'जो आमदार कसब्याचा, तो खासदार पुण्याचा' रविंद्र धंगेकर यांच्या पोस्टला गौरव बापटांची हरकत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 11:34 AM2024-03-23T11:34:58+5:302024-03-23T11:35:38+5:30

‘जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा,’ अशी स्लोगन देत गिरीष बापट यांचे छायाचित्र यात वापरण्यात आले आहे....

'The MLA is from the village, the MP is from Pune' | 'जो आमदार कसब्याचा, तो खासदार पुण्याचा' रविंद्र धंगेकर यांच्या पोस्टला गौरव बापटांची हरकत

'जो आमदार कसब्याचा, तो खासदार पुण्याचा' रविंद्र धंगेकर यांच्या पोस्टला गौरव बापटांची हरकत

पुणे : निवडणुकीतील अधिकृत प्रचाराच्या आधीच पुण्यात आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा सुरू आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या एका पोस्टला दिवंगत खासदार गिरीष बापट यांचे चिरंजीव यांनी हरकत घेतली आहे. ‘जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा,’ अशी स्लोगन देत गिरीष बापट यांचे छायाचित्र यात वापरण्यात आले आहे.

धंगेकर यांचा त्यांच्या पक्षाच्या नेत्यावर विश्वास नाही का? असा प्रश्न बापट यांनी केला? त्यावर हे कोणी पोस्ट केली तेच मला माहिती नाही, असा दावा धंगेकर यांनी केला. ‘कोणा मतदाराला असे वाटत असेल तर त्याला मी काय करणार? मी तर ती पोस्ट पाहिलीही नाही,’ असे धंगेकर म्हणाले.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ अशी लढत होत आहे. दोघेही विसर्जित महापालिका सभागृहात नगरसेवक होते. आता प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून उभे ठाकले आहेत. धंगेकर यांच्या कोणा एका कार्यकर्त्याने समाजमाध्यमावर ‘जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा,’ अशी पोस्ट केली होती. त्यात भाजपचे दिवंगत खासदार गिरीष बापट यांचे छायाचित्र होते.

हास्यास्पद प्रचार अशा शब्दांमध्ये बापट यांचे चिरंजीव गौरव यांनी याला हरकत घेतली. त्यांचा बहुधा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर विश्वास नसावा, त्यांचे छायाचित्र वापरले तर मते मिळणार नाहीत, असे त्यांना वाटत असावे, असेही बापट म्हणाले. आम्ही हार्ड कोअर भाजपचे आहोत. मोहोळ यांचाच प्रचार करणार आहोत. फक्त मीच नाही, तर आमचे सर्व कुटुंबच मोहोळ यांच्या प्रचारात असेल, असे ते म्हणाले. दुसऱ्या पक्षाच्या नेत्याचा त्यातही दिवंगत खासदारांच्या छायाचित्राचा वापर करणे अयोग्य आहे, असे गौरव यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे धंगेकर यांनी अशी काही पोस्ट आहे याची आपल्याला माहितीच नाही, असा दावा केला. एखाद्या कार्यकर्त्याला तसे वाटत असेल तर त्याला मी काय करणार? असेही ते म्हणाले. अशा प्रकारच्या प्रचारावर माझा विश्वास नाही. मी लढून, संघर्ष करून विजय मिळवितो. कसब्यातील विजय तसाच मिळविला आहे. त्यामुळे कोणी पोस्ट केली असेल तर त्याची जबाबदारी माझ्यावर नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: 'The MLA is from the village, the MP is from Pune'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.