पाटसला हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 02:01 AM2018-12-08T02:01:45+5:302018-12-08T02:01:51+5:30

शासनाच्या उदासीन धोरणामुळे पाटस गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

Thousands of liters of wastewater in Patas | पाटसला हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

पाटसला हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

- मनोहर बोडखे 
पाटस : शासनाच्या उदासीन धोरणामुळे पाटस गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाणी वाया जात असल्यामुळे पाण्याचा दाब कमी होत गावाला अपूर्ण स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याची वस्तुस्थिती आहे.
पाटस ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेला वेळोवेळी गळती बंद होण्यासंदर्भात लेखी स्वरुपात सूचना करूनदेखील याकडे प्राधिकरण विभागाने दुर्लक्ष केले आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, दररोज हजारो लिटर पाणी वाया जाणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
वरवंड (ता. दौंड) येथील तलावातून पाटस गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी सोडले जाते. हे पाणी पाटस येथील जलशुद्धीकरण केंद्रात येते आणि तेथून गावाला पाणीपुरवठा केला जातो.
पाटस गावाच्या जवळील तामखडा येथून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेलेली आहे. या जलवाहिनीला ठिकठिकाणी पाण्याची गळती लागल्याने २४ तास पाणी वाया जात आहे. परिणामी ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहे. पाटस गावातील काही भागांत पाण्याची टंचाई असल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दुसरीकडे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन गळती झालेले पाण्याचे रुपांतर सांडपाण्यात होत आहे. तेव्हा शासनाने तातडीने जलवाहिनीची गळती काढून पाणीगळती थांबवणे काळाची गरज आहे.
>योजना हस्तांतरित
केली नाही
पाटस गावाला पाणीपुरवठा करणारी योजना ग्रामपंचायतीकडे अद्याप लेखी स्वरुपात हस्तांतरित झालेली नाही. वरवंड ते पाटसदरम्यान जलवाहिनी आहे. या जलवाहिनीला काही ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पाणी वाया जात आहे. तेव्हा पाणीगळती थांबविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला याबाबत लेखी स्वरुपात गेल्या वर्षापासून पाठपुरावा केला जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- वैैजयंता म्हस्के (सरपंच, पाटस)
>योजना हस्तांतरित केली
वासुंदे पाणीपुरवठा योजना बंद आहे. तेव्हा या योजनेवर खर्च झालेला पैैसा वाया जाऊ नये, म्हणून तसेच पाटस हे मोठे गाव असल्यामुळे या योजनेचा फायदा पाटसला व्हावा, म्हणून योजनेच्या जलवाहिनीची डागडुजी करून तसेच जलशुद्धीकरण योजना सुरू करून ही योजना पाटस ग्रामपंचायतीला हस्तांतरित केली आहे. त्यामुळे या योजनेच्या देखभालीची योजना पाटस ग्रामपंचायतीकडे आहे. परिणामी ग्रामपंचायतीला तांत्रिक मदत करता आली तर ती आम्ही करू शकतो.
- वैशाली आवटे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
>पाण्याचा प्रवाह कमी होत आहे
जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. यासंदर्भात परिस्थितीची पाहणी केली असून पाणी वाया जात आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करताना पाण्याचा प्रवाह कमी होत असल्याची वस्तुस्थिती आहे.
- विलास भापकर, ग्रामविस्तार अधिकारी, पाटस

Web Title: Thousands of liters of wastewater in Patas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.