाच्या वेळेमुळे सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत चालणारे कॉलेज मी करू शकलो नाही. त्यामुळे इथेही नापास होण्याची परंपरा सुरु ठेवली. मात्र तरीही नैराश्य झटकून पुन्हा  अभ्यास करून मी पास झालो. मित्रांची मदत आणि विषयातला रस यामुळे मला बीएचएमएस आवडायला लागलं होत. आता मी कामासाठी रात्रपाळी करून घेतली. रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत मी काम करायचो. या काळात वेळ मिळेल तसा अभ्यासही सुरु होता. दुसऱ्या वर्षांचा अभ्यास अंतिम टप्प्यात आल्यावर मी पास होईल असे मला वाटत असताना सरकारची जनगणना आली. त्यावेळी महापालिकेने जनगणना कर्मचाऱ्यांसोबत आम्हाला काम करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पुन्हा दिवसभर काम करण्याची वेळ आली. हे सगळं अगदी परीक्षेच्या तोंडावर झाल्यामुळे पुन्हा मला दुसऱ्या वर्षी अपयश आले. आता तर मला खात्री होती की आपण डॉक्टर होऊ शकत नाही. त्यातच दुसऱ्यांदा अपयश आले आणि मी कोसळून गेलो. नाहीच द्यायची परीक्षा असे मनोमन ठरवलेही. पण मित्रांच्या आग्रहामुळे परीक्षा दिली आणि पास झालो. पुढे दोन वर्ष पुन्हा रात्रपाळीत काम करून परीक्षा दिल्या आणि २०१५ साली इंटर्नशिप करून डॉक्टर झालो. 

 

 पुढे तुषार सांगतो, डॉक्टर झाल्यावरही संघर्ष संपत नव्हता. घरची जबाबदारी वाढत होती, दरम्यान लग्नही झाले. या सगळ्यात नोकरी सुरु होती. डॉक्टरकीची पदवी मिळाल्यावर तीन वर्ष घनकचरा विभागात काम करतअसताना मनात अनेकदा निराशाजनक विचार यायचे. भविष्यात कधी डॉक्टर म्हणून काम करता येईल अशी खात्रीही वाटेनाशी झाली. आणि एक दिवस अचानक अचानक महापालिकेत मी  डॉक्टर असल्याची माहिती विभागप्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांना कळाली आणि मला आरोग्य खात्यात रुजू करून घेण्यात आले. सध्या मला पगार चतुर्थ श्रेणी कचरा कामगाराचा असला तरी काम मी आरोग्य विभागात करत आहे. कचरा विभागाचा कामगार म्हणून वागणाऱ्या अनेकांना मी डॉक्टर आहे समजल्यावर बोलण्याची पद्धत बदलली आहे. आयुष्याचा हा प्रवास मला खूप शिकवणारा होता. 

    मला नेहमी वाटतं, '`या देशाला, समाजाला आपली खूप गरज आहे. त्यासाठी आपल्या सहभागाची, सहकार्याची गरज आहे. त्यासाठी आपण एक होऊन काम करायला हवे. माणूस म्हणून मिळालेल्या जन्माचा आपण उपयोग करून घ्यायला हवा. नाही केला तर आपली किंमत शून्यही उरणार नाही''.                                    

                        

Web Title: Tushar become doctor after working at garbage department at PMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.