येत्या १० मे रोजी दाभोलकर खून खटल्याचा निकाल लागणार

By नम्रता फडणीस | Published: April 18, 2024 08:20 PM2024-04-18T20:20:59+5:302024-04-18T20:21:15+5:30

जवळपास अडीच वर्षे हा खटला चालविण्यात आला.

The verdict of the Dabholkar murder case will be announced on May 10 | येत्या १० मे रोजी दाभोलकर खून खटल्याचा निकाल लागणार

येत्या १० मे रोजी दाभोलकर खून खटल्याचा निकाल लागणार

पुणेअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना  २० ऑगस्ट २०१३ या दिवशी त्यांचा  गोळ्या झाडून खून करण्यात आला. या घटनेने अवघे  राज्य हादरले. दाभोलकरांच्या खुनानंतर तब्बल आठ वर्षांनी खटला सुरु झाला. खुनाचा तपास पूर्ण होऊन सप्टेंबर 2021 मध्ये पुण्यातील विशेष न्यायालयाने 5 आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षे हा खटला चालविण्यात आला.

या खटल्याची सुनावणी आता पूर्ण झाली असून, येत्या १० मे रोजी खटल्याचा निकाल लागणार आहे. यात आरोपींना शिक्षा होते की आरोपी
निर्दोष सुटतात याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. सुरुवातीच्या काळात पुणे पोलीस या खुनाचा तपास करीत होते. त्यानंतर त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून जून 2014 मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. त्यांनतर 15 सप्टेंबर 2021 रोजी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले.

तावडे, अंदुरे, कळसकर  आणि भावे यांच्यावर न्यायालयाने भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम 302 (हत्या), 120 (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), 34 नुसार आणि
शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . यातील  संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी
सध्या जामिनावर बाहेर आहेत. सुरुवातीला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरु होती. त्यानंतर नावंदर यांची बदली झाल्याने सध्या पी.पी जाधव यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरु आहे. सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळसिंगीकर, वीरेंद्र इचलकरंजीकर आणि सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले. त्यांनी २ साक्षीदार उपस्थित केले. या खटल्याचे कामकाज पूर्ण झाले असून, दि. १० मे रोजी दाभोलकर खटल्याचा निकाल लागणार आहे.

Web Title: The verdict of the Dabholkar murder case will be announced on May 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.