Raj Thackeray: वसंत मोरे यांनी भूमिका घेतलेली योग्यच; मी बहिण म्हणून त्यांच्या पाठीशी- रुपाली पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 03:47 PM2022-04-06T15:47:54+5:302022-04-06T15:49:35+5:30
पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून राजकीय अडचण होत असल्याचं म्हटलं.
पुणे- गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जहाल हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत थेट मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या या सभेनंतर त्यांच्यावर सत्ताधारी पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चौफेर हल्ला चढवला. मशिदीवरील भोंगे सरकारने हटवावे अन्यथा आम्ही भोंग्यासमोर दुपटीने लाऊडस्पीकर लावत हनुमान चालीसा लावू असं राज ठाकरेंनी म्हटलं होते.
राज ठाकरे यांच्या या भूमिकेवरुन महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी टीका केली. तसेच पक्षातील मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. पुण्यातील काही मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले. तर पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून राजकीय अडचण होत असल्याचं म्हटलं. तसेच माझ्या प्रभागात मी भोंगे लावणार नाही. माझ्या प्रभागात शांतता कशी राहील, यासाठी मी प्रयत्न करेन, असं वसंत मोरे यांनी सांगितलं.
वसंत मोरेंच्या या भूमिकेवरुन राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. वसंत मोरेंनी भूमिका घेतलेली योग्यच आहे. बहिण म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे. कारण ते लोकप्रतिनिधी आहेत, असं रुपाली पाटील यांनी सांगितलं. तसेच राज ठाकरेंची सभा ही भाजपाची होती. राज ठाकरेंनी यू-टर्न घेतला आहे. असे होईल हे कोणालाही वाटले नव्हतं, असा टोलाही रुपाली पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
दरम्यान, राज ठाकरेंची गुढीपाढव्याची जी सभा झाली. त्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांना मिरच्या झोंबलेल्या देखील बघायला मिळाल्या. त्यामुळे ठाण्यामध्ये ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.
राज ठाकरेंची ही सभा कशासाठी ठेवण्यात आली आहे, असा काही जणांना प्रश्न पडला असेल. मात्र एखादी मोठी पूजा होते, त्याची सांगता आपण उत्तरपूजेने करतो, असं संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी सांगितले. एखाद्याची आपल्याला उत्तरक्रिया देखील करावी लागते आणि काही लोकांना उत्तरं देखील द्यावी लागतात, असं संदीप देशपांडे यांनी यावेळी सांगितलं.